विनोबांच्या स्मारकाचा सरकारला विसर, सरकारी आश्वासनाला 25 वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 07:02 AM2017-09-13T07:02:06+5:302017-09-13T07:02:06+5:30

भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव असलेल्या पेण येथील गागोदे बुद्रुकमध्ये आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचा सरकारला विसर पडला आहे. १९९२ पासून तीन मुख्यमंत्र्यांनी गावास भेट देऊन स्मारकाची घोषणा केली. दोन मुख्यमंत्र्यांनी स्मारकाचे भूमिपूजन करून, कोनशीला बसविली आहे; परंतु २५ वर्षांमध्ये स्मारक उभारण्यासाठी एक रुपयाही खर्च करण्यात आलेला नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

 Vinoba's memorial forgets government, completes 25 years of government assurance | विनोबांच्या स्मारकाचा सरकारला विसर, सरकारी आश्वासनाला 25 वर्षे पूर्ण

विनोबांच्या स्मारकाचा सरकारला विसर, सरकारी आश्वासनाला 25 वर्षे पूर्ण

googlenewsNext

- नामदेव मोरे 
नवी मुंबई : भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव असलेल्या पेण येथील गागोदे बुद्रुकमध्ये आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचा सरकारला विसर पडला आहे. १९९२ पासून तीन मुख्यमंत्र्यांनी गावास भेट देऊन स्मारकाची घोषणा केली. दोन मुख्यमंत्र्यांनी स्मारकाचे भूमिपूजन करून, कोनशीला बसविली आहे; परंतु २५ वर्षांमध्ये स्मारक उभारण्यासाठी एक रुपयाही खर्च करण्यात आलेला नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
‘भूदान चळवळी’च्या माध्यमातून आचार्य विनोबा भावे यांनी भारतभर पदयात्रा काढली. ४७ लाख ६३ हजार ६७६ एकर जमीन मिळविली व तिचे भूमिहीनांना वाटप केले. स्वातंत्र्य लढ्यापासून समाजसेवेमध्ये अतुलनीय कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाने १९८३मध्ये त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरविले; पण त्यांचे जन्मगाव असलेल्या पेण तालुक्यातील गागोदे बुद्रुकमध्ये त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. स्वातंत्र्यानंतर ४५ वर्षांनी ११ सप्टेंबर, १९९२मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी गागोदेला भेट दिली. गावामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आचार्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची घोषणा केली. त्यांच्या विचारांचे जतन व्हावे व त्यांनी केलेल्या कार्याची पूर्ण माहिती होईल, असे संग्रहालय असलेले स्मारक उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.
गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागील बाजूला भव्य समाजमंदिराच्या कामाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी पाड्याचे विनोबानगर असे नामकरण करण्यात आले. याविषयी नामफलकही दोन्ही ठिकाणी बसविण्यात आले आहेत. या कार्यक्रमानंतर प्रत्यक्षात स्मारक उभारण्यासाठी काहीही कार्यवाही झालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला ११ सप्टेंबरला २५ वर्षे पूर्ण झाली असून, अजून किती दिवस वाट पाहायची, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
सुधाकर नाईक यांच्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनीही जयंतीच्या कार्यक्रमासाठी गावाला भेट दिली होती. या वेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये पवार यांनीही आंतरराष्ट्रीय स्मारकाची घोषणा केली होती. विनोबांच्या कर्तृत्वाची माहिती देणारे स्मारक गावात उभारण्यात येईल, असे सांगितले; परंतु प्रत्यक्षात काहीच झालेले नाही.
१९९५मध्ये युतीचे सरकार सत्तेवर आले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ५ मार्च १९९८मध्ये गावाला भेट दिली. विनोबांच्या जन्मस्थळाच्या मागील बाजूला असलेल्या तलावाच्या काठावर आचार्य विनोबा भावे यांचे स्मृतिशिल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली. तलावाच्या बाजूला स्मारकाची कोनशीलाही बसविण्यात आली. सद्यस्थितीमध्ये कोनशीला जागेवर असली, तरी स्मारक उभारण्यासाठी काहीच कार्यवाही झालेली नाही. तीन मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. दोघांनी स्मारकाचे भूमिपूजन करूनही काहीच कार्यवाही झालेली नाही.
आता भारतीय जनता पक्ष व शिवसेना सरकार तरी स्मारकाचे काम पूर्ण करेल का? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

