राजकारणात नाही पडणार रघुराम राजन, शिक्षणाला दिले पहिले प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 01:21 PM2017-11-09T13:21:17+5:302017-11-09T13:27:10+5:30

दिल्ली विधानसभेतील भक्कम बहुमतामुळे आम आदमी पक्षाला तीन उमेदवारांना राज्यसभेवर पाठवण्याची संधी आहे. त्यातील एका जागेसाठी रघुराम राजन यांच्या नावाची चर्चा होती.

Raghuram Rajan Not Interested politics | राजकारणात नाही पडणार रघुराम राजन, शिक्षणाला दिले पहिले प्राधान्य

राजकारणात नाही पडणार रघुराम राजन, शिक्षणाला दिले पहिले प्राधान्य

googlenewsNext
ठळक मुद्देस आम आदमी पक्षामध्ये राज्यसभेत कोणाला पाठवायचे यावरुन चर्चा होत असून यावरुन पक्षामध्ये दोन मतप्रवाहही आहेत. आम आदमी पक्षाचे दुसरे नेते कुमार विश्वास यांनी आपल्याला राज्यसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केली.

नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची तूर्तास राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा नसून त्यांनी आम आदमी पक्षाचा राज्यसभेचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. शिकागो विद्यापीठातील रघुराम राजन यांच्या कार्यालयकडून बुधवारी एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. शैक्षणिक अध्यापनाच्या कार्यातून ब्रेक घेण्याचा आपला कुठलाही विचार नाही. शिकागो विद्यापीठातील पूर्णवेळ नोकरी सोडण्याची कुठलीही योजना नाही असे राजन यांनी या पत्रकातून स्पष्ट केले आहे. 

दिल्ली विधानसभेतील भक्कम बहुमतामुळे आम आदमी पक्षाला तीन उमेदवारांना राज्यसभेवर पाठवण्याची संधी आहे. त्यातील एका जागेसाठी रघुराम राजन यांच्या नावाची चर्चा होती. आपने रघुराम राजन यांना राज्यसभेचा प्रस्ताव दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर राजन यांच्या कार्यालयाने पत्रक प्रसिद्ध करुन राजकीय प्रवेशाचे खंडन केले आहे. येत्या जानेवारी महिन्यात आप आपले तीन उमेदवार राज्यसभेवर पाठवणार आहे. 

गेले काही दिवस आम आदमी पक्षामध्ये राज्यसभेत कोणाला पाठवायचे यावरुन चर्चा होत असून यावरुन पक्षामध्ये दोन मतप्रवाहही आहेत. काही नेत्यांनी आपल्याला राज्यसभेत जायचे आहे अशी इच्छा उघडपणे व्यक्त केली आहे तर राजकारणाबाहेरील व्यक्ती राज्यसभेत पाठवल्या जाव्यात असाही मतप्रवाह पक्षामध्ये आहे. त्यामुळेच रघुराम राजन यांचे नाव या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे बोलले जात होते. आम आदमी पक्षाचे दुसरे नेते कुमार विश्वास यांनी आपल्याला राज्यसभेत जाण्याची इच्छा असून एका वाहिनीला मुलाखत देताना, "मी सुद्धा माणूस आहे, मलासुद्धा आकांक्षा आहेत. " असे थेट वक्तव्य केले होते. त्यामुळे कुमार विश्वास यांना राज्यसभेचे तिकीट मिळणार का हा प्रश्न अजुनही अनुत्तरित आहे.

आम आदमी पक्षामध्ये राज्यसभेच्या जागांवरुन कुमार विश्वास आणि मनिष सिसोदिया, अरविंद केजरीवाल असे दोन गट पडल्याचे सांगण्यात येते. कुमार विश्वास यांच्याबरोबर आपला मिळणाऱ्या राज्यसभेच्या तीन जागांमध्ये आशुतोष सिंग, संजय सिंहसुद्धा इच्छुकांच्या यादीमध्ये पुढे आहेत. कुमार विश्वास यांच्यावर रा. स्व.संघाचे एजंट असल्याचा तसेच ते भाजपाच्या वाटेवर असल्याचा आम आदमी पक्षातून नेहमी आरोप होत राहिला आहे. त्यामुळे कुमार विश्वास यांना तिकीट नाकारून अरविंद केजरीवाल त्यांची आणखी नाराजी ओढावून घेतात की त्यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जाऊ देतात हे पाहाणे महत्त्वाचे ठरेल. आम आदमी पक्ष याच महिन्यात स्थापनेची पाच वर्षेही पूर्ण करत आहे.

Web Title: Raghuram Rajan Not Interested politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.