पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र, भारताकडून इम्रान खान यांच्या दाव्याची पोलखोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 08:37 PM2019-02-19T20:37:18+5:302019-02-19T20:59:25+5:30

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला होता.

Pakistan's center of terrorism, claims from India | पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र, भारताकडून इम्रान खान यांच्या दाव्याची पोलखोल 

पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र, भारताकडून इम्रान खान यांच्या दाव्याची पोलखोल 

Next
ठळक मुद्देपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला होतापाकिस्तान हा दहशकवादाचे केंद्र असून, पाकिस्तानी पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबाबत आश्चर्य वाटले नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे

नवी दिल्ली - पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या दाव्याची भारताने पोलखोल केली आहे. पाकिस्तान हा दहशकवादाचे केंद्र असून, पाकिस्तानी पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबाबत आश्चर्य वाटले नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ''पाकिस्तानी पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबाबत आम्हाला आश्चर्य वाटलेले नाही. एवढ्या भीषण हल्ल्याचा साधा निषेधही त्यांनी नोंदवला नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी जैश ए मोहम्मदसारख्या दहशतावादी संघटनेने केलेल्या दाव्याकडेही दुर्लक्ष केले आहे. मात्र जैश ए मोहम्मद ही संघटना आणि त्यांचा म्होरक्या मसूद अझहर हे पाकिस्तानात वास्तव्यास आहेत,'' असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.  

''पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताने पुरावे दिल्यास तपास करू असा प्रस्ताव पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिला आहे. मात्र पाकिस्तानकडून देण्यात येणारे आणि घासून गुळगुळीत झालेले हे वक्तव्य आहे. मुंबई हल्ल्यावेळी पण पाकिस्तानला पुरावे देण्यात आले होते. मात्र गेल्या 10 वर्षांत त्यासंबंधीच्या प्रकरणात काहीही प्रगती झालेली नाही.'' असा टोला परराष्ट्र मंत्रालयाने लगावला आहे. 

दरम्यान, पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर गप्प बसलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर या प्रकरणावरील आपले मौन सोडले. मात्र पुलवामा हल्ल्याचा साधा निषेध नोंदवण्यापेक्षा इम्रान खान यांनी भारतालाच धमकावण्याचा प्रयत्न केला. भारतात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला झाल्यास राजकीय लाभ मिळू शकतो. मात्र पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल, अशी धमकी इम्रान खान यांनी दिली. 
 

Web Title: Pakistan's center of terrorism, claims from India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.