'तिच्यासोबत जे काही झाले ते चुकीचे'; प्रियंका गांधींनी घेतली साक्षी मलिकची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 08:05 PM2023-12-22T20:05:49+5:302023-12-22T20:23:48+5:30

महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने गुरुवारी (काल) कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती.

Wrestlers Sakshi Malik and Bajrang Punia met Congress leader Priyanka Gandhi today in Delhi | 'तिच्यासोबत जे काही झाले ते चुकीचे'; प्रियंका गांधींनी घेतली साक्षी मलिकची भेट

'तिच्यासोबत जे काही झाले ते चुकीचे'; प्रियंका गांधींनी घेतली साक्षी मलिकची भेट

नवी दिल्ली- महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने गुरुवारी (काल) कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज साक्षी मलिक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनिया देखील उपस्थित होता.

भारतीय कुस्ती महासंघ (WFI)च्या निवडणुका काल गुरुवारी पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले आहेत. यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने पत्रकार परिषद घेऊन कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याची मोठी घोषणा केली. 

निवडणुकीत ब्रिजभूषण यांचा माणूस विजयी झाला, असं साक्षी मलिकने सांगितले. यावेळी साक्षीला अश्रू देखील अनावर झाले. कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर साक्षी मलिकला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. आज संध्याकाळी उशिरा काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी साक्षी मलिकला भेटायला आल्या. दोघांची ही भेट साक्षीच्या घरीच झाली. यावेळी प्रियंका गांधींनी साक्षी मलिकच्या भावना ऐकून घेतल्या. या भेटीनंतर मी एक महिला म्हणून इथे आली आहे, कारण साक्षीसोबत जे काही झाले ते चुकीचे आहे, असं प्रियंका गांधींनी सांगितले.

कोण आहेत संजय सिंह?

संजय सिंह मूळचे पूर्व उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या ते कुटुंबासह वाराणसीमध्ये राहतात. संजय सिंह दीड दशकांहून अधिक काळापासून कुस्ती संघटनेशी जोडले गेले असून ते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे मानले जातात. २००८ पासून ते वाराणसी कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. याशिवाय ते कुस्तीगीर संघटनेच्या राष्ट्रीय सहसचिवपदाची जबाबदारीही पार पाडत आहेत. पूर्वांचलच्या महिला कुस्तीपटूंना पुढे आणण्यात संजयसिंग बबलू यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते.

बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कोणते आरोप?

या वर्षाच्या सुरुवातीला देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले होते आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. या कुस्तीपटूंमध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांचा समावेश होता. महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप या सर्वांनी केला होता. यामुळे बृजभूषण यांना आपले पद सोडावे लागले, तेव्हापासून हे पद रिक्त होते.

Web Title: Wrestlers Sakshi Malik and Bajrang Punia met Congress leader Priyanka Gandhi today in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.