पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवी मुंबईतील कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार, शिवसैनिक दाखवणार काळे झेंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 05:58 PM2018-02-17T17:58:58+5:302018-02-17T19:10:09+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ( 18 फेब्रुवारी )नवीन मुंबई विमानतळाचं भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. मोदींच्या या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार टाकणार आहे.

Navi Mumbai : Shivsena will boycott the Prime Minister Narendra Modi's program | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवी मुंबईतील कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार, शिवसैनिक दाखवणार काळे झेंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवी मुंबईतील कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार, शिवसैनिक दाखवणार काळे झेंडे

Next

नवी मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ( 18 फेब्रुवारी )नवीन मुंबई विमानतळाचं भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. मोदींच्या या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार टाकणार आहे. या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार नाहीत. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना डावलले जात असल्याचा आरोप करत, आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवसेनेकडून विमानतळ भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, स्थानिक शिवसैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार आहेत. 

अनेक वर्षे रखडलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी होत आहे. राज्याच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारा एक प्रकल्प मार्गी लागल्याबद्दल निश्चितच आनंद आहे. परंतु, विकासात कधीही राजकारण न करणाऱ्या शिवसेनेला भूमिपूजनाच्या कार्यक्रमातून डावलण्याचे राजकारण सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने केल्याच्या निषेधार्थ रविवार (18 फेब्रुवारी) भूमिपूजन कार्यक्रमाच्या ठिकाणी काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला आहे, अशी माहिती शिवसेना संपर्क प्रमुख संजय मोरे यांनी दिली आहे. 

शिवसेनेने विकासाच्या मुद्द्यावर कधीही आडमुठी भूमिका घेतलेली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विकासाच्या मुद्यावर नेहमीच सहकार्याचा हात पुढे केलेला आहे. राज्याच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प मार्गी लागावा, यासाठी शिवसेनेचे स्थानिक खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर आदींनी देखील सातत्याने पाठपुरावा केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा. उ.) एकनाथ शिंदे यांनी देखील वेळोवेळी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मदत केली आहे. राज्यात आणि केंद्रातदेखील शिवसेना सत्तेत सहभागी आहे. असे असतानाही भूमिपूजनाच्या कार्यक्रमपत्रिकेत शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदारांना स्थान देण्यात आलेले नाही. या प्रकाराचा शिवसेना निषेध करत असून कार्यक्रमाच्या ठिकाणी काळे झेंडे दाखवून शिवसैनिक आपल्या भावना व्यक्त करणार असल्याचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिडकोचे उपाध्यक्ष भूषण गगराणी आणि जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना निषेधाचे पत्र दिले असल्याचेही मोरे यांनी सांगितले.

Web Title: Navi Mumbai : Shivsena will boycott the Prime Minister Narendra Modi's program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.