गुप्तचरांचा अ‍ॅलर्ट, ७८ वाहने, २५०० जवान; तरीही झाला सर्वात मोठा आत्मघाती हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 06:08 AM2019-02-15T06:08:56+5:302019-02-15T06:09:49+5:30

पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यापूर्वी गुप्तचर संस्थांनी हाय अ‍ॅलर्ट दिला होता. ज्या ताफ्यातील वाहनाला टार्गेट केले गेले त्यात तब्बल ७८ वाहने होती. त्यातून २५४७ जवान प्रवास करत होते.

Spy alerts, 78 vehicles, 2500 soldiers; The biggest suicide attack ever happened | गुप्तचरांचा अ‍ॅलर्ट, ७८ वाहने, २५०० जवान; तरीही झाला सर्वात मोठा आत्मघाती हल्ला

गुप्तचरांचा अ‍ॅलर्ट, ७८ वाहने, २५०० जवान; तरीही झाला सर्वात मोठा आत्मघाती हल्ला

Next

पुलवामा : पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यापूर्वी गुप्तचर संस्थांनी हाय अ‍ॅलर्ट दिला होता. ज्या ताफ्यातील वाहनाला टार्गेट केले गेले त्यात तब्बल ७८ वाहने होती. त्यातून २५४७ जवान प्रवास करत होते. या ताफ्याच्या मार्गावर जागोजागी सुरक्षा तैनात होती. तरीही हल्ला झाल्याने सुरक्षा यंत्रणांना धक्का बसला आहे. एरवी अशा ताफ्यातून एकावेळी सर्वसाधारणपणे एक हजार जवानांची ने-आण केली जाते. परंतु तुफानी बर्फवृष्टी व दुरुस्तीच्या कामांमुळे गेले चार दिवस हा राजमार्ग बंद राहिल्याने तो सुरु झाल्यावर नेहमीहून जास्त वाहने व जवान पाठविण्यात आले.
सीआरपीएफचे महासंचालक आर. आर. भटनागर यांनी सांगिनले की ज्या ताफ्यावर पुलवामा हल्ला झाला, त्यात ७८ वाहने होतीे. त्यात २,५४७ जवान होते. यापैकी बहुतांश जवान रजेवरून येऊन ड्युटीवर तैनात होण्यासाठी निघाले होते. ज्या वाहनावर हल्ला झाला ते सीआरपीएफच्या ७८ व्या बटालियनचे होते व त्यात ३९ जवान होते. ताफा दुपारी ३.३० वाजता चिलखती गाड्यांच्या बंदोबस्तात जम्मूहून रवाना झाला व दिवस मावळेपर्यंत तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. पण वाटेतच अवंतीपोराजवळील लाटूमोड गावाजवळ हा हल्ला झाला. आयईडी स्फोटकांनी भरलेल्या कारने जवानांच्या बसचा पाठलाग केला. नंतर कारने बसला धडक दिली आणि त्यानंतर भीषण स्फोट झाला.
कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. या स्टाइलने आतापर्यंत सीरिया व अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करत होत्या. हल्ल्याची ही पद्धत भारतात प्रथमच वापरली गेली आणि ती वापरण्यासाठी एका स्थानिक काश्मिरी तरुणाचा वापर केला गेला, हीच आता अतिशय चिंतेची बाब बनली आहे.

तालिबानी स्टाईलचा हल्ला
वाहनांमध्ये स्फोटके भरून ती एखाद्या गर्दीच्या ठिकाणी घुसवायची आणि आत्मघाती हल्ला घडवून आणायचा ही तालिबानी अतिरेक्यांची स्टाइल आहे.
असा हल्ला आतापर्यंत भारतात, काश्मीरमध्ये कधीही झाला नव्हता. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने या हल्ल्यासाठी आयईडी स्फोटांचे ट्रेनिंग दिले होते.
तो तालिबानी संघटनेत कार्यरत होता. त्यानेच हा हल्ला तालिबानी स्टाइलने घडविल्याचे म्हणणे आहे.
तालिबानी संघटना पाकमध्ये सैनिकांवर अशाच प्रकारे हल्ला करतात. तीच पद्धत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने गुरुवारच्या हल्ल्यात वापरली.

