शिवसेना गुजरातमध्ये मोदींना देणार चॅलेंज, निवडणूक लढवण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 11:41 AM2017-11-09T11:41:29+5:302017-11-09T11:48:03+5:30

गुजरातमध्ये गेल्या वीस वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भाजपाला इथे प्रस्थापित सरकारविरोधात असणा-या लाटेचा सामना करावा लागत आहे.

Shivsena will give challenge to modi in Gujarat | शिवसेना गुजरातमध्ये मोदींना देणार चॅलेंज, निवडणूक लढवण्याचा घेतला निर्णय

शिवसेना गुजरातमध्ये मोदींना देणार चॅलेंज, निवडणूक लढवण्याचा घेतला निर्णय

Next
ठळक मुद्देआरक्षण हा सुद्धा गुजरातमध्ये महत्वाचा मुद्दा असून पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने उघडपणे भाजपाविरोधात भूमिका घेतली आहे. शिवसेना गुजरातमध्ये तीस ते चाळीस जागांवर उमेदवार उभे करणार आहे.

मुंबई - केंद्रात आणि राज्यातील सत्तेत बरोबरीचा वाटा न मिळाल्याने भाजपाची कोंडी करण्याची एकही संधी न सोडणा-या शिवसेनेने गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये आता भाजपासमोर काँग्रेसच्या बरोबरीने शिवसेनेचे आव्हान उभे ठाकणार आहे. गुजरातमध्ये गेल्या वीस वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भाजपाला इथे प्रस्थापित सरकारविरोधात असणा-या लाटेचा सामना करावा लागत आहे. यंदा गुजरातमध्ये काँग्रेसने ब-यापैकी हवा निर्माण केली. राहुल गांधींच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सर्व प्रतिकुल परिस्थितीत आता शिवसेनेच्या रुपाने तिसरे आव्हान उभे ठाकले आहे.  

आरक्षण हा सुद्धा गुजरातमध्ये महत्वाचा मुद्दा असून पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने उघडपणे भाजपाविरोधात भूमिका घेतली आहे. हार्दिकचे शिवसेना आणि काँग्रेस दोघांबरोबर चांगले संबंध आहेत. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. शिवसेना गुजरातमध्ये तीस ते चाळीस जागांवर उमेदवार उभे करणार आहे. गुजरातच्या सूरज आणि राजकोटमध्ये मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. या पट्टयात शिवसेना आपले उमेदवार उभे करेल असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले. 

गुजरातचा कौल नेहमीच हिंदुत्ववादी विचारधारेच्या बाजूने राहिला आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या उमेदवारांमुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये फाटाफूट होऊ शकते. ज्याचा फटका भाजपाला बसेल. यंदा गुजरातमध्ये अटी-तटीचा सामना होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत थोडयाशा फरकाने जागा गमावणे भाजपाला परवडणारे नाही. दोनवर्षांनी होणा-या लोकसभा निवडणुकीआधी गुजरातच्या निवडणुकीकडे सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे गुजरातची निवडणूक गमावणे भाजपाला परवडणार नाही. 

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्याकडे गुजरातची जबाबदारी देण्यात आली असून, रणनिती ठरवण्यासाठी ते अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. कालपर्यंत शिवसेनेचे नेते गुजरातमध्ये आम्ही मोदींना अपशकुन करणार नाही असे म्हणत होते. पण अचानक शिवसेनेच्या भूमिकेत बदल झाला असून शिवसेनेने गुजरातच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: Shivsena will give challenge to modi in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.