विकासकामांमध्ये पोलिसांचा अडथळा, पदपथांची कामेही अडविली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 05:12 AM2018-12-28T05:12:52+5:302018-12-28T05:13:06+5:30

वाहतुकीला शिस्त लावण्यास अपयशी ठरलेल्या वाहतूक पोलिसांनी शहरातील विकासकामांना अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

Obstruction of the police In the development works | विकासकामांमध्ये पोलिसांचा अडथळा, पदपथांची कामेही अडविली

विकासकामांमध्ये पोलिसांचा अडथळा, पदपथांची कामेही अडविली

Next

- नामदेव मोरे
नवी मुंबई : वाहतुकीला शिस्त लावण्यास अपयशी ठरलेल्या वाहतूक पोलिसांनी शहरातील विकासकामांना अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. पदपथांची कामेही बंद पाडायला सुरुवात केली आहे. आयुक्त रामास्वामी एन. यांनी याविषयी आयुक्त व उपआयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली आहे. अशीच स्थिती राहिली तर अडवणूक करणाऱ्या अधिकाºयांची थेट गृहमंत्रालयाकडे तक्रार केली जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेक ठिकाणी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहतूककोंडी वाढू लागली आहे. रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा, अवैध प्रवासी वाहतूक व इतर समस्या सोडविण्यास पोलिसांना अपयश येऊ लागले आहे. वाहतुकीला शिस्त लावण्याचे सोडून पोलिसांनी महानगरपालिकेच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून शहरात सुरू असलेली पदपथ दुरुस्ती व इतर कामे अडविली जात आहेत. सानपाडा सेक्टर-३० रेल्वेस्थानकासमोरील पदपथ व गटार दुरुस्तीचे काम तीन वेळा बंद करण्यात आले. ठेकेदाराचे साहित्यही उचलून नेण्यात आले आहे. वाशी, तुर्भे व इतर विभागांमध्येही पदपथांची कामे वाहतूक पोलिसांनी थांबविल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे शहरातील विकासकामे ठप्प झाली आहेत. ज्या कामांमुळे वाहतूककोंडी होत नाही. वाहतुकीवर कोणताही परिणाम होत नाही ती कामे अडविण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पोलिसांच्या मनमानीविषयी नागरिक, ठेकेदार, लोकप्रतिनिधी व पालिकेच्या अधिकाºयांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
बुधवारी आयुक्त रामास्वामी एन. यांनी आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्येही अभियांत्रिकी विभागाने वाहतूक पोलिसांच्या मनमानीमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. आयुक्तांनीही याविषयी आश्चर्य व्यक्त केले. ज्या ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल करायचा आहे. रस्ता बंद करून कामे करायची असल्यास पोलिसांना त्याची माहिती देणे आवश्यक आहे; परंतु पदपथ व गटारांच्या कामासाठी त्यांना माहिती देण्याची आवश्यकता नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. वाहतूक पोलीस उपआयुक्त व पोलीस आयुक्तांशीही फोनवरून याविषयी चर्चा केली आहे. महानगरपालिकेच्या कामामध्ये विनाकारण अडथळा होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पोलीस आयुक्त मनमानी करणाºयांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महा पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जर वाहतूक पोलिसांनी पदपथ व गटारांची कामे अडविली, तर थेट गृहमंत्रालयाकडे संबंधितांची तक्रार केली जाणार आहे.

सद्यस्थितीत
३६३४ कामे सुरू
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सद्यस्थितीमध्ये ३६३४ कामे सुरू आहेत. यामध्ये २५ लाखांपेक्षा जास्त रकमेची १६३ कामे, ५ ते २५ लाख रुपयांपर्यंतची ३१० कामे, ५ लाखांपेक्षा कमी रकमेची २६४६ व एक लाखपेक्षा कमी रकमेची ५१५ कामे सुरू आहेत. डिसेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये ३२२ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. स्थायी समितीमध्ये प्रत्येक आठवड्याला कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली जात आहे. सर्व कामे पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. पोलिसांनी अडथळे निर्माण केल्यास कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत.

मनमानीविषयी नाराजी
विकासकामांना अडथळा करून मनमानी करणाºया वाहतूक पोलिसांविषयी नाराजी वाढू लागली आहे. सानपाडा रेल्वेस्थानकासमोर ओला-उबेर टॅक्सीच्या अनधिकृत पार्किंगवर तक्रारी करून कारवाई केली जात नाही. दत्तमंदिर रोडवर चुकीच्या दिशेला लावलेले नो पार्किंगचे बोर्ड हलविले जात नाहीत. तुर्भे इंदिरानगर रोडवरील डम्पर पार्किंगविरोधात कारवाई न करणारे पोलीस पदपथ व गटारांची कामे अडवून नक्की काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.

वाहतूक पोलिसांनी पदपथ व गटारांची कामे अडविल्याचे काही अधिकाºयांनी बैठकीमध्ये निदर्शनास आणून दिले आहे. पदपथ, गटारांची कामे करताना वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होत नाही. यामुळे पोलिसांनी विनाकारण अडवणूक करू नये. यासाठी पोलीस आयुक्त व उपआयुक्तांशी चर्चा केली आहे.
- डॉ. रामास्वामी एन.,
आयुक्त, महानगरपालिका
 

Web Title: Obstruction of the police In the development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.