प्रदूषणकारी कंपन्यांमुळे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:43 PM2019-07-18T23:43:39+5:302019-07-18T23:43:47+5:30

तळोजासह ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांकडून रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडले जात आहे.

Health hazards due to polluting companies | प्रदूषणकारी कंपन्यांमुळे आरोग्य धोक्यात

प्रदूषणकारी कंपन्यांमुळे आरोग्य धोक्यात

Next

- नामदेव मोरे 
नवी मुंबई : तळोजासह ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांकडून रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडले जात आहे. यामुळे कासाडी नदीसह खाडीतील प्रदूषणामध्ये वाढ होऊन तेथील जैवविविधतेवर परिणाम झाला आहे. नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. प्रदूषण करणाऱ्या कारखानदारांवर कारवाई होत नसल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईसह पनवेलमधील प्रदूषणाचा विषय गंभीर झाला आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये ठाणे बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणावर स्थानिक आमदारांनी लक्षवेधी मांडली. शासनानेही कारखान्यांकडून प्रदूषण होत असल्याचे मान्य केले आहे. सर्वात गंभीर स्थिती तळोजामधील आहे. २०१७ च्या तपशीलाप्रमाणे ३६५ कारखान्यांची सीईटीपीला जोडणीच झाली नसल्याने तेथील प्रदूषित पाणी नाल्यांमध्ये सोडले जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने १५७ कारखाने प्रदूषित असल्याने सांगून ९३ कारखान्यांना नोटीस देण्यात आली असून ४ कारखाने बंद करण्याच्या नोटीस दिल्या होत्या.
नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही तळोजामध्ये प्रदूषण होत असल्याचे मान्य केले आहे. प्रदूषणामुळे ७२ कंपन्या बंद, ६३ कारखान्यांना नोटीस देण्यात आली असून १०० कंपन्यांना नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनीही आॅक्टोबर २०१७ मध्ये हरित लवादाकडे तक्रार केली आहे. लवादानेही प्रदूषण करणारे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. याविषयी पुढील सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयातही याविषयी याचिका दाखल करण्यात आली आहे. दोन वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही अद्याप अनेक कारखान्यातील पाणी कासाडी नदीमध्ये सोडले जात आहे.
ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधील पाणीही अनेक वेळा नाल्यामध्ये सोडले जात आहे. कोपरखैरणे, कोपरी व जुईनगर नाल्यामध्ये दूषित पाणी सोडले जाते. पाऊस जास्त झाला की कारखान्यातील दूषित पाणीही नाल्यात सोडले जाते. एमआयडीसीने पावणे येथे एचटीपी केंद्र उभारले आहे. परंतु येथील यंत्रणा जुनी झाली असल्यामुळे योग्यपद्धतीने पाण्यावर प्रक्रिया होत नाही. प्रक्रिया केलेले पाणी पाइपद्वारे खाडीमध्ये सोडले जात आहे. परंतु पाइप जुनी झाली असल्यामुळे अनेक ठिकाणी गळती सुरू आहे. अधिवेशनामध्ये या विषयावर आवाज उठविल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योजकांची बैठक घेऊन पाइपची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एमआयडीसीमधील हवा प्रदूषण कमी झाले असले तरी जलप्रदूषण काही प्रमाणात सुरू असल्याची माहितीही अधिकाºयांनी दिली. नगरसेविका दिव्या गायकवाड २०१७ पासून प्रदूषण करणाºया कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी करत असून प्रशासन योग्यपद्धतीने प्रतिसाद देत नसल्यामुळे हरित लवादाकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
>हरित लवादाचा आदेश
देशभरातील प्रदूषणकारी उद्योग येत्या तीन महिन्यांत बंद करा, असा आदेश केंद्रीय हरित लवादाने १६ जुलैला दिला आहे. विकासाच्या नावाखाली आम्ही उद्योगांना नागरिकांच्या जीवाशी खेळू देणार नाही, असे आदेशात स्पष्ट केले आहे. नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये जे कारखानदार सातत्याने नियमांचे उल्लंघन करत आहेत, ज्यांना बंदीचे आदेश हरित लवादाने दिले आहेत, ते आता बंद करणार का? याविषयी उत्सुकता आहे.
>कासाडीला नाल्याचे स्वरूप
तळोजातील कारखान्यांच्या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका कासाडी नदीला बसला आहे. नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. रसायनमिश्रीत पाणी सोडल्यामुळे येथील जैवविविधता धोक्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते योगेश पगडे व इतरांनी नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी चळवळ उभी केली आहे. दूषित पाणी सोडणे थांबविले नाही तर कासाडीमधील जैवविविधतेचे अस्तित्व संपण्याची शक्यता आहे.
>तळोजातील कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. २०१७ मध्ये हरित लवादाकडे तक्रार केली. लवादानेही नोटीस व सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करणाºया कारखान्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे.
- अरविंद म्हात्रे, नगरसेवक, पनवेल
>नवी मुंबईमधील प्रदूषणाविषयी २०१७ पासून पाठपुरावा करत आहोत. प्रशासन कडक कारवाई करत नाही. यामुळे आम्ही लवकरच हरित लवादाकडे दाद मागणार आहोत.
- वैभव गायकवाड,
माजी नगरसेवक

Web Title: Health hazards due to polluting companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.