गुजरातच्या निकालानं निराश नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 02:14 PM2017-12-18T14:14:42+5:302017-12-18T16:58:00+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे आपण निराश झालो नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे.

Not disappointed by Gujarat's results, Rahul Gandhi's first reaction | गुजरातच्या निकालानं निराश नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया 

गुजरातच्या निकालानं निराश नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया 

Next

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे आपण निराश झालो नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे. केंद्र आणि गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने गुजरातमधील आपली सत्ता राखण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यावर  सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने मिळवलेली आघाडी मोडून काढत भाजपाने 100 हून अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. सध्या आलेल्या कलांनुसार भाजपा 110 तर काँग्रेस 72 जागांवर आघाडीवर आहे. 



 


गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची  तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात होती. दरम्यान, मतमोजणीला सुरुवात झाल्यावर भाजपाची सुरुवातीची आघाडी मोडीत काढत काँग्रेसने मुसंडी मारल्याने राज्यात मोठा उलटफेर होण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र जसजसे कल स्पष्ट होऊ लागले तशी भाजपाची आघाडी वाढत गेली. 

कलांबरोबरच निकालही भाजपाच्या बाजूने जात असून, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सुरुवातीची पिछाडी मोडून काढत विजय मिळवला. नितीन पटेल केवळ 2200 मतांनी विजयी झाले आहेत. दुसरीकडे मोदींविरोधात आघाडी उघडणारे दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनीही दणदणीत विजय मिळवला. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांनीही विजय मिळवला आहे.

182 जागांसाठी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत सरासरी 68.41 टक्के मतदान झाले होते. 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले होते. गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये 42 केंद्रांवर मतमोजणी होत असून, सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदानापूर्वी आलेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता बनेल असा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि गुजरात निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारं त्रिकूट म्हणजे हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी भाजपाच्या पराभवाचा दावा केला आहे. केवळ इव्हीएममध्ये घोळ करूनच भाजपा गुजरातमध्ये विजय मिळवू शकेल आणि 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करेल असा आरोप  हार्दिक पटेलने केला होता.  ईव्हीएमध्ये गडबड झाली नाही तर भाजपाला 82 जागा मिळतील, असं हार्दिक पटेलने म्हटलं होतं. 
 

Web Title: Not disappointed by Gujarat's results, Rahul Gandhi's first reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.