बाबरी मशीद बांधण्यासाठी मोदी पंतप्रधान झालेत का?- प्रवीण तोगडिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 05:07 PM2018-04-17T17:07:34+5:302018-04-17T17:07:34+5:30

तोगडिया यांनी राम मंदिर उभारणीसंदर्भात वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.

Is Narendra Modi become prime minister to Construct Babri masjid says Pravin Togadia | बाबरी मशीद बांधण्यासाठी मोदी पंतप्रधान झालेत का?- प्रवीण तोगडिया

बाबरी मशीद बांधण्यासाठी मोदी पंतप्रधान झालेत का?- प्रवीण तोगडिया

अहमदाबाद: बाबरी मशीद बांधण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत काय? असा सवाल तोगडिया यांनी केला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर प्रवीण तोगडियादेखील राम मंदिर उभारणीसाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी राम मंदिर उभारणीसंदर्भात वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर बांधणीच्या मागणीसाठी तोगडिया मंगळवारपासून (17 एप्रिल) बेमुदत उपोषणाला बसले आहेत. 

प्रवीण तोगडिया यांनी सुरू केलेल्या उपोषणाला अहमदाबादेत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज दुपारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तोगडिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला चढवला. 'हिंदुंनी प्राण त्याग केला. रक्त सांडवले. त्यामुळे तुम्हाला सत्ता मिळाली आहे. पोलिसांना सांगून ३०० हिंदुंना ठार केले होते, हे विसरलात का?, असा सवाल तोगडिया यांनी यावेळी केला. आजही गुजरातमधील १२०० हून अधिक हिंदू जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. शेकडो हिंदुंचं बलिदान आणि हजारो हिंदुंचा तुरुंगवास तुम्हाला सत्तेत बसविण्याचा मार्ग होता का? ज्यांनी राम मंदिर बांधण्यासाठी प्राण दिले, ज्यांनी राम मंदिरासाठी तुरुंगवास भोगला, त्यांच्या बायका आज रडत आहेत, याचं तुम्हाला भान आहे का? असा सवालही तोगडिया यांनी मोदींना विचारला.

प्रवीण तोगडिया यांनी 32 वर्षांपर्यंत विहिंपचे अध्यक्षपद भूषवले आहे. दरम्यान, तोगडिया यांनी विहिंपचे नवीन अध्यक्ष एस.कोकजे यांनाही आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा आग्रह केला आहे. कोकजे यांनी एक तर उपोषणामध्ये सहभागी व्हावं किंवा त्यांनी राम मंदिर निर्माणासंबंधी संसदेत विधेयक आणण्यासाठी दबाव निर्माण करावा, अशी मागणी तोगडिया यांनी केली आहे. 

तोगडिया यांनी असेही सांगितले की,विश्व हिंदू परिषदेने म्हटले होते, आम्हाला (संघ परिवार) संसदेत बहुमत मिळाले तर आम्ही विधेयक संमत करून राम मंदिर उभारण्याचा मार्ग सुकर करण्यात येईल. परिषदेने लोकांना अयोध्येत कार सेवा करताना प्राण पणाला लावण्याचे आवाहन केले होते. सुमारे 60 लोकांनी आपले प्राण त्यासाठी गमावले. गुजरातमधील हजारो जणांनी यासाठी आपले योगदान दिले होते.  

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना तोगडिया म्हणालेत की, ''सीमेवर जवान सुरक्षित नाहीत, शेतकरी आत्महत्या करत आहेत. आमच्या मुली स्वतःच्या घरात सुरक्षित नाहीत आणि पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेले आहेत''. दरम्यान, विहिंपच्या नव्या कार्यकारिणीत तोगडिया समर्थकांना स्थान देण्यात आलेले नाही.
 

Web Title: Is Narendra Modi become prime minister to Construct Babri masjid says Pravin Togadia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.