गोरखपूर, दि. 12 - गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेताना ऑक्सिजनअभावी मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 63 वर पोहोचली आहे. यामध्ये 30 लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.  या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी असे सांगितले की,  केवळ ऑक्सिजन अभावामुळेच रुग्णांचा मृत्यू झाला असे नाही तर वेगवेगळ्या कारणांमुळे मुलांचा मृत्यू झाला आहे. पुढे ते असेही म्हणाले की 11.30 ते 1.30 वाजेदरम्यान ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात नव्हता, मात्र यादरम्यान कोणत्याही मुलाचा मृत्यू झाला नाही. याशिवाय, या प्रकरणी कारवाई करताना बीआरडी कॉलेजचे प्राध्यापक आर.के.मिश्रा यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

दरम्यान, उत्तर प्रदेशात या घटनेचे तीव्र पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. विरोधक या प्रश्नी सरकाला घेरण्याच्या तयारीत आहेत. रुग्णालय परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.  रुग्णालयात मागील एक महिन्यापासून ऑक्सिजन पुरवठ्याची समस्या होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये यासंबंधीच्या बातम्याही येत होत्या. पण तरीही या प्रकरणाची कल्पना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांना नव्हती. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी स्वत: या रुग्णालयाचा दौरा केला होता.

ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पुष्पा सेल्स या कंपनीने 1 ऑगस्टलाच पत्र लिहून रुग्णालय प्रशासनाला ऑक्सिजनची 69 लाख रुपये थकबाकी न दिल्यास पुरवठ्यावर परिणाम होईल, असा इशारा दिला होता. प्रशासनाने याची माहिती राज्य सरकारला दिली होती, अशी माहिती पुढे येत आहे. दरम्यान, कॉँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रभारी गुलाम नबी आझाद, राज बब्बर आदि नेत्यांनीही रुग्णालयाला भेट दिली आहे. विरोधक याप्रकरणी आक्रमक झाले असून या घटनेस जबाबदार आरोग्यमंत्र्यांसह सर्वांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.

बेजबाबदारपणाचा परिणाम
रुग्णालय व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे बालकांना प्राणास मुकावे लागले. या रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी लिक्विड ऑक्सिजनचा प्रकल्प उभारण्यात आला होता. त्यातून सुमारे ३०० रुग्णांना पाइपद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जात होता. शुक्रवारी सकाळी ऑक्सिजन संपल्याने काही बालकांना अम्बू बॅग देण्यात आल्या. दुपारी १२ वाजता काही सिलिंडर पोहोचले; परंतु तरीही रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी टंचाई जाणवत आहे. तेथे एका वॉर्डमध्ये दीड तासासाठी १६ सिलिंडर लागतात.

पुरवठा सुरू, पण... पोहोचणार रविवारपर्यंत
इतकी बालके मरण पावल्यानंतर रुग्णालयाने पुरवठादाराचे २२ लाख रुपये भरण्याची तयारी सुरू केली व अखेर ऑक्सिनजचा पुरवठा सुरू करण्याचा निर्णय झाला. मात्र लिक्विड ऑक्सिजन पोहोचण्यास शनिवार किंवा रविवार उजाडणार आहे. यापूर्वीही याच रुग्णालयाचा ५० लाख रुपये वेळेत न भरल्याने ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला होता.
 Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.