काळ्या पैशांबाबत ‘हाताची घडी तोंडावर बोट’, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 07:47 AM2018-11-27T07:47:10+5:302018-11-27T07:48:53+5:30

Black Money : भ्रष्टाचार, काळ्या पैशावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray slams PM Narendra Modi over Black Money Issue | काळ्या पैशांबाबत ‘हाताची घडी तोंडावर बोट’, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

काळ्या पैशांबाबत ‘हाताची घडी तोंडावर बोट’, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Next
ठळक मुद्दे'काळ्या पैशाबाबत निवडणुकीत केलेला ‘वादा’ खोटा होता मानायचे का?''सरकारच्या नकारघंटेमुळे काळ्या पैशाचे गूढ आणखीनच वाढते''काळा पैसा हा देशाच्या अर्थव्यवस्थेला झालेला कॅन्सर'

मुंबई - भ्रष्टाचार, काळ्या पैशावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ''काळ्या पैशाविषयीचा तपशील उघड केला तर तपास प्रक्रियेवर ‘प्रभाव’ पडेल हा सरकारचा ‘दावा’ खरा मानला तर मग निवडणुकीत केलेला ‘वादा’ खोटा होता असे मानायचे का? असेच तुणतुणे दुसऱ्या कोणी वाजवले असते तर दाल में कुछ ‘काला’ है अशी हाकाटी ज्यांनी पिटली असती तेच आता सत्तेत आहेत आणि त्याच तुणतुण्याचा आधार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर परदेशातून आणलेल्या काळ्या पैशाच्या तपशिलाची मागणी केली तर सरकारच ‘नकारघंटा’ वाजवते तेव्हा काळ्या पैशाचे गूढ आणखीनच वाढते'', असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून सोडले आहे.

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे
- आपल्या देशातील काळा पैसा हेदेखील असेच एक रहस्य बनून राहिले आहे. मग तो काळा पैसा देशातील असो किंवा देशातून परदेशात गेलेला. या रहस्याचा पर्दाफाश करण्याचे जोरदार आश्वासन सध्याच्या राज्यकर्त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत दिले होते. 
- परदेशातील काळा पैसा हिंदुस्थानात आणून प्रत्येक देशवासीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचा वादाही करण्यात आला होता. जनतेनेही त्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पारड्यात भरभरून मतदान टाकले होते. मात्र आता पुढील लोकसभा निवडणूक तोंडावर आली तरी ना देशातील काळा पैसा बाहेर आला ना परदेशातील किती काळा पैसा हिंदुस्थानात  आला हे जाहीर झाले. 
- परदेशातील काळा पैसा देशात आणणे आणि नागरिकांच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करणे या दोन्ही बाबतीत सत्ताधाऱ्यांची तोंडे बंदच आहेत. पुन्हा ती उघडायचा प्रयत्न ‘आरटीआय’ कार्यकर्त्यांनी केला, पण तो अयशस्वीच ठरला. 
- आता तर खुद्द केंद्रीय माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी केली. तरीही काळ्या पैशाची माहिती देण्याबाबत ‘पीएमओ’ने नकारघंटाच वाजवली आहे. 
- एका आरटीआय संदर्भात केंद्रीय माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला परदेशातून आणलेल्या काळ्या पैशाचा तपशील देण्याविषयी मागणी केली होती. मात्र पंतप्रधान कार्यालयाने अशी माहिती उघड करता येणार नाही, असे सांगून ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवले आहे.
-   काळ्या पैशाविषयीचा तपशील उघड केला तर तपास प्रक्रियेवर ‘प्रभाव’ पडेल हा सरकारचा ‘दावा’ खरा मानला तर मग निवडणुकीत केलेला ‘वादा’ खोटा होता असे मानायचे का? कारण काळ्या पैशांची माहिती देण्याबाबत आता ज्या तांत्रिक, कायदेशीर तरतुदींवर बोट ठेवले जात आहे. त्या तरतुदी निवडणुकीत आश्वासन देण्यापूर्वीही होत्या. तरीही तोंड भरून आश्वासन दिलेच ना? 
- काळा पैसा हा देशाच्या अर्थव्यवस्थेला झालेला कॅन्सर आहे आणि त्याने देशच पोखरून काढला आहे. सरकार ही माहिती देण्यास नकार देत असले तरी इतर आंतरराष्ट्रीय मान्यवर संस्थांनी त्याचे काही तपशील जाहीर केले आहेत. ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी स्टेटसच्या अहवालानुसार 2002 ते 2011 या कालावधीत विदेशात गेलेल्या काळ्या धनाचा आकडा 343 अब्ज डॉलर्स एवढा होता. त्याच वेळी 2005 ते 2014 या काळात सुमारे 770 अब्ज डॉलर्स एवढा काळा पैसा हिंदुस्थानात आला. 
- गंमत म्हणजे मागील चार वर्षांत आपल्या देशातून स्विस बँकेत पैसे जमा करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे एक अहवाल सांगतो. म्हणजे ज्या स्विस बँकेतील काळा पैसा देशात आणण्याचे वादे केले गेले त्याच स्विस बँकेत गेल्या चार वर्षांत सात हजार कोटी जमा झाले आहेत. त्यामागील कारणे वेगळी असू शकतात .

Web Title: Uddhav Thackeray slams PM Narendra Modi over Black Money Issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.