६५ कोटी कसले? ५० कोटीच वटवले- राष्ट्रवादी काँग्रेस; प्रसंगी कोर्टात जाण्याचीही ठेवली तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 11:12 AM2024-03-23T11:12:04+5:302024-03-23T11:12:44+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक रोख्यांद्वारे एकूण ६५.६ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या असल्याची आकडेवारी सादर
मुंबई: २०१८ ते जानेवारी २०२४ या कालावधीत निवडणूक रोखे योजना सुरू झाल्यापासून गेल्यावर्षी फूट पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक रोख्यांद्वारे एकूण ६५.६ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस) जयंत पाटील यांनी सांगितले की, पक्षाला रोख्यांमधून ५०.५ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. २०१९ पर्यंत आम्हाला ३१ कोटी, तर नंतर २० कोटी असे एकूण ५०.५ कोटी रुपये मिळाले आहेत. यातील बहुतेक निधी २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी वापरण्यात आला.
शरद पवार गट म्हणतो...
खाते गोठवल्यानंतर फक्त ७ लाख रुपये शिल्लक असल्याचे मला सांगण्यात आले. ६६ कोटी रुपये कोठून आले याची माहिती नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊ. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना सर्व व्यवहार झाले. जुलै २०२३ मध्ये पक्ष फुटल्यानंतर अजित पवार गटाने एसबीआयला दिलेल्या पत्राच्या आधारे खाते गोठवण्यात आले. आम्ही स्वतंत्र खाते काढल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
कंपन्या कोणत्या शहरातील?
बऱ्याच कंपन्या पुण्यातील आहेत. निओटिया फाउंडेशन, भारती एअरटेल, सायरस पूनावाला, युनायटेड शिपर्स, वादग्रस्त बिल्डर अविनाश भोसले (त्यांची सध्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे), बजाज फिनसर्व्ह, अतुल चोरडिया, युनायटेड फॉस्फरस, ओबेरॉय रियल्टी आणि अभय फिरोडिया यांचा समावेश आहे.
काय म्हणणे?
फूट पडण्यापूर्वी सर्व व्यवहार झाले आहेत. आमच्या पक्षाला निवडणूक रोख्यांमधून निधी मिळालेला नाही. आम्ही हितचिंतकांकडून निधी गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रमुख ५ देणगीदार
- क्यूक सप्लाय चैन १० कोटी
- राहुल भाटिया ३.८ कोटी
- टोरेंट पॉवर ३.५ कोटी
- मगरपट्टा टाउनशिप डेव्हलपमेंट ॲण्ड कन्स्ट्रक्शन ३ कोटी
- महालक्ष्मी विद्युत २.५ कोटी
- ‘नवयुग’ची भाजपला ५५ काेटींची देणगी
- उत्तराखंडमध्ये सिल्क्यारा बाेगद्यात गेल्यावर्षी नाेव्हेंबर महिन्यात ४१ कामगार अडकले हाेते. या बाेगद्याचे काम करणाऱ्या नवयुग इंजिनिअरिंग कंपनीने ५५ काेटी रुपयांचे निवडणूक राेखे खरेदी केले हाेते.
- हे सर्व राेखे भाजपला दान करण्यात आले हाेते. कंपनीने १९ एप्रिल २०१९ ते १० ऑक्टाेबर २०२२ या कालावधीत हे राेखे खरेदी केले हाेते. ही कंपनी नवयुग समूहाची उपकंपनी आहे.
- एकूण देणग्यांपैकी ८५ टक्के देणग्या फक्त टॉप ३ देणगीदारांनी दिल्या. भाजपला एकाच देणगीदाराकडून ५८४ कोटी रुपये मिळाले, तृणमूल काँग्रेस ५४२ कोटींसह दुसऱ्या क्रमांकावर