१९९२मध्ये पहिले भूमिपूजन
१गागोदे बुद्रुक गावामध्ये ११ सप्टेंबर १९९२मध्ये जिल्हा परिषद शाळेच्या मागे नरहरी भावे सभागृहाचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. त्या वेळी तत्कालीन खासदार बॅरिस्टर ए. आर. अंतुले, शिक्षण राज्यमंत्री पतंगराव कदम उपस्थित होते; परंतु या सभागृहाचे व स्मारकाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
१९९८मध्ये दुसरे भूमिपूजन
२५ मार्च १९९८मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते आचार्य विनोबा भावे यांच्या स्मृतिशिल्पाचे भूमिपूजन केले. गावाच्या तलावाजवळ अद्याप तो नामफलक पाहावयास मिळत आहे. तत्कालीन गृहराज्यमंत्री व रायगडचे पालकमंत्री प्रभाकर मोरे, खासदार निर्मला देशपांडे, आमदार मोहन पाटील आदी उपस्थित होते. स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले होते; पण प्रत्यक्षात स्मारकाचे काम सुरू झाले नाही.

१९९२मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची घोषणा केली होती. तेव्हापासून फक्त आश्वासन दिले जात आहे. गावचा विकास व्हावा व भव्य स्मारक उभे राहावे, ही सर्वांची अपेक्षा आहे.
- पांडुरंग महादू पाटील,
निवृत्त शिक्षक व ग्रामस्थ
विनोबांचे जन्मगाव असलेल्या गागोदेमध्ये त्यांचे भव्य स्मारक उभे राहावे, अशी आम्हा सर्वच ग्रामस्थांची इच्छा आहे. शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन स्मारकाचे काम मार्गी लावावे.
- प्रभाकर शिंदे,
ग्रामस्थ, गागोदे
गागोदे गावामध्ये आचार्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या फक्त पाट्या लावण्यात आल्या आहेत. दोन वेळा भूमिपूजन झाले; पण प्रत्यक्षात स्मारकाचे काम उभे राहिलेले नाही. स्मारक व्हावे, अशी सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे.
- संतोष शिंदे,
ग्रामस्थ, गागोदे

गागोदेमधील तलावाची दुरवस्था
च्गावामधील तलावाला आचार्य विनोबा भावे यांच्या आई रुक्मिणी भावे यांचे नाव देण्यात आले आहे. याच तलावाच्या काठावर १९९८मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते; परंतु त्या तलावाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. संरक्षण भिंत कोसळली आहे. तलावामध्ये गाळ साचला आहे. या तलावाचे योग्य सुशोभीकरण करून, त्याच्या काठावर भव्य स्मारक उभारणे शक्य आहे; परंतुु सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.

गावात जाणा-या रोडवर खड्डे
आचार्य विनोबा भावे यांच्या गागोदे बुद्रुक गावाकडे जाण्यासाठीच्या रोडचे डांबरीकरण केले आहे; परंतु रोडवर जागोजागी खड्डे पडले आहेत. विनोबानगरकडे जाणाºया रोडचीही दुरवस्था होऊ लागली आहे. ‘भूदान चळवळी’च्या माध्यमातून ४७ लाख ६३ हजार एकर जमीन गरिबांसाठी मिळविणाºया या महापुरुषाच्या गावात जाण्यासाठीच्या रोडवरही खड्डे बुजविण्याकडेही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने गावास भेट देण्यासाठी येणारे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

Web Title:  Vinoba's memorial forgets government, completes 25 years of government assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.