सरकार बदलण्याची वेळ आली आहे, शरद पवार यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 05:02 AM2018-09-11T05:02:12+5:302018-09-11T05:02:26+5:30

देशभर पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले आहेत. मात्र, पंतप्रधान नेहमीप्रमाणे गप्प बसले आहेत.

The time has come to change the government, Sharad Pawar's attack | सरकार बदलण्याची वेळ आली आहे, शरद पवार यांचा हल्लाबोल

सरकार बदलण्याची वेळ आली आहे, शरद पवार यांचा हल्लाबोल

Next

- सुरेश भटेवरा 

नवी दिल्ली : देशभर पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले आहेत. मात्र, पंतप्रधान नेहमीप्रमाणे गप्प बसले आहेत. ते कोणत्या जगात राहतात, हेच समजत नाही. देशभर जनतेच्या मनात आज संतापाच्या ज्वाला उसळल्या असताना पंतप्रधान मोदी एक शब्दही बोलायला तयार नाहीत. सारे विरोधक आज त्याची जाणीव करून देण्यासाठीच रस्त्यावर उतरले आहेत, अशा आक्रमक स्वरात सरकारला ललकारीत राहुल गांधींनी रामलीला मैदानावर २१ विरोधी पक्षांचा भारत बंद यशस्वी झाल्याची ग्वाही दिली.
विरोधकांच्या संयुक्त बंदच्या निमित्ताने आयोजित धरणे कार्यक्रमात सोनिया गांधी काही काळ अवश्य सहभागी झाल्या. मात्र, त्यांनी भाषण केले नाही. त्या मंचावर आल्या तेव्हा सर्वांनाच असे वाटले की विरोधकांच्या संयुक्त आघाडीचे नेतृत्व त्याच करणार आहेत. मात्र, थोड्याच वेळात त्यांनी हा मंच सोडला व आपल्या निवासस्थानी निघून गेल्या. यानंतर रामलीला मैदानावर विरोधी पक्षांचे नेते जसजसे एकजूट होऊ लागले तेव्हा भारत बंद कार्यक्रमात विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधीच करणार आहेत, हे स्पष्ट झाले. व्यासपीठावर बोलणाऱ्या वक्त्यांचा क्रमही त्याच पद्धतीने ठरला. सर्वात शेवटी राहुल गांधींच्या आधी आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचे भाषण झाले. मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवीत पवार म्हणाले, ‘सामान्य माणासाला दिलासा देण्यासाठी जी पावले सरकारने वेळीच उचलायला हवी होती ती उचलली नाहीत. साहजिकच देशभर जनतेच्या मनात रोष उत्पन्न झाला आहे. सत्तर वर्षांत काहीच झाले नाही ती बहाद्दुरी अवघ्या ४ वर्षांत आमच्या सरकारने करून दाखवली आहे, असा मोदी सरकारचा दावा आहे. प्रत्यक्षात इंधनाच्या भाववाढीबरोबर गॅसचे दरही वाढले. डॉलरच्या तुलनेत विक्रमी स्तरावर रुपयाची घसरण झाली, ही सरकारची बहाद्दुरी आहे. हे सरकार जनविरोधी आहे, हे लोकांना पटवून देण्याची जबाबदारी सर्व विरोधी पक्षांवर आहे. केंद्रातले सत्तांतर त्यामुळेच घडेल’, पोलिसांनी येचुरी यांना तासभरासाठी पोलीस ठाण्यात बसवून ठेवले.
>सरकारने मर्यादा ओलांडल्या - मनमोहन सिंग
नरेंद्र मोदी सरकारने घेतलेले अनेक निर्णय देशहिताचे नाहीत. या सरकारने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असे उद्गार माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सोमवारी जाहीर सभेत काढले. देशाचे सार्वभौमत्व व लोकशाही यांना वाचविण्यासाठी विरोधी पक्षांनी आपापसातले मतभेद विसरून भाजपा व नरेंद्र मोदी सरकारविरोधात एकजुटीने लढा उभारावा, असे आवाहनही त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, नोटाबंदी करण्यामागे नेमके काय कारण होते, याचा अद्याप कुणालाही पत्ता लागलेला नाही. त्यानंतर लघु उद्योगांचे कंबरडेच मोडले आहे. आश्वासनांची पूर्तता करण्यात सपशेल अयशस्वी ठरलेल्या मोदी सरकारच्या कामगिरीवर देशातील युवक, शेतकरी, सामान्य माणसे असे सारेच घटक नाराज आहेत.
जनतेच्या मनातील ही भावना ओळखून विरोधी पक्षांनी देश व लोकशाही वाचविण्यासाठी आता संघर्ष केला पाहिजे. या सभेला यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी उपस्थित होत्या; पण त्यांनी भाषण केले नाही.
>भाजप, मोदी विद्वेष पसरवत आहेत - राहुल गांधी
राजघाटावरून सोमवारी सकाळी राहुल गांधी व अन्य नेते रामलीला मैदानात गेले. तिथे जाहीर सभेत भाषण करताना राहुल गांधी म्हणाले की, जे काम सत्तर वर्षांत झाले नाही ते काम मोदी सरकारने चार वर्षांत करून दाखविले आहे ते म्हणजे देशभरात विद्वेष पसरविण्याचे. समाजातील सर्व घटकांत फूट पाडण्याचे उद्योग भाजपने केले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. स्वयंपाकाच्या गॅसची किंमत दर सिलिंडरमागे ८०० रुपये झाली आहे.
>गांधीजींना आदरांजली वाहून बंदची सुरुवात
कैलास मानसरोवर यात्रेहून दिल्लीत परतल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी १६ राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.भारत बंददरम्यान सोमवारी नवी दिल्लीत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदी नेते उपस्थित होते. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराविरुद्ध काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी भारत बंदचे आवाहन केले होते.

Web Title: The time has come to change the government, Sharad Pawar's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.