पद्म पुरस्कारांची घोषणा, डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 09:01 PM2018-01-25T21:01:33+5:302018-01-26T17:39:03+5:30

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणा-या पद्मश्री पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला करण्यात येते.

Padma awards, Arvind Gupta and Lakshmi Kutty honored | पद्म पुरस्कारांची घोषणा, डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांचा सन्मान

पद्म पुरस्कारांची घोषणा, डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांचा सन्मान

Next

नवी दिल्ली- विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणा-या पद्मश्री पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला करण्यात येते. यंदाच्या वर्षात पुरस्कारासाठी 15,700 लोकांनी अर्ज केला होता. त्यातील अनेकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. डॉ. अभय बंग, राणी बंग यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.

साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कार्य केल्याबद्दल महाराष्ट्रातील अरविंद गुप्ता यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर संपत रामटेके यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.  मध्य प्रदेशमधील भज्जू श्याम, केरळच्या लक्ष्मी कुट्टी, पश्चिम बंगालच्या सुधांशू बिस्वास, केरळच्या एमआर राजगोपाल, क्रीडाजगतात दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्रातील मुरलीकांत पेटकर यांनाही पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. केंद्र सरकारानं 85 पुरस्कार जाहीर केले असून, त्यात 73 पद्मश्री, 3 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण पुरस्कारांचा समावेश आहे.

कर्नाटकातल्या सुलागट्टी नरसम्मा, महाराष्ट्रातल्या विजयलक्ष्मी नवनीतकृष्णन, पश्चिम बंगालमधल्या सुभासिनी मिस्त्री, तामिळनाडूमधले राजगोपालन वासुदेवन यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. यंदाच्या वर्षात 89 लोकांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत 4417 जणांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. कला, साहित्य, शिक्षा, खेळ, चिकित्सा आणि सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात येतो. 

पद्मश्रीने भावी कार्यासाठी बळ मिळेल - डॉ. अभय बंग
गडचिरोली- गेल्या 40 वर्षात आम्ही सरकारवर कधी टीका केली तर कधी सहकार्य केले. या पुरस्काराने मात्र आमच्या कार्याला अधिक बळ मिळणार आहे. आम्हाला भावी समाजोपयोगी कार्यासाठी यातून शक्ती मिळेल, अशी प्रतिक्रिया पद्मश्रीचे मानकरी डॉ. अभय बंग यांनी लोकमतशी बोलताना दिली.

वर्धेतील ज्येष्ठ गांधीवादी ठाकूरदास बंग यांचे सुपुत्र आणि स्नुषा असलेले डॉ. अभय व डॉ.राणी बंग यांनी अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्वाधिक समस्याग्रस्त जिल्ह्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला. यातूनच 1986 साली गडचिरोली गाठून सर्च या संस्थेची स्थापना केली. न्युमोनिया आणि कुपोषनामुळे होणारे  बालमृत्यू, माता म्रुत्यू टाळण्यासाठी उपचार करण्यासोबतच त्यांनी देशभरात या समस्येवर वेळोवेळी उपाय सुचवून सरकारचे ग्रामीण आरोग्याकडे लक्ष वेधले. यासोबतच अलीकडे गडचिरोली जिल्ह्यात तम्बाकू आणि दारुमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व्यसनमुक्ती अभियान सुरू केले. वर्धेतील गांधी-विनोबांच्या आश्रमात बालपण गेल्यामुळे आपल्यावर सामाजिक कार्याचे संस्कार झाल्याचे डॉ. बंग सांगतात.

महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते
अभय बंग- वैद्यकीय क्षेत्र
राणी बंग- वैद्यकीय क्षेत्र
अरविंद गुप्ता- साहित्य आणि शिक्षण
मनोज जोशी- कला आणि अभिनय
रामेश्वरलाल काबरा- व्यापार आणि उद्योग
शिशिर पुरुषोत्तम मिश्रा- कला आणि सिनेमा
मुरलीकांत पेटकर- क्रीडा- जलतरण
संपत रामटेके(मरणोत्तर)- सामाजिक कार्य
गंगाधर पानतवणे- साहित्य आणि शिक्षण

पद्मविभूषण पुरस्कार विजेते
इलयाराजा- कला आणि संगीत
गुलाम मुस्तफा खान- कला आणि संगीत
परमेश्वरन परमेश्वरन- साहित्य आणि शिक्षण

पद्मभूषण पुरस्कार विजेते
पंकज अडवाणी- क्रीडा/बिलियर्ड्स-स्नूकर
फिलिपोस मार क्रिसोसटोम- आध्यात्मिक
महेंद्र सिंग धोनी- क्रीडा
अलेक्झांडर कडाकिन(विदेशी / मरणोत्तर)- सार्वजनिक क्षेत्र
रामचंद्रन नागास्वामी- पुरातत्त्व क्षेत्र
वेद प्रकाश नंदा-  साहित्य आणि शिक्षण
लक्ष्मण पई- कला-चित्र
अरविंद पारीख- कला आणि संगीत
शारदा सिन्हा- कला आणि संगीत

Web Title: Padma awards, Arvind Gupta and Lakshmi Kutty honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.