सरदार सरोवर हा ‘अभियांत्रिकी चमत्कार’ !, विरोध करणा-यांचा मोदींनी घेतला ‘समाचार’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 01:45 AM2017-09-18T01:45:51+5:302017-09-18T01:46:18+5:30

सरदार सरोवर धरण बांधण्यासाठी जेवढ्या अडचणी आल्या, तेवढ्या अडचणी जगातील कोणत्याही प्रकल्पासाठी आल्या नसतील, असे सांगत, हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकीमधील चमत्कार आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

Sardar Sarovar is an 'engineering miracle'! Modi takes protesters 'news' | सरदार सरोवर हा ‘अभियांत्रिकी चमत्कार’ !, विरोध करणा-यांचा मोदींनी घेतला ‘समाचार’

सरदार सरोवर हा ‘अभियांत्रिकी चमत्कार’ !, विरोध करणा-यांचा मोदींनी घेतला ‘समाचार’

Next

दभोई (गुजरात) : सरदार सरोवर धरण बांधण्यासाठी जेवढ्या अडचणी आल्या, तेवढ्या अडचणी जगातील कोणत्याही प्रकल्पासाठी आल्या नसतील, असे सांगत, हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकीमधील चमत्कार आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. नर्मदा नदीवर उभारण्यात आलेल्या जगातील दुस-या सर्वात मोठ्या धरणाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी मोदी यांनी धरणास विरोध करणा-यांचा समाचार घेतला.
बडोदा जिल्ह्यात प्रकल्पापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या दभोई येथे मोदी यांनी एका रॅलीला संबोधित केले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांची उपस्थिती होती. आपल्या ६७व्या वाढदिवशी या प्रकल्पाचे लोकार्पण करताना, मोदी म्हणाले की, ज्या लोकांनी या धरणाला विरोध केला, त्या प्रत्येकाचे नाव माझ्याकडे आहे, पण मी त्यांचा उल्लेख करणार नाही. मला त्यांच्या मार्गाने जायचे नाही. एक वेळ तर अशीही आली होती की, जागतिक बँकेने या प्रकल्पाला कर्ज देण्यास नकार दिला.
मोदी म्हणाले की, या योजनेसाठी मी सरदार वल्लभभाई पटेल आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा आभारी आहे. गुजरातमधील पाणी संकट ओळखून वल्लभभाई पटेल यांनी नर्मदा धरणाची कल्पना मांडली होती. बाबासाहेब आंबेडकर यांनीही विकासासाठी अनेक योजनांची कल्पना केली होती. हा प्रकल्प देशाच्या वाढत्या ताकदीचे प्रतीक बनेल. या योजनेसाठी लोकांनी निधी दिला. भारतातील जनतेच्या घामाच्या पैशांनी हा प्रकल्प उभा राहिला आहे. ज्या जागतिक बँकेने नर्मदा धरणासाठी निधी देण्यास नकार दिला. त्याच बँकेने २००१ मध्ये गुजरातमधील कच्छमधील प्रत्येक कामासाठी राज्याला ग्रीन अ‍ॅवार्डने सन्मानित केले. या प्रकल्पामुळे मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातील कोट्यवधी शेतक-यांचे नशीब बदलेल.
मोदी म्हणाले की, पूर्व आणि पश्चिम या भारताच्या प्रमुख दोन बाजू आहेत. नर्मदा धरणामुळे पश्चिम भारतात सिंचनाची सोय झाली आहे. त्याचप्रमाणे, पूर्व भारतात विजेची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. नर्मदा धरणाजवळ होणा-या सरदार पटेल यांच्या १८२ मीटर उंचीच्या प्रतिमेचा ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’चा उल्लेख करून, ते म्हणाले की, यामुळे पर्यटनाला मोठी मदत होणार आहे.
प्रकल्पाचा इतिहास
>नर्मदा धरणाची उंची आता १३८ .६८ मीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. सरदार सरोवर धरणाची कल्पना तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी १९४६ मध्ये मांडली होती. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. त्यानंतर, या प्रकल्पाचे काम मागच्या सात दशकांपासून सुरू होते. या पाण्यावर निर्माण होणा-या विजेचा फायदा गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांना होणार आहे.
>जलसत्याग्रह स्थगित
गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नर्मदा नदीवरील ‘सरदार सरोवर’ प्रकल्प, रविवारी राष्ट्राला अर्पण केल्यानंतर, काही तासांनी या प्रकल्पाच्या विरोधात ‘नर्मदा बचाव आंदोलन’च्या वतीने मेधा पाटकर यांच्यासह ३० महिलांनी मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात छोटा बरदा गावी शुक्रवारी सुरू केलेला ‘जलसत्याग्रह’ स्थगित केला.
जलसंधारण क्षमता
५,८६० दशलक्ष घनफूट
सिंचन क्षमता
१.९०५ दशलक्ष हेक्टर (महाराष्ट्रात उपसा सिंचनाने ३७,५०० हेक्टर)
कालव्याचे जाळे
७५ हजार किमी
जलविद्युत क्षमता
१,४५० मेवॉ. (यापैकी २७ टक्के महाराष्ट्राला)
> या धरणासाठी एकूण ६.८२ दशलक्ष घनमीटर काँक्रिट वापरले आहे. वापरलेल्या काँक्रिटच्या दृष्टीने अमेरिकेतील ग्रँड कोउले धरणानंतर, हे सर्वात मोठे धरण आहे. या धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग ८५ हजार घनफूट प्रतिसेकंद असेल. त्या दृष्टीने ते चीनमधील गाझेन्बा व ब्राझिलमधील तुकुरी या धरणांनंतर, तिस-या क्रमांकाचे धरण आहे.

Web Title: Sardar Sarovar is an 'engineering miracle'! Modi takes protesters 'news'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.