अहमदाबाद- भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदाच जय शाह यांच्या कंपनीतील आर्थिक गैरव्यवहारावर पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. जयच्या कंपनीनं सरकारसोबत कोणताही व्यवहार केला नव्हता. कोणतीही सरकारी जमीन जयनं घेतली नाही. हे कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचाराचं प्रकरण नाही. काँग्रेसकडे जय शाह यानं आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुरावे असल्यास न्यायालयात त्यांनी सादर करावे, असं आवाहनही अमित शाह यांनी काँग्रेसला दिलं आहे.

स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. परंतु आतापर्यंत त्यांनी एकदाही मानहानीचा खटला दाखल केलेला नाही, याकडेही अमित शाहांनी लक्ष वेधलं. माझ्या मुलानं न्यायालयात जाऊन 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे आणि स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमच्यावर आरोप लावल्यानंतर आम्ही 100 कोटींचा मानहानीचा खटला भरला. काँग्रेसवर आतापर्यंत एवढे आरोप झाले, त्यांनी किती खटले भरले ?, असा सवालही अमित शाह यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्याकडे पुरावे असल्यास त्यांनी न्यायालयात सादर करावे, असंही ते म्हणाले आहेत.

उलाढाल आणि नफ्यात अंतर 
अमित शाह यांनी पहिल्यांदाच पूर्ण विस्तारानं या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. जयच्या कंपनीचा वस्तूंची निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. या कंपनीची उलाढाल 5 हजार रुपयांनी वाढून 80 कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. परंतु उलाढाल आणि नफ्यात अंतर असतं, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. कंपनी वस्तूंची निर्यात व आयात करण्याचं काम करते. त्यामुळेच त्या कंपनीची एवढी मोठी उलाढाल आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अनेक नेत्यांविरोधात न्यायालयात खटले सुरू आहेत. तरीही काँग्रेस या नेत्यांवर कारवाई करण्याऐवजी भाजपावर चुकीचे आरोप लावते आहे, असं म्हणत अमित शाहांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.