मुरुड तालुक्यात पर्यटकांची अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:29 PM2019-05-19T23:29:19+5:302019-05-20T00:03:18+5:30

समुद्रकिनारे फुलले : जंजिरा किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूककोंडी; हॉटेल, लॉजिंग हाउसफुल्ल

Tourist crowd in Murud taluka | मुरुड तालुक्यात पर्यटकांची अलोट गर्दी

मुरुड तालुक्यात पर्यटकांची अलोट गर्दी

Next

- संजय करडे


मुरुड : शनिवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी व आलेला रविवार साधून हजारो पर्यटक मुरुड व काशिद समुद्रकिनारी येऊन धडकले आहेत. शनिवारपासूनच पर्यटकांनी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली होती. पर्यटक स्वत:च्या चारचाकी गाड्या घेऊन येणे अधिक पसंत केले होते. मुरुडसह काशिद समुद्रकिनारासुद्धा शेकडो पर्यटकांनी फुलून गेला होता. पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने मासळी मार्केट येथून जंजिरा किल्ल्याकडे जाणाºया मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. राजपुरी जेट्टी, खोरा बंदर जेट्टी येथील वाहनतळ हाउसफुल्ल होऊनरस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने पार्क करण्यात आली होती. राजपुरी येथील अरुंद रस्ता असल्याने एखादे मोठे वाहन आल्यास वाहतूककोंडी होत असल्याचे निदर्शनास आले.


मुंबईपासून अवघ्या १५० किलोमीटरवर मुरुड हे पर्यटनस्थळ असल्याने येथे ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली आदी भागातील पर्यटक त्याचप्रमाणे औरंगाबाद, पुणे, बीडचे पर्यटक मोठ्या संख्येने ऐतिहासिक जंजिरा किल्ला व समुद्रकिनारा पाहावयास आले होते.
मुरुड तालुक्याचे सध्याचे तापमान ३६ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असूनसुद्धा पर्यटकांनी या ठिकाणी येणे अधिक पसंत केले आहे. येथे येणाºया पर्यटकांनी समुद्रस्नान, बनाना रायडिंग, पॅरासिलिंग तसेच काही पर्यटक घोडेस्वारी, उंटस्वारीचाही आनंद लुटत होते. शनिवार व रविवारच्या या सुट्टीत पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे आल्याने सर्व हॉटेल, लॉजिंग हाउसफुल्ल होत्या. स्टॉल व दुकानावर पर्यटकांची गर्दी दिसून येत होती.

पर्यटकांच्या सुरक्षेकडे लक्ष केंद्रित -बारापत्रे
च्पर्यटकांच्या संख्येबाबत बोलताना महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुरुडचे बंदर निरीक्षक हितेंद्र बारापत्रे म्हणाले की, सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहाण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी दिघी, राजपुरी,व खोरा बंदर या तीन ठिकाणावरून पर्यटक मोठ्या संख्येने किल्ल्यावर येत आहेत.

जंजिरा किल्ला पाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने पर्यटक आल्याने किल्ल्यात प्रवेश करताना थोडा वेळ त्यांना बोटीत थांबावे लागत होते. शिडांच्या बोटीत लाइफ जॅकेट ठेवण्याची सक्ती करण्यात आली असून प्रत्येक प्रवाशाची काळजी घेण्याच्या सूचना बोटमालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच उत्कृष्ट पोहणारेसुद्धा तैनात करण्यात आले असून प्रवाशांची काळजी घेण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे या वेळी बारापत्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
 

किल्ल्यावर आज मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली आहे. पर्यटकांना किल्ल्यावर जाताना थांबावे लागत आहे. वाºयाचा वेग जास्त असल्याने लाटा थडकल्या जात आहेत. त्यामुळे होडीतून उतरताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही पर्यटक किल्ल्याला फेरा मारून किनाºयाकडे फिरकत आहेत.
- नाझ कादरी, व्यवस्थापक, जंजिरा जलवाहतूक

Web Title: Tourist crowd in Murud taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.