Rahul Gandhi Now My Boss Too Let There Be No Doubt About That Sonia Gandhi | राहुल आता माझेही बॉस झाले आहेत- सोनिया गांधी
राहुल आता माझेही बॉस झाले आहेत- सोनिया गांधी

राहुल गांधी आता माझेही बॉस झाले आहेत, असे वक्तव्य गुरुवारी सोनिया गांधी यांनी केले. काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक गुरुवारी दिल्लीत पार पडली. यावेळी सोनिया यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपदाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी आगामी काळात देशात बदलाचे वारे अनुभवायला मिळतील, असा आशावाद व्यक्त केला. कठीण परिस्थितीमध्येही आम्ही गुजरात आणि राजस्थानमधील पोटनिवडणुकांमध्ये चांगले यश मिळवले. आगामी काळात कर्नाटक विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल, असे सोनिया यांनी म्हटले. 

सोनिया गांधी यांनी तब्बल 20 वर्षे काँग्रेसचे अध्यक्षपद भुषवल्यानंतर 16 डिसेंबर 2017 रोजी राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे दिली होती. त्यानंतर गुजरात आणि राजस्थानमधील पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी संसदीय मंडळाच्या बैठकीवेळी एक निवेदन प्रसिद्ध केले. यामध्ये त्यांनी राहुल गांधींना शुभेच्छा दिल्या. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत कार्यकर्त्यांनी मला ज्याप्रकारे काम केले तसेच सहकार्य त्यांनी राहुल यांनाही करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यापूर्वीही राहुल यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद सोपवण्याचा औपचारिक निर्णय झाल्यानंतर सोनिया यांनी त्यांचे कौतुक केले होते. राहुल यांच्याकडे असणारी सहनशील वृत्ती पाहून मला त्यांचा अभिमान वाटतो. मी फक्त आई म्हणून त्याचे कौतुक करते असे नाही. मात्र, याच सहनशीलतेमुळे राहुल गांधी निडर आणि धैर्यशील झाल्याचे सोनियांनी सांगितले होते. 

काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होण्यापूर्वी काही दिवस अगोदरच राहुल गांधी यांच्या देहबोलीत कमालीचा बदल झाला होता. त्यांच्या भाषणांमध्ये आक्रमकता आणि आत्मविश्वास जाणवत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केल्या होत्या. गुजरात निवडणुकीत राहुल यांचा हा आक्रमक अवतार पाहायला मिळाला होता.


Web Title: Rahul Gandhi Now My Boss Too Let There Be No Doubt About That Sonia Gandhi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.