उद्या बजेट ऐकायचंय? मग या संज्ञा तुम्हाला माहिती असल्याच पाहिजेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 02:04 PM2018-01-31T14:04:15+5:302018-01-31T14:12:58+5:30

अर्थसंकल्पाचे भाषण एेकताना हे मुद्दे लक्षात ठेवा, या संज्ञा माहिती असल्यावर बजेट एेकणं सोपं होऊन जाईल.

Want to hear the budget tomorrow? Then you should know these terms ... | उद्या बजेट ऐकायचंय? मग या संज्ञा तुम्हाला माहिती असल्याच पाहिजेत...

उद्या बजेट ऐकायचंय? मग या संज्ञा तुम्हाला माहिती असल्याच पाहिजेत...

googlenewsNext

मुंबई- केंद्रीय अर्थसंकल्पाचे भाषण इंग्रजीमध्ये असल्यामुळे बहुतांशवेळा त्यातील शब्द आपल्याला माहिती नसतात. किंवा अनेकवेळा इंग्रजी संज्ञा सहजगत्या वापरल्या जात असल्या तरी त्यांचा मराठी अर्थ आपल्याला माहिती नसतो. पण या संज्ञांची माहिती आजच करुन घेतली तर उद्या अर्थसंकल्पीय भाषण ऐकणं सोपं होऊन जाईल.

1) युनियन बजेट- याचा शब्दशः अर्थ संघराज्याचा अर्थसंकल्प. भारत सरकारने आपल्या सर्व उत्पन्न स्रोतातून प्राप्त झालेल्या पैशाची दिलेली माहिती आणि येत्या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या प्रकारे निधीचा खर्च होईल याचा लेखाजोखा या अर्थसंकल्पामध्ये मांडलेला असतो.

2) डायरेक्ट-इनडायरेक्ट टॅक्स- प्रत्यक्ष कर म्हणजे जो थेट व्यक्ती आणि संस्थांना भरावा लागतो. आयकर, कार्पोरेट कर प्रत्यक्ष कर आहेत. अप्रत्यक्ष कर म्हणजे जो वस्तू आणि सेवांवर लादला जातो. एखादी वस्तू किंवा सेवा घेताना ग्राहकाद्वारे भरला जाणारा कर म्हणजे अप्रत्यक्ष कर. यामध्ये अबकारी कर सीमाशुल्क कर यांचा समावेश होतो.

3) जीएसटी- वस्तू आणि सेवा यांच्या पुरवठ्यावर लादण्यात आलेला कोणताही कर म्हणजे वस्तू-सेवा कर अशी जीएसटीची व्याख्या करण्यात आली आहे. यामध्ये मानवी उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या अल्कोहोलला वगळण्यात आले आहे. 'गुडस्' म्हणजे वस्तू यामध्ये पैसे वगळता कोणतीही चल संपत्ती, पिकं यांचा समावेश होतो. सर्विस या संज्ञेमध्ये वस्तू, पैसा वगळून सर्व सेवांचा समावेश होतो.

4) कस्टम्स ड्युटी-  हा कर देशातून निर्यात होणाऱ्या आणि आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर लावला जातो. हा कर त्या वस्तूला आयात करणारा किंवा निर्यात करणारा व्यक्ती भरत असतो. बहुतांशवेळा त्याचा भार वस्तू खरेदी करणाऱ्या व्यक्तीवर टाकला जातो.

5) फिस्कल डेफिसिट- म्हणजे वित्तिय तूट. वित्तीय तूट म्हणजे सरकारपाशी अपेक्षित असलेला कर्जवगळता निधी(Budgeted Receipts) आणि अंदाजलेला खर्च (Budgeted Expenditure) यांच्यातील फरक म्हणजे वित्तीय तूट होय. फिसकल डेफिसिट याचा मराठीत अर्थ वित्तीय तूट असा आहे. जेव्हा एकूण खर्च "नॉन बॉरोड रिसिट' म्हणजे कर्जाशिवाय इतर जमेहून अधिक होतो, तेव्हा त्या तुटीला वित्तीय तूट म्हणतात. वित्तीय तूट भरून काढायला सरकारला जनतेकडून नवीन कर्ज घ्यावे लागते.

6) रेवेन्यू डेफिसिट-  महसुली उत्पन्नातून महसुली खर्च वजा केल्यास महसुली तुट समजते. महसुली तूट म्हणजे महसुली उत्पन्न वजा महसुली खर्च होय. महसुली उत्पन्नात सरकारचे निव्वळ कर आणि करोत्तर उत्पन्न याचा समावेश होतो. तर महसुली खर्चात योजना खर्च व योजना-बाह्य खर्च यांचा समावेश होतो.

7) प्रायमरी डेफिसिट-  वित्तिय तुटीतून कर्जावर द्यावे लागणारे व्याज वगळल्यास प्रायमरी डेफिसिट.

8) फिस्कल पॉलिसी-  म्हणजे वित्तिय धोरण. महसूल उत्पन्न आणि खर्च याबाबत सरकारचा एकूण दृष्टीकोन यामध्ये अपेक्षित आहे. 

9) फायनान्स बिल- म्हणजे अर्थविधेयक. अर्थसंकल्प मांडल्यावर तात्काळ हे विधेयक मांडले जाते. अर्थसंकल्पात सुचवलेले कर, त्यांचे नियोजन यामध्ये सुधारणा किंवा बदल याबाबत सर्व माहिती यात असते.

10) डिसइनव्हेस्टमेंट- सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि महामंडळांचे सरकारकडे असलेले समभाग विकून त्यातून निधीची निर्मिती करणे म्हणजे निर्गुंतवणूक होय.

Web Title: Want to hear the budget tomorrow? Then you should know these terms ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.