192 काश्मिरी तरूण गेल्या वर्षभरात दहशतवादी संघटनांमध्ये गेले आहेत.
स्थानिक तरूणांनी दहशतवादाकडे वळणे ही लष्कराच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. चकमकीत स्थानिक दहशतवाद्यांना मारल्याची काश्मीर खोऱ्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

डिसेंबरमध्ये पाकमधून आलेल्याने दिले स्फोटांचे ट्रेनिंग
जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने या हल्ल्यासाठी आयईडी स्फोटांचे ट्रेनिंग दिले होते. तो आयईडी स्फोटांचा एक्स्पर्ट असल्याचेही बोलले जाते.
गेल्या वर्षी ९ डिसेंबरला तो पाकिस्तानातून काश्मीरमध्ये दाखल झाला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशदवादी
संघटनेने काश्मीरमध्ये सुरू केलेल्या कॅम्पमध्ये गाझी हा प्रमुख ट्रेनर होता.
तो काश्मीरमध्ये घुसल्याचे कळताच सुरक्षा संस्थांनी अ‍ॅलर्ट जारी केला होता. गाझी हा जैश-ए-मोहम्मदचा तो टॉप ट्रेनर आहे. तो यापूर्वी अफगाणिस्तानातील तालिबानी अतिरेकी संघटनांमध्येही होता.
तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालणाºया अतिरेक्यांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये तो प्रमुख होता आणि नव्याने संघटनेत दाखल झालेल्यांना ट्रेन करण्याची प्रमुख जबाबदारी त्याच्यावरच होती.
तो काश्मीरमध्ये घुसल्यापासून आतापर्यंत तेथे अतिरेकी कारवायांमध्ये वाढ झाली आहे.

आॅपरेशन आॅलआऊटमुळे अतिरेकी होते हैराण
भारतीय लष्कराच्या आॅपरेशन आॅलआऊटमुळे अतिरेकी हैराण होते. आतापर्यंत या आॅपरेशनमुळे अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. पाकिस्तानात बसलेला म्होरक्या मौलाना मसूद अजहर हाही भारतीय लष्कराच्या जोरदार कारवायांमुळे हैराण होता. जैशचे अतिरेकी आणि मसूद अजहरच्या नात्यात असलेले उस्मान आणि तलहा रशीद यांना जवानांनी काश्मीरमध्ये एका कारवाईत ठार केले होते. त्याचा बदला घेण्याचा इरादा या दहशतवादी संघटनेने व्यक्त केला होता. त्यासाठी सुरक्षा जवानांना टार्गेट करण्याचा कटही रचला होता.

एनएसजी, एनआयएची तपासात मदत
अवंतीपोरानजीक झालेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएनजी) व राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या यंत्रणांची तपासपथके काश्मीरमध्ये थडकली आहेत. या हल्ल्याची काश्मीर पोलीस चौकशी करत असून त्यात त्यांना ही पथके मदत करतील. एनआयएच्या पथकाबरोबर फॉरेन्सिक तज्ज्ञ तसेच एनएसजीच्या ब्लॅक कॅट कमांडो फोर्सचे स्फोटक अवंतीपोरा येथे गेले असून त्यांनी हल्ल्याची ठिकाणाची बारकाईने तपासणी केली.

आयएसआयने जन्माला घातले जैश-ए-मोहम्मदला
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या पाठिंब्याने १९९०च्या दशकात जैश-ए-मोहम्मद (जेइएम) ही दहशतवादी संघटना स्थापन झाली. काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करण्यात जेइएम आघाडीवर आहे. जेइएमला अमेरिकेने १९९८ साली दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. मौलाना मसूद अझहर हा जेइएम संघटनेचा प्रमुख बनला. २००२मध्ये संघटनेवर पाकमध्ये बंदी आली तरीही अझहर मोकाट आहे. उरीत लष्करावर हल्ला जैश-ए-मोहम्मदनेच केला होता.

काय होता गुप्तचरांचा अ‍ॅलर्ट?
या हल्ल्याच्या पूर्वी भारताच्या गुप्तचर संस्थांनी अ‍ॅलर्ट जारी केला होता. त्यात म्हटले होते की, संसदेवरील ह्ल्ल्याप्रकरणी ज्या दिवशी (९ फेब्रुवारी) अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आले त्याच दिवशी हल्ला करायचा कट, अतिरेक्यांनी रचला आहे. हल्ल्यावेळी आयईडी स्फोट घडविले जाऊ शकतात. सर्व सुरक्षा संस्थांनी अ‍ॅलर्ट राहावे.

Web Title: Spy alerts, 78 vehicles, 2500 soldiers; The biggest suicide attack ever happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.