जगभरात जुन्या कपड्यांच्या अनेक बाजारपेठा आहेत. अगदी काही शहरांत जुने कपडे विकणारी दुकानेही आहेत. ज्यांना नवे कपडे विकत घेणे शक्य होत नाही, ते या बाजारांत जातात आणि तिथून कपडे विकत घेतात. दिल्लीच्या रघुबीर नगरमध्ये असाच एक बाजार आहे, पण त्या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे, तो पहाटे २ वाजता सुरू होतो आणि सकाळी आठ वाजेपर्यंत चालतो. किमान पाच हजार जण आपल्याकडील जुने कपडे तिथे विकायला ठेवतात. म्हणजे तिथे पाच हजार स्टॉल आहेत, असेच म्हणता येईल. रात्री तिथे काहीसा अंधार असतो. त्यामुळे प्रत्येकाकडे हातात टॉर्च असतेच.

हे कपडे त्यांच्याकडे कुठून येतात आणि विकणारे कोण असतात, असा प्रश्न पडू शकतो. अनेक वर्षांपूर्वी हजारो लोक गुजरातमधून दिल्लीत आले आणि इथेच स्थायिक झाले. ते बहुतांशी वाघरी समाजाचे आहेत. भारतातील अनेक शहरांमध्ये या समाजाचे लोक दिवसा भांडी घेऊ न निघतात. जुन्या कपड्यांच्या बदल्यात ते भांडी देतात. मराठीत ते ‘बोहारी’ म्हणूनही ओळखले जातात. कदाचित, ‘वाघरी’ या शब्दावरूनच ‘बोहारी’ हा शब्द आला असू शकेल. हीच मंडळी त्या बाजारात कपडे विकायला येतात. मुख्य म्हणजे त्यापैकी ७0 ते ८0 टक्के बायकाच असतात. त्यामुळे हा बायकांनी चालविलेला बाजारच म्हटला जातो.

जुने कपडे घ्यायचे, ते दुरुस्त करायचे आणि कमी किमतीत विकायचे, असा हा व्यवहार असतो. त्या कपड्यांत शर्ट, पँट, जीन्स, सलवार खमीस, साड्या यापासून चपला, बूट वगैरेही असतात. ज्यांना नवे कपडे परवडत नाहीत, ते तिथे येतात आणि १0 ते १00 रुपयांत कपडे विकत घेतात, पण त्यातील काही कपडे चांगले असतात.

अनेक जण काही काळ कपडे घालतात आणि मग कंटाळा आला म्हणून ते वापरायचे बंद करतात. असे चांगल्या स्थितीतील कपडे विकायला दिल्लीजवळच्या शहरांतील काही व्यापारीही तिथं येत असतात. ते असे कपडे स्वस्तात घेतात आणि थेट दुकानांत विकायला ठेवतात. हा बाजार दिल्लीत १९८८ साली सुरू झाला आणि तो वाढतच चालला आहे.

या कपडे बाजारात गर्दी होत असल्याने अनेक चोरीच्या वस्तूही काही जण तिथे विकायला ठेवतात. चपला, बूट, घड्याळे, घरातल्या लहानसहान वस्तू तिथे विक्रीला असतात. यापैकी बºयाच बायका आणि पुरुष सकाळी घरी जातात. काही वेळ आरात करतात आणि मग पुन्हा जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडी या व्यवसायाला लागतात. हे भारतातलं सर्वात मोठे जुन्या कपड्यांचे मार्केट आहे.