नातेवाइकांचा समजूतदारपणा हाच उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 03:21 AM2018-09-21T03:21:22+5:302018-09-21T03:21:38+5:30

वयाची साठी ओलांडलेल्या व्यक्तीचा विसरभोळेपणा हे अल्झायमर आजाराचे लक्षण असू शकते.

That's the solution to relatives' understanding | नातेवाइकांचा समजूतदारपणा हाच उपाय

नातेवाइकांचा समजूतदारपणा हाच उपाय

Next

- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : वयाची साठी ओलांडलेल्या व्यक्तीचा विसरभोळेपणा हे अल्झायमर आजाराचे लक्षण असू शकते. या आजारपणावर अद्याप तरी उपचाराचा शोध लागलेला नाही. त्यामुळे नातेवाइकांचा समजूतदारपणा हाच रुग्णावर महत्त्वाचा उपाय ठरू शकतो. अल्झायमरच्या रुग्णाची मेंदूची कार्यक्षमता कमी होत असल्याने त्याच्या नित्यनियमित जीवनमानावर परिणाम होत असतो. परिणामी, त्याच्या मनाचा उडणारा गोंधळ हाताळण्याचे कौशल्य कुटुंबीयांना असणे आवश्यक आहे.
२१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन म्हणून ओळखला जातो. सन १९०६ मध्ये जर्मनी येथे डॉ. अ‍ॅलोइस अल्झेमर यांनी या आजाराचा शोध लावला. एका महिलेच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेत असताना मेंदूच्या विचित्र अवस्थेमुळे तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानुसार या आजाराला अल्झायमर हे नाव देण्यात आले. सध्या या आजाराने ग्रासलेले रुग्ण जगभरात आढळत असून, वयाची साठी ओलांडलेल्या सुमारे २० टक्के वृद्धांचा कमी-जास्त प्रमाणात त्यात समावेश असण्याची शक्यता आहे. वारंवार विस्मरण होण्यामुळे या रुग्णाचे जीवन जगणे असह्य होऊन जाते. या आजारात स्मरणशक्तीसह विचारशक्तीही कमकुवत होत असते. त्यामुळे मनातल्या वाढत्या गोंधळाचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत असतो; परंतु जगभरातील शास्त्रज्ञांच्या संशोधनानंतरही अल्झायमर या आजारावर उपचार सापडलेला नाही. या आजाराचे नेमके कारणच अद्याप समोर आलेले नसल्याने त्यात अडचणी येत आहेत.
अल्झायमरला सुरुवात झाल्यानंतर पुढील सुमारे दहा ते पंधरा वर्षांनी त्याची लक्षणे दिसून येतात. अशा वेळी सुरुवातीलाच योग्य ती खबरदारी घेतल्यास त्याच्या परिणामाचा वेग कमी करता येऊ शकतो. अल्झायमर झालेल्या रुग्णाला भाषेसह, नित्यनियमित करायचे काम, नातेवाईक व परिचयाच्या व्यक्ती यांचाही विसर पडतो. यामुळे अनेकदा रस्ता भटकणे, बोलताना अडखळणे, ठेवलेल्या वस्तूचा विसर पडणे असे प्रकार त्यांच्याकडून घडत असतात. अशावेळी नातेवाइकांनी त्यांना मानसिक धीर देऊन छोट्या-मोठ्या गोष्टीत मदत करणे गरजेचे असते. त्याकरिता अल्झायमरचे रुग्ण हाताळण्याचे नातेवाइकांनाही प्रशिक्षण आवश्यक आहे.
याकरिता जनजागृतीदेखील होत आहे. अनेकदा अनुवंशिकतेने देखील हा आजार होऊ शकतो. आई किंवा वडिलांना अल्झायमर असल्यास रक्ताद्वारे त्यांच्या मुलांनाही तो होऊ शकतो. तो टाळण्यासाठी मेंदूला सतत चालना देणे, नियमित व्यायाम करणे, योग्य आहार महत्त्वाचा आहे. बालपणी अथवा तारुण्यात डोक्याला झालेली एखादी गंभीर दुखापतदेखील वृद्धापकाळात अल्झायमर होण्याला कारणीभूत ठरू शकते.
>विभक्त कुटुंब व्यवस्था
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांकडून कुटुंबातील वृद्ध व्यक्तीला वेगळे ठेवले जात असल्याचा देखील ताण त्यांच्यावर पडत आहे. मुलांनीच डावलल्याने एकाकी जीवन जगण्याचा प्रसंग त्यांच्यावर येत आहे. परिणामी, अशा एखाद्या वृद्धाला अल्झायमर असल्यास बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
>
>अल्झायमरची लक्षणे
अल्झायमरची सुरुवात ही किरकोळ गोष्टी विसरण्यापासून होते. नेहमी पायवळणी असलेला रस्त्याचा देखील विसर पडतो. निरनिराळे भास होत असल्याने अशी व्यक्ती सतत घाबरते. मेंदूची गती कमी झाल्याने बोलण्यासह लिहिणे, वाचणे याचीही क्षमता कमी होते.
>नेमके कारण अज्ञातच
अल्झायमरच्या आजाराचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, त्यामुळे उपचाराचाही शोध लागलेला नसल्याने रुग्णाची काळजी हाच उपाय महत्त्वाचा मानला जात आहे. शक्यतो वयाच्या साठीनंतर तो होत असल्याने वाढत्या वयाबरोबरच त्याचा धोकाही वाढत जातो.

Web Title: That's the solution to relatives' understanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.