पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्तच राहणार; महागाईच्या झळा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 08:54 PM2018-10-08T20:54:26+5:302018-10-08T20:55:32+5:30

रुपयाची घसरणीनं आयात महागल्यानं इंधन दरवाढ सुरुच राहणार

Petrol and diesel prices will remain free from control; Inflation will increase | पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्तच राहणार; महागाईच्या झळा वाढणार

पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्तच राहणार; महागाईच्या झळा वाढणार

Next

नवी दिल्ली: सध्या पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता यामुळे त्रस्त झाली आहे. इंधनात होणारी ही दरवाढ सुरूच राहील, असे संकेत पेट्रोलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांना पेट्रोल, डिझेल दरात एक रुपयाची कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या, तरी इंधनाच्या दरावर सरकार नियंत्रण आणणार नाही, असं प्रधान यांनी स्पष्ट केलं. सरकारकडून पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रित केले जाणार नसल्यानं त्यात होणारी वाढ कायम राहणार आहे. 

इंधनाचे दर नियंत्रणमुक्त राखण्याच्या निर्णयापासून मागे हटण्याचा प्रश्चन येत नाही, असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं. 'आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढत आहेत. खनिज तेलाच्या दरांनी चार वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. सध्या प्रति बॅरलसाठी 85 डॉलर मोजावे लागत आहेत. खनिज तेलाच्या वाढणाऱ्या किमती हे मोठं आव्हान आहे. खनिज तेलाचे दर वाढल्यानं पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. उत्पादन शुल्कात कपात करुनही दर वाढतच आहेत,' असं प्रधान एका कार्यक्रमात म्हणाले. 

खनिज तेलाच्या दरांबद्दल चर्चा करण्यासाठी सौदी अरेबियाचे पेट्रोलियम मंत्री खालिद ए. एल. फलीह यांच्याशी संवाद साधल्याची माहिती त्यांनी दिली. 'भडकलेले इंधन दर कमी करण्यासाठी ओपेककडून (तेल निर्यातदार देश) दररोजच्या तेल उत्पादनात 10 लाख बॅरलची वाढ करण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आलं होतं. त्याची आठवण फलीह यांना करुन देण्याच आली आहे. मात्र बहुधा ओपेक देश जून महिन्यात देण्यात आलेल्या त्या आश्वासनाप्रमाणे कृती करत नसावेत,' असं प्रधान यांनी सांगितलं. एकीकडे खनिज तेलाचे दर वाढत असताना दुसरीकडे रुपयाचं मूल्य घसरत आहे. त्यामुळे आयात महागली आहे. याचा परिणाम म्हणून दररोज इंधन दरवाढ होत आहे. 
 

Web Title: Petrol and diesel prices will remain free from control; Inflation will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.