५०० कोटींचं भाजपा ऑफिस बांधलं, पण रामलल्ला तंबूतच; मोदींवर आणखी एक मित्र चिडला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 06:27 PM2018-10-22T18:27:30+5:302018-10-22T18:28:30+5:30

आपल्याच लोकांनी कोंडी केल्यानं मोदी सरकारची डोकेदुखी वाढली असतानाच, भाजपाचा मोठा आधार मानल्या जाणाऱ्या विश्व हिंदू परिषदेनंही मोदी-शहांना धक्का दिलाय.

VHP leader Pravin Togadia hits out at modi and bjp over ram mandir issue in ayodhya | ५०० कोटींचं भाजपा ऑफिस बांधलं, पण रामलल्ला तंबूतच; मोदींवर आणखी एक मित्र चिडला!

५०० कोटींचं भाजपा ऑफिस बांधलं, पण रामलल्ला तंबूतच; मोदींवर आणखी एक मित्र चिडला!

googlenewsNext

फैजाबादः अयोध्येतील राम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर दबाव वाढवला आहे. दुसरीकडे, भाजपासोबत सत्तेत बसलेल्या शिवसेनेनंही 'जय श्रीराम', 'चलो अयोध्या'चा नारा देऊन शंख फुंकलाय. आपल्याच लोकांनी कोंडी केल्यानं मोदी सरकारची डोकेदुखी वाढली असतानाच, भाजपाचा मोठा आधार मानल्या जाणाऱ्या विश्व हिंदू परिषदेनंही मोदी-शहांना धक्का दिलाय. राम मंदिर नाही, तर मत नाही, असा इशारा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी दिला आहे. 

भाजपाने दिल्लीत ५०० कोटी रुपये खर्चून पक्षाचं मुख्यालय बांधलं. पण, रामलल्ला अजूनही तंबूतच आहे. आता सरकार लखनऊमध्ये बाबरी मशीद बांधण्याची तयारी करतंय आणि राम मंदिराचं त्यांचं आश्वासन हा 'जुमला'च ठरलाय, असं टीकास्त्र प्रवीण तोगडिया यांनी  सोडलं. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा कायदा संसदेने करावा, या मागणीसाठी गेली ३२ वर्षं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा आणि विहिंप आंदोलन करत होते. पण, बहुमताचं सरकार आल्यानंतर हे आता रामाचं दर्शन घ्यायलाही येत नाहीत, अशी चपराक त्यांनी लगावली. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवरही त्यांनी निशाणा साधला. विहिंपच्या कार्यकर्त्यांना अयोध्येत राहू दिलं नाही, आमच्यासाठी धान्य घेऊन येणारे ट्रक रोखण्यात आले, असे प्रकार मुलायम सरकारच्या काळात झाले होते, असं त्यांनी सुनावलं. 

काँग्रेस मुक्त भारताचा नारा देताना भाजपाच काँग्रेसयुक्त झाल्याची टिप्पणीही तोगडिया यांनी केली. काँग्रेसमध्ये ज्यांना कुणी विचारत नव्हतं, त्यांना भाजपामध्ये मोठ्या पदांवर बसवण्यात आलं. या उलट, खरा भाजपा कार्यकर्ता राम मंदिराचं स्वप्न पाहून आजही अश्रू ढाळतोय, असा टोला त्यांनी हाणला. त्यामुळे आता विश्व हिंदू परिषदेची 'मत की बात' मोदी-शहा किती गांभीर्याने घेतात आणि त्यांचं मनपरिवर्तन करण्यासाठी काय करतात, हे पाहावं लागेल.  

Web Title: VHP leader Pravin Togadia hits out at modi and bjp over ram mandir issue in ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.