अमित शाह यांनी राजीनामा द्यावा,विरोधकांची मागणी; सभागृहात गदारोळ,ओम बिर्ला यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 12:04 PM2023-12-14T12:04:46+5:302023-12-14T12:05:37+5:30

संसदेत काल घडलेल्या घटनेवरुन दिल्लीत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले.

The opposition MPs also demanded the resignation of Union Home Minister Amit Shah over the incident | अमित शाह यांनी राजीनामा द्यावा,विरोधकांची मागणी; सभागृहात गदारोळ,ओम बिर्ला यांनी सुनावले

अमित शाह यांनी राजीनामा द्यावा,विरोधकांची मागणी; सभागृहात गदारोळ,ओम बिर्ला यांनी सुनावले

नवी दिल्ली: १३ डिसेंबर २०२३ रोजी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी चक्क खासदारांच्या बाकांवर उड्या घेतल्या आणि घोषणाबाजी केली. यानंतर स्मोक क्रॅकर फोडून धूर केला. या घटनेत देशाची सर्वोच्च इमारत असलेल्या संसदेची सुरक्षा भेदली गेली आणि संपूर्ण देश हादरला. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या चार जणांना पकडले गेले असून या घटनेची आता चौकशी केली जात आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून ८ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे. सुरक्षेतल्या चुकीबद्दल लोकसभा सचिवालयाने ही करावई केली आहे. 

संसदेत काल घडलेल्या घटनेवरुन दिल्लीत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. संसदेत घडलेल्या घटनेवरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेल्या घोषणाबाजीने लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. विरोधी पक्षाच्या खासदारांनीही या घटनेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर काल सभागृहात जे काही घडले त्याबद्दल आपण सर्वजण चिंतित आहोत. सभागृहाची सुरक्षा ही लोकसभा सचिवालयाची जबाबदारी आहे, असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना सभागृहात अराजकता पसरवू नका, असे आवाहन केले. ते म्हणाले की, कालच्या घटनेची जबाबदारी लोकसभा सचिवालयाची आहे. मी तुमच्याशी बसून चर्चा करेन. कालही चर्चा झाली. पुन्हा चर्चा करणार. सरकारचा याच्याशी काहीही संबंध नाही. सचिवालयाच्या कामात सरकार हस्तक्षेप करत नाही, आम्ही करू देणार नाही, असंही ओम बिर्ला यांनी सांगितले.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही संसदेच्या सुरक्षेबाबत सभागृहात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ही कालची घटना आहे, सर्वांनी त्याचा निषेध केला आहे. तुम्ही (सभापती) तातडीने चौकशीचे आदेश दिले. ते म्हणाले, इमारतीत अराजक माजवणाऱ्या अशा लोकांना आपण पास देणार नाही याची काळजी आपण सर्व खासदारांनी घेतली पाहिजे. आपण तातडीने दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. इतरही पावले उचलली जातील. जेणेकरून भविष्यात अशी घटना घडू नये, असं राजनाथ सिंह यांनी सांगितले.

दरम्यान, संसदेच्या सुरक्षेमध्ये मोठा गोंधळ झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संसद परिसरात मोठा पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची सुरक्षा दल कसून तपासणी करत आहे. इतकेच नाही तर बुधवारी लोकसभा सचिवालयाने खासदारांना नवीन इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची 'स्मार्ट कार्ड' तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाकडून लोकसभा आणि राज्यसभा लॉबी आणि संसदेच्या संकुलातील इतर काही ठिकाणी फेशियल रेकग्निशन सिस्टीमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती लोकसभा सचिवालयाकडून देण्यात आली. सचिवालयाने म्हटले आहे की, अनेक सदस्यांकडे स्मार्ट कार्ड आहेत, ज्यांनी व्हिजिटर्स मॅनेजमेंट सिस्टमसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती करून घ्यावी. याशिवाय पुढील आदेश येईपर्यंत व्हिजिटर पास बनविण्यास बंदी घालण्यात आली आहे. संसदेच्या आत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. टोपी व बूट काढून तपासणी केली जात आहे.

Web Title: The opposition MPs also demanded the resignation of Union Home Minister Amit Shah over the incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.