बडोदा बँक प्रकरण : पुराव्याअभावी हाजीदची १९ गुन्ह्यांतून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 06:51 AM2017-12-11T06:51:00+5:302017-12-11T06:51:11+5:30

बडोदा बँक लुटीप्रकरणी अटकेत असलेल्या हाजीद मिर्जा बेग १९ गुन्ह्यांत पुराव्याअभावी निर्दोष सुटलेला आहे. गुन्हा करते वेळी मागे कसलाही पुरावे राहणार नाहीत, याची खबरदारी तो घेत असतो.

 Baroda Bank Case: Hajid gets acquitted from absenteeism for lack of evidence | बडोदा बँक प्रकरण : पुराव्याअभावी हाजीदची १९ गुन्ह्यांतून सुटका

बडोदा बँक प्रकरण : पुराव्याअभावी हाजीदची १९ गुन्ह्यांतून सुटका

Next

सूर्यकांत वाघमारे / लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : बडोदा बँक लुटीप्रकरणी अटकेत असलेल्या हाजीद मिर्जा बेग १९ गुन्ह्यांत पुराव्याअभावी निर्दोष सुटलेला आहे. गुन्हा करते वेळी मागे कसलाही पुरावे राहणार नाहीत, याची खबरदारी तो घेत असतो. त्यानुसार बडोदा बँक लुटतानाही त्याने बाळगलेल्या खबरदारीमुळे त्याच्यावरील गुन्हा सिद्ध करण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण होण्याची शक्यता आहे.
जुईनगर येथील बडोदा बँक लुटल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे. हाजीद अली सब्दर अली मिर्जा बेग उर्फ साजीद उर्फ लंगड्या (४५) हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून त्याच्यावर राज्यात व राज्याबाहेर ८० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी १९ गुन्ह्यांत त्याची निर्दोष मुक्तता झाली असून, उर्वरित गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. हाजीद हा सराईत गुन्हेगार असून, गेली अनेक वर्षांपासून तो घरफोडीची टोळी चालवत आहे. या टोळीत त्याच्या इतर चार साथीदारांचा समावेश असून, त्यांनी मुंबईसह, गुजरात व पुणे याठिकाणी सर्वाधिक घरफोड्या केल्या आहेत. त्याला अनेकदा अटक होऊनही त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त होऊ शकलेला नाही. शिवाय त्याच्याविरोधात सबळ पुरावे जमवण्यातही पोलीस कमी पडल्याने १९ गुन्ह्यांत त्याची निर्दोष सुटका झालेली आहे. त्यामुळे अटक केलेल्या टोळीविरोधातले सबळ पुरावे जमवण्याची कसरत पोलिसांना करावी लागणार आहे.
एखादा गुन्हा घडल्यास गुन्हेगाराच्या शोधासाठी पोलिसांना मोबाइलचा तपास महत्त्वाचा ठरत असतो. पूर्वानुभवानुसार याची जाणीव हाजीदला असल्याने तो पकडले जाऊ नये याकरिता मोबाइलचा वापर टाळायचा. आजवर केलेल्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये त्याने वॉकीटॉकी वापरल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे, तर साथीदारांना देखील तो घटनास्थळावर मोबाइल वापरू देत नव्हता. त्याशिवाय गुन्ह्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही असल्यास त्यामध्ये आपण दिसणार नाही याचीही खबरदारी टोळीकडून घेतली जायची; परंतु बडोदा बँक लुटून पळून जाण्यासाठी त्यांनी जो मार्ग वापरला त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये त्यांच्या हालचाली दिसून आल्या आहेत. भुयार खोदण्यासाठी वापरलेला भाड्याचा गाळादेखील फडक्याने पुसून वास्तव्याचे पुरावे मिटवण्याचाही प्रयत्न त्यांनी केल्याचे समजते. मात्र, पोलिसांनी पूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या तपास करून गुन्हा उघडकीस आणला आहे. यानंतरही हाजीद व त्याच्या टोळीवर तो सिद्ध करण्यासाठी अधिकाधिक पुरावे जमवून न्यायालयापुढे त्यांना दोषी ठरवण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

हाजीद अली मिर्जा बेग ऊर्फ साजीद याने मागील काही वर्षांपासून स्वत:चा मोबाइल फोन वापरलेला नाही. ठरावीक काळासाठी एखादा चोरीचा मोबाइल वापरून तो फेकून द्यायचा, तर साथीदारांसोबत संपर्क साधण्यासाठीही मोबाइलऐवजी पब्लिक टेलिफोन वापरायचा; परंतु तांत्रिक तपासात एक पाऊल पुढे असलेल्या नवी मुंबई पोलिसांच्या पथकापासून त्याची चलाखी टिकली नाही.

Web Title:  Baroda Bank Case: Hajid gets acquitted from absenteeism for lack of evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.