बिल्डरविरोधात शेकापसह ग्रामस्थांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 02:48 AM2018-05-24T02:48:33+5:302018-05-24T02:48:33+5:30

आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज : आजी-माजी आमदारांसह ग्रामस्थांना अटक ; लढा सुरूच ठेवण्याचा इशारा

Villagers Elgar with pandemic against builder | बिल्डरविरोधात शेकापसह ग्रामस्थांचा एल्गार

बिल्डरविरोधात शेकापसह ग्रामस्थांचा एल्गार

googlenewsNext

पनवेल : शेतकरी कामगार पक्षासह मोठा खांदा ग्रामस्थांनी श्री गणेश इंटरप्रायझेस या बिल्डरविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. आजी-माजी आमदारांसह हजारो आंदोलकांनी पाच तास रोडवर ठिय्या मांडला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करून, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह तब्बल ४१ जणांना अटक केली. पोलिसांच्या भूमिकेमुळे नागरिकांनी परिसरात बंद पाळला होता. सायंकाळी आंदोलकांना पोलिसांनी सोडले असून, बिल्डरविरोधात लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार शेकापने व्यक्त केला आहे.
मोठा खांदा गावातील गावकीचे भूखंड विकसित करण्यासाठी श्री गणेश इंटरप्रायझेसला देण्यात आले होते. विकसित करण्यासाठीचा मोबदला म्हणून ५० लाख गावकीला देणे बाकी आहे. मात्र, वारंवार बैठका, निवेदन, आंदोलन करूनदेखील गावकीचे पैसे देण्यास नकार देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. निम्मी रक्कम देतो, असे सांगूनही बिल्डरकडून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बुधवार, २३ मेला सकाळी ११ वाजता श्री गणेश इंटरप्रायझेसच्या कार्यालसमोर मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी तो मोर्चा कार्यालयाच्या बाजूला अडवला. त्यामुळे नागरिकांना पाच तास बसावे लागले. आंदोलनात आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शहर चिटणीस गणेश कडू, तालुका चिटणीस एकनाथ भोपी, नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, सारिका भगत, विजय भगत, शशिकांत शेळके, जयंत भगत आदी सहभागी झाले होते. वारंवार समन्वयाची भूमिका घेऊनसुद्धा येथील ग्रामस्थांना अन्याय सहन करावा लागत होता. या वेळी, ‘आमचा गाव, आमचा हक्क’, ‘जमीन आमच्या हक्काची’ अशा घोषणा देत महिला आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. रणरणत्या उन्हामध्ये ग्रामस्थांचे आंदोलन रस्त्यावर बसून सुरूच होते. ग्रामस्थांच्या रोजगारावर गदा येणार असेल तर आम्हीही उरावर बसून हक्क मिळवण्यास तयार आहोत, अशी घोषणाबाजी ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. नागरिकांनी या आंदोलनात गणेश इंटरप्रायझेस विरोधात घोषणाबाजी दिल्या. या आंदोलनाला मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ काम बंद करण्यासाठी तगादा लावून उन्हात बसले होते. दरम्यान, ग्रामस्थांमधील एका महिलेला चक्कर आली, या महिलेला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुपारी ३.३०च्या सुमारास आंदोलन संपवून टाका, असे पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना सांगण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यास न जुमानता आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील यांना ताब्यात घेते वेळी काहींनी दगडफेक केली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याने आंदोलकांवर पोलिसांना लाठीचार्ज केला. यात काही आंदोलनकर्ते जखमी झाले, त्यामुळे वातावरण आणखी चिघळले. पोलिसांनी आजी-माजी आमदारांसह शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलकांवर बेकायदेशीर जमावबंदी, तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांची जमीनावर सुटका करण्यात आली. पोलिसांनी ग्रामस्थांना सहकार्य केले नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

मार्ग न निघाल्यास पुन्हा लढा
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनाविषयी भूमिका मांडताना सांगितले की, प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनीचा त्याग केला आहे. या परिसरात विकास होत असताना गावांचा व परिसराचा विकास व्हावा. बांधकाम करताना कामे स्थानिकांना मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. बिल्डरने गावकीच्या विकासासाठी सहकार्य केले नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे. ग्रामस्थांच्या हक्कासाठी लढा उभारला आहे. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचेही स्पष्ट केले.

कामोठे बंद
खांदा गावातील आंदोलन चिघळल्यानंतर आजी-माजी आमदारांना कामोठे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे शेकाप कार्यकर्त्यांनी पोलिसांवर रोष व्यक्त करत कामोठे वसाहतीतील दुकाने बंद केली. त्यामुळे कामोठे वसाहतीत थोड्या फार प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने पोलीस स्टेशनला यात्रेचे स्वरूप आले होते.

Web Title: Villagers Elgar with pandemic against builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर