का मिळाली या 4 राज्यमंत्र्यांना कॅबीनेट ची बक्षिसी ?

By सुमेध उघडे | Published: September 4, 2017 04:06 PM2017-09-04T16:06:22+5:302017-09-04T16:19:35+5:30

काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात 4 राज्यमंत्र्यांना बढती देऊन कॅबीनेट मंत्रीपद देण्यात आले. यात निर्मला सीतारमण, धर्मेद्र प्रधान, मुख्तार अब्बास नकवी आणि पियुष गोयल यांचा समावेश आहे. जाणून घेऊ काय आहेत यांची वैशिट्य. 

Why the 4 state ministers gets the cabinet ministry prize? |  का मिळाली या 4 राज्यमंत्र्यांना कॅबीनेट ची बक्षिसी ?

 का मिळाली या 4 राज्यमंत्र्यांना कॅबीनेट ची बक्षिसी ?

Next

आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात 4राज्यमंत्र्यांना बढती देऊन कॅबीनेट मंत्री देण्यात आले. यात निर्मला सीतारमण, धर्मेद्र प्रधान, मुख्तार अब्बास नकवी आणि पियुष गोयल यांचा समावेश आहे. जाणून घेऊ काय आहेत यांची वैशिट्य. 

1. निर्मला सीतारमण
निर्मला सीतारमण या भारताच्या स्वतंत्र प्रभार असणा-या पहिल्या मंत्री आहेत. या आधी इंदिरा गांधी यांनी प्रधानमंत्री पदी असताना २ वर्ष संरक्षण मंत्रालयाचा कारभार पाहिला होता. वैंकेया नायडू यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर सीतारमण यांच्या कॅबीनेट समावेशाने त्या आता भाजपचा दक्षिण भारतातील चेहरा असतील. त्यांच्या बाबतीत एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांचा संबंध दक्षिण भारतातील तीन मोठ्या राज्यांशी येतो. तामिळनाडू मध्ये त्यांचा जन्म झाला, कर्नाटकातून त्या राज्यसभेवर आहेत तर आंध्र प्रदेशात त्यांची सासरवाडी आहे. 
सीतारमण यांनी 2006 मध्ये भाजप मध्ये प्रवेश केला. सरकार येण्याआधी पक्ष प्रवक्ते म्हणून त्या नेहमीच पक्षाची बाजू अत्यंत नम्रपणे मांडताना दिसत. केंद्रात सरकार येताच त्यांना 2014 मध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य राहिलेल्या सीतारमण या दिल्ली येथील बहुचर्चित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत. 

2. धर्मेंद्र प्रधान
या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वात प्रथम धर्मेंद्र प्रधान यांनी शपथ घेतली. या आधी त्यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार होता. ओडीसा मधून येणा-या प्रधान यांना कॅबीनेट मध्ये घेण्यामागे पक्षाला ओडीसामध्ये मजबुत करणे हा उद्देश आहे. मागील काही दिवसांपासून बीजेपीचे ओडीसामध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रधान यांच्या बढतीकडे पाहता येईल. 
सरकारमधील युवा चेह-या मधील एक असणा-या प्रधान यांना प्रधानमंत्र्यांची सर्वात प्रिय ' उज्वला' योजना यशस्वीरीत्या राबविण्याचे श्रेय जाते.  पेट्रोलियम मंत्रालयांचे काम सांभाळताना प्रधान यांनी  एक वर्षात 704 जिल्ह्यात 2करोड 80 लाख नवीन बीपीएल कनेक्शन दिले. 'उज्वला' योजनेच्या यशस्वीतेमुळे आणि विविध राज्यातील निवडणुकीच्या प्रचारात त्यांच्या सक्रीय सहभागाचेच हे फलित आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. 

3. मुख्तार अब्बास नक़वी
मुख्तार अब्बास नक़वी हे मोदी सरकार मधील एकमेव मुस्लीम चेहरा आहेत. या आधीही त्यांची ओळख भाजपामधील प्रभावी मुस्लीम चेहरा म्हणून राहिली आहे. 2016 मध्ये नकवी यांना  नजमा हेपतुल्ला यांच्या जागेवर अल्पसंख्यांक मंत्रालयाचा प्रभार देण्यात आला होता. 
आणीबाणीच्या काळात 17 वर्षाचे असताना नकवी यांना जेल झाली होती. अनेक वर्षांपासून नकवी  भाजपासोबत जोडले गलेले आहेत. वाजपेयी सरकार मध्येही ते सूचना प्रसारण राज्यमंत्री होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रवादी संघटना मानणा-या नकवी यांच्या मते संघ व भाजप यांच्यात एकाच मुद्द्यावर वेगवेगळी मते असू शकतात. 

4. पीयूष गोयल
भारत सरकारचे नवे रेल्वे मंत्री म्हणून पीयूष गोयल आता काम पाहतील. या सोबतच त्यांच्याकडे कोळसा मंत्रालयाचा अतिरिक्त कारभारही असेल. पीयूष गोयल हे वाजपेयी सरकारमध्ये मंत्री असणारे वेद प्रकाश गोयल यांचे चिरंजीव आहेत. इनवेस्टमेंट बँकर म्हणून करीयरची सुरुवात करणा-या  गोयल यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदाच्या बोर्डवर काम केले आहे. 
गोयल यांनी उर्जामंत्री म्हणून खूपच प्रभावशाली काम केले आहे. यामुळेच या सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 'प्रत्येक गावात, प्रत्येक घरात वीज' या प्रधानमंत्र्यांच्या महत्वाकांशी योजनेला लागू करण्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यासोबतच राज्य सरकारसोबत काम करत स्वस्त दरात एलईडी चे वितरण करण्याचे कार्यसुद्धा त्यांच्या काळात प्रगती पथावर राहिले आहे. नियमित तोट्यात असणा-या व सध्या अपघाताच्या मालिकांमुळे रेल्वे मंत्रालयात खूप मोठी आव्हाने आहेत. ही आव्हाने ते कशाप्रकारे पेलतात हे पाहणे उत्सुकतेचे राहील. 

Web Title: Why the 4 state ministers gets the cabinet ministry prize?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.