केदारनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार करण्याच्या माझ्या प्रस्तावानं तेव्हा काँग्रेस हादरली - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 08:47 AM2017-10-20T08:47:59+5:302017-10-20T15:25:14+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ मंदिराचे दर्शन घेणार आहेत. ते केदारनाथ मंदिरात दाखलही झाले आहेत.

Prime Minister Narendra Modi to visit Kedarnath Temple in Uttarakhand | केदारनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार करण्याच्या माझ्या प्रस्तावानं तेव्हा काँग्रेस हादरली - पंतप्रधान नरेंद्र मोदी

केदारनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार करण्याच्या माझ्या प्रस्तावानं तेव्हा काँग्रेस हादरली - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next

देहरादून : केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तेथील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी असे सांगितले की, 'केदारनाथमध्ये 2013 मध्ये नैसर्गिक आपत्ती आली होती. तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. तत्कालीन राज्य सरकारला मी केदारनाथचा जीर्णोद्धार करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याला उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी संमतीही दर्शविली होती. मात्र माझ्या प्रस्तावानं दिल्ली हादरली होती. घाबरलेल्या काँग्रेसने तत्कालीन उत्तराखंड सरकारवर दबाव टाकला. त्यामुळे उत्तराखंडच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी माझा प्रस्ताव नाकारला'', असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचं भूमिपूजन करण्यात आलं. शिवाय मोदींनी मंदिरात पूजा आणि रुद्राभिषेकदेखील केला. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2013मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्ती मृत्यू झालेल्या लोकांचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. शिवाय, यानंतर येथे 5 विकास योजनांचा शिलान्यास केला.  ''उत्तराखंडमध्ये भाजपाचं सरकार आल्यानंतर हे काम मलाच करावं लागणार आहे, याची मला खात्री पटली. कपाट उघडल्यावर मी केदारनाथच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केला होता आणि आता कपाट बंद होण्यापूर्वीच इथं पोहोचलो आहे'', असंही यावेळी ते म्हणाले. 

दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच वर्षी मे महिन्यात केदारनाथ मंदिरात पूजा-अर्चना केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिराचे द्वार उघडण्यापूर्वीचे तेथे पोहोचले होते. पंतप्रधान मोदींनी मंदिराच्या गर्भगृहात पूजा-अर्चना केली होती आणि मंदिर प्रशासनातर्फे त्यांना मंदिराची प्रतिकृतीही भेट देण्यात आली होती.  










जवानांसोबत साजरी केली दिवाळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत असलेल्या काश्मीरमधील गुरेज खो-यात जाऊन तेथे सीमेचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी चारही वर्षी दिवाळी जवानांसोबत साजरी करण्याचा रिवाज कटाक्षाने पाळला आहे. काश्मीरमध्ये त्यांनी अशी साजरी केलेली ही दुसरी दिवाळी होती. याआधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच काश्मीरमध्ये भयंकर पुराने वाताहत झाली, तेव्हा लष्कराने केलेल्या शर्थीच्या मदत आणि बचावकार्याबद्दल मोदींनी दिवाळीनिमित्त भेट देऊन पाठीवर शाबासकीची थाप दिली होती.
सीमेवर दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधानांसोबत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्ट. जनरल देवराज अनबू व चिनार कॉर्पस्चे प्रमुख लेफ्ट. जनरल जे. एस. संधू हेही होते. मोदींनी जवानांना मिठाई वाटून त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या.
नंतर लष्करी तळावर जवानांसमोर केलेल्या छोटेखानी भाषणात पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करावी, असे वाटत असते. मलाही तसेच वाटते व म्हणूनच मी मुद्दाम येथे आलो आहे. कारण देशाच्या सीमांचे रक्षण करणारे शूर जवान हे माझे कुटुंबीयच आहेत, असे मी मानतो. अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीतही मोठ्या धीराने मातृभूमीचे रक्षण करणा-या जवानांविषयी पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांना भेटून गप्पा मारल्या की कामासाठी नवा हुरूप येतो, असे ते म्हणाले.

व्यग्र दिनचर्येतही योगाभ्यास
कष्टाच्या आणि व्यग्र दिनचर्येतही मुद्दाम वेळ काढून जवान योगासने करतात, असे सांगितल्यावर मोदींनी त्याविषयी समाधान व्यक्त केले. योगाभ्यासाने जवान आपले कर्तव्य अधिक चोखपणे पार पाडू शकतील व त्यामुळे त्यांना मानसिक शांतीही मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवृत्तीनंतर हे जवान उत्तम योगप्रशिक्षक म्हणून काम करू शकतील, असेही ते म्हणाले.

Web Title: Prime Minister Narendra Modi to visit Kedarnath Temple in Uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.