शालेय विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित, जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना दोन-तीन महिन्यांपासून फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 02:07 AM2017-11-20T02:07:17+5:302017-11-20T02:07:24+5:30

पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना शालेय पोषण आहार धान्याचा पुरवठा न झाल्याने, काही शाळांत विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे.

School students disadvantaged from nutrition, Zilla Parishad students have been beaten for two to three months | शालेय विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित, जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना दोन-तीन महिन्यांपासून फटका

शालेय विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित, जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना दोन-तीन महिन्यांपासून फटका

Next

मयूर तांबडे 
पनवेल : पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना शालेय पोषण आहार धान्याचा पुरवठा न झाल्याने, काही शाळांत विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रकार गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू असल्याचे बोलले जात आहे.
शालेय पोषण आहाराचे धान्य आणि इतर साहित्य पुरवठा शाळांना न झाल्याने, तालुक्यातील पहिली ते आठवीमधील हजारो विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार अडचणीत आला आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २५९ शाळा आहेत. काही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उधारीवर काम सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत शाळांमधील शालेय पोषण आहार कसातरी चालू होता. सध्या अनेक शाळेत साहित्याचा साठा संपला आहे. ज्या शाळेत तांदळाचा साठा संपला आहे. त्या शाळांना वाटाणा, उसळ, पोषण आहार वाटप करणे अनिवार्य आहे. शाळेतील शिल्लक साहित्य पूर्णत: संपले आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व्यवस्थित दिला जातो की नाही, हे पाहण्यासाठी शासनाने अधीक्षकांची नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांचे याकडे लक्षच नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. काही मुख्याध्यापक उसनवारीवर साहित्य आणत आहेत; पण पटसंख्या जास्त असल्यामुळे इतके दिवस उधारी ठेवणे कठीण झाले आहे. तीन ते चार महिन्यांपासून अनेक ठिकाणी तांदळाचा पुरवठा केला गेलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहार देणे कठीण झाले आहे.
पुरवठा कंत्राटदार शाळांना तांदूळ व धान्यादी साहित्यांचा पुरवठा करतात. धान्यादी मालात वाटाणा, मटकी यांचा समावेश होतो. जून महिन्यात जिल्हा परिषदेच्या शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात आला होता. दिवाळीपूर्वी काही शाळांत तांदूळ शिल्लक होते. सध्या अनेक शाळेत तांदळाचा व धान्यादी साहित्याचा साठा संपल्याची माहिती मिळत आहे. येथे शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना पोषण आहाराकरिता स्वत:जवळील रु पये खर्च करण्याचे निर्देश दिले असल्याचे समोर आले आहे. काही शाळांत पोषण आहार देणे सुरू आहे, तर अनेक शाळांत सध्या शालेय पोषण आहार बंद असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण हक्क कायद्यात शालेय पोषण आहार हा नियमित वाटप करण्याचा दंडक आहे. तो न दिल्यास कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कारवाईच्या भीतीने शिक्षक शालेय पोषण आहाराबाबत काही बोलण्यास तयार होत नाहीत.
>शालेय पोषण आहारातील धान्य संपल्यामुळे मध्यान्ह भोजनासाठी विद्यार्थ्यांना आपापल्या घराची वाट धरावी लागत आहे किंवा घरून आणलेला डबा खावा लागत आहे.
>नियोजन नसल्याने अडचण
प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणीचे, उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी, विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहाराची योजना सुरू आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ वातावरणात पौष्टिक असा सकस आहार देऊन सुदृढ पिढी घडविणे हासुद्धा यामागील एक उद्देश आहे; पण राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे आज शाळांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.
>पोषण आहाराचे धान्य आपल्याकडे आलेले नाही. शाळा सुरू झाल्यापासून धान्याचे वाटप झालेले नाही. ज्या शाळांकडे धान्य शिल्लक होते, त्यांच्याकडून ते बाकीच्या शाळांना देणे सुरू आहे. याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडे ८ दिवसांपूर्वी कळवलेले आहे. संपलेल्या धान्यांचा शाळानिहाय आढावा घेत आहोत.
- रंजना चास्कर,
गटशिक्षण अधिकारी,
पनवेल पंचायत समिती

Web Title: School students disadvantaged from nutrition, Zilla Parishad students have been beaten for two to three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.