नवी दिल्ली - नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला एक दोन दिवस उरले असतानाच काळ्या पैशाबाबत पॅराडाइज पेपर्समधून झालेल्या गौप्यस्फोटांमुळे भारताबरोबरच जगभरात खळबळ माजली आहे. या धक्कादायक गौप्यस्फोटांनंतर बाजार नियामक संस्था असलेल्या सेबीनेही पॅराडाइज पेपर्स प्रकरणी कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. सेबी विविध सुचीबद्ध कंपन्या आणि त्यांच्या प्रवर्तकांद्वारे निधीची झालेली कथित हेराफेरी आणि कंपनी संचालनामधील उणिवांचा तापास करणार आहे. त्यामध्ये विजय माल्याशी संबंधित प्रवर्तकांचाही समावेश आहे. 
 पॅराडाइज पेपर्समध्ये बँकांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळालेल्या विजय माल्याचेही नाव आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, माल्याशी संबंधित काही कंपन्यांची चौकशी आधीपासूनच सेबी आणि अन्य कंपन्या करत आहेत. आता जर इंटरनॅशनल कॉन्सोर्टियम ऑफ इन्वेस्टिगेशन जर्नलिस्टने  सार्वजनिक केलेल्या कागदपत्रांमध्ये काही नवा खुलासा झाला असेल तर त्यावर अधिक लक्ष दिले जाईल. 
या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, उघड झालेल्या कागदपत्रांमध्ये सुचिबद्ध कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित प्रवर्तकांबाबत खुलासा करण्यात आल्यास कंपनी व्यवस्थापन, नियम आणि निधीमध्ये हेराफेरीसोबत काही अन्य अनियमितता तर नही ना याची पाहणी केली जाईल.  याबाबत शेअर बाजार आणि सेबी संबंधित सुचिबद्ध कंपन्यांकडून त्यांची परदेशात शाखा असल्यास त्याबाबतची माहिती मागवली जाईल. त्यानंतर संबंधित कंपनीकडून दिलेल्या सांवैधानिक आणि नियामक माहितीची तपासणी केली जाईल.  
 केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. हा दिवस 'अॅन्टी ब्लॅक मनी डे' म्हणून साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू आहे. मात्र त्यापूर्वीच काळा पैशांसंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट समोर आला आहे. जर्मनीतील  'सुददॉइश झायटुंग' या वृत्तपत्रानं काळा पैशांसंदर्भातील नवा गौप्यस्फोट केलेला आहे. या वृत्तपत्रानं 'पॅराडाइज पेपर्स' उजेडात आणले आहेत. याच वृत्तपत्रानं 18 महिन्यांपूर्वी पनामा पेपर्ससंदर्भात खुलासा केला होता. 

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 96 नामांकित माध्यम समूहांनी मिळून 'पॅराडाइज पेपर्स'चा खुलासा करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पॅराडाइज पेपर्समध्ये 1.34 कोटी दस्तऐवजांचा समावेश आहे. या खुलाशाद्वारे बनावट कंपन्यांबद्दल माहिती समोर आली आहे, ज्याद्वारे जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली मंडळी आपला पैसा परदेशात पाठवण्यासाठी वापर करत होते.  'पॅराडाइज पेपर्स'मध्ये भारतातील 714 जणांचा समावेश आहे.  पॅराडाइज पेपर्स लीकमध्ये पनामाप्रमाणे कित्येक भारतीय राजकीय नेते, अभिनेते आणि व्यावसायिकांच्याही नावाचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

तर, यादीमध्ये जगभरातील एकूण 180 देशांच्या नावाचा समावेश आहे. यामध्ये भारत 19व्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. बर्म्युडामधील 'अॅपलबाय' या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची सर्वाधिक कागदपत्रं उघड करण्यात आली आहेत. 
 जागतिक पातळीवर अमेरिकेतील  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील उद्योग मंत्रालयाचे सचिव विलबर रॉस, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांच्यासाठी निधी संकलन करणाऱ्यांचे नावही या यादीत आहे. याशिवाय ट्विटर आणि फेसबुकमध्ये रशियातील कंपन्यांची गुंतवणूक केल्याचा उल्लेखही या पेपर्समध्ये आहे.