तीन दिवस पोटात अन्नाचा कण नाही; महिलेनं अन्न अन्न करत सोडला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 08:27 PM2018-06-04T20:27:47+5:302018-06-04T20:27:47+5:30

गिरिडिह जिल्ह्यातल्या डुमरी भागात एका 59 वर्षीय महिलेचा भूकबळी गेला आहे.

Woman dies of starvation in Dumri; no food since 3 days, no ration card | तीन दिवस पोटात अन्नाचा कण नाही; महिलेनं अन्न अन्न करत सोडला जीव

तीन दिवस पोटात अन्नाचा कण नाही; महिलेनं अन्न अन्न करत सोडला जीव

Next

झारखंड- गिरिडिह जिल्ह्यातल्या डुमरी भागात एका 59 वर्षीय महिलेचा भूकबळी गेला आहे. काल या महिलेचा अन्नावाचून जीव गेला. मृत महिलेची ओळख पटली असून, तिचं नाव सावित्री देवी आहे. सावित्री देवी या गेल्या तीन दिवसांपासून रेशन कार्ड मिळवण्यासाठी रेशनिंग ऑफिसमध्ये फे-या मारत होत्या. परंतु मुजोर अधिका-यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.

हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या सावित्री देवींना रेशनिंगच्या धान्याचाच आधार होता. त्यासाठी त्यांनी तीन दिवस रेशनिंग ऑफिसचा फेरफटका मारला, पण तरीही त्यांना धान्य काही उपलब्ध झाले नाही. तीन दिवस पोटात अन्नाचा कण नसल्यानं सावित्री देवींना अखेर अन्न अन्न करत जीव सोडावा लागला. या सर्व प्रकाराला रेशनिंग ऑफिसर जबाबदार असल्याचा आरोप वैद्यकीय अधिकारी शीतल प्रसाद यांनी केला आहे.  दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

सासूच्या मृत्यूबाबत सून सरस्वती देवींनी दुःख व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या, सावित्री देवी गेल्या तीन दिवसांपासून रेशन कार्डच्या मागणीसाठी रेशनिंग ऑफिसच्या फेरफटका मारत होत्या. परंतु त्याकडे अधिका-यांनी दुर्लक्ष केलं. सावित्री देवींना गेल्या तीन दिवसांपासून अन्न मिळालं नाही. दोन्ही मुलं अंगमेहनत करून रोजी-रोटी मिळवतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुलं त्यांच्या संपर्कात नव्हती. त्यामुळे परिस्थिती बिघडली. सावित्री देवी या भीक मागून अन्न खात असल्याचंही सून सरस्वती देवीनं सांगितलं आहे.

या घटनेची डुमरीचे आमदार जगरनाथ महतो यांनी गंभीर दखल घेतली आहे. अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळेच सावित्री देवींचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनीही केला. विधानसभेत यासंदर्भात आम्ही आवाज उठवू, असंही ते म्हणाले आहेत. झारखंडमध्ये भूकबळीची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षीसुद्धा राज्यातील सिमडेगा जिल्ह्यात एका 11 वर्षीय मुलीचा भूकबळी गेला होता. त्याच्या काही काळानंतर 43 वर्षीय रिक्षा चालकाचाही अन्नावाचून मृत्यू झाला होता. सिमडेगामध्ये रेशन कार्डला आधार कार्ड लिंक न केल्यामुळे अनेकांना धान्य मिळालं नव्हतं. त्यामुळे 28 सप्टेंबर 2017रोजी एका चिमुकलीचाही मृत्यू झाला होता. 

Web Title: Woman dies of starvation in Dumri; no food since 3 days, no ration card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.