मोदी सरकारने जिंकला विश्वास; मतदानालाही उपस्थित नव्हती इंडिया आघाडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 06:20 AM2023-08-11T06:20:04+5:302023-08-11T06:20:25+5:30

अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सडेतोड उत्तर; मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य उगवेल, दिली ग्वाही

Modi government wins trust; The India Alliance was not even present at the polling | मोदी सरकारने जिंकला विश्वास; मतदानालाही उपस्थित नव्हती इंडिया आघाडी 

मोदी सरकारने जिंकला विश्वास; मतदानालाही उपस्थित नव्हती इंडिया आघाडी 

googlenewsNext

सुनील चावके
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नजीकच्या भविष्यात शांततेचा सूर्य मणिपूरमध्ये निश्चितपणे उगवेल. हा देश, हे सभागृह मणिपूरच्या माताभगिनींच्या सोबत आहे. ईशान्य भारत आमच्या हृदयाचा तुकडा आहे. आम्ही सारे मिळून मणिपूरच्या आव्हानावर तोडगा काढून तिथे पुन्हा शांतता प्रस्थापित होईल. ते राज्य पुन्हा विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करेल. त्यात कुठलीही कसर राहणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात दिली. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर अविश्वास ठरावावर आवाजी मतदान झाले. त्यात तो प्रस्ताव फेटाळला गेला आणि मोदी सरकारच्या विश्वासावर शिक्कामोर्तब झाले. 

मोहब्बत नव्हे नफरत की दुकान
नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या ‘मोहब्बत की दुकान’चाही समाचार घेतला. ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून अपय़शी ठरलेल्या उत्पादनाला वारंवार लाँच करतात. मोहब्बत की दुकान असा प्रचार केला जातो पण जनता म्हणते, ही लूट की दुकान, झूठ का बाजार त्यात द्वेष, घोटाळे, तुष्टीकरण, मन काळे आहे. तुमच्या दुकानाने आणीबाणी, फाळणी, शिखांवरील अत्याचार, इतिहास विकला आहे. नफरत दुकानवाल्यांनो शरम करा, तुम्ही सैन्याचा स्वाभिमान विकला.

जाणून घ्या कोणत्या विषयावर काय बोलले

मणिपूर : विरोधी पक्षांनी गृहमंत्र्यांनी दिलेल्या मणिपूरच्या चर्चेच्या प्रस्तावावर सहमती दर्शविली असती तर एकट्या मणिपूरच्या प्रत्येक पैलूवर, विस्तारावर चर्चा होऊ शकली असती. पण, त्यांना चर्चेत स्वारस्य नव्हते. गृहमंत्र्यांनी २ तास विस्ताराने जनतेला जागरूक करण्याचा आणि मणिपूरच्या जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न केला. मणिपूरवर न्यायालयाचा निकाल आल्यानंतर हिंसाचार सुरू झाला. अनेक कुटुंबांना आपले आप्त गमवावे लागले. महिलांसोबत गंभीर, अक्षम्य गुन्हे घडले. दोषींना केंद्र आणि राज्य सरकार कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, या सभागृहात भारत मातेविषयी जे काही बोलले गेले त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या भावनेला ठेच लागली आहे.


इंडिया आघाडी : विरोधकांच्या २६ पक्षांच्या ‘घमंडिया’ आघाडीच्या नव्या दुकानावरही काही दिवसांनी कुलूप लागणार आहे. ही आघाडी भारताच्या अर्थव्यवस्थेचे दिवाळे काढण्याची हमी आहे. ते कधीही भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत स्थान मिळवून देण्याची हमी देऊ शकत नाही. 

भारतमाता : सत्तेच्या सुखाशिवाय जगू न शकणारे काही लोक भारतमातेच्या मृत्यूची कामना करताना दिसत आहे. यापेक्षा काही दुर्दैव असू शकत नाही. हे तेच लोक आहेत जे लोकशाही आणि संविधानाच्या मृत्यूच्या गोष्टी करतात. जे मनात असते तेच त्यांच्या कृतीतून पुढे येते.

पंतप्रधानांच्या भाषणावेळी विरोधकांचा सभात्याग
काँग्रेसचे अधीररंजन चौधरी निलंबित- अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केल्याबद्दल काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निलंबित केले. 

मतदान झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आल्याची घोषणा लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला यांनी केली.

आगामी लोकसभा : पुढच्या वर्षी भाजप-रालोआ २०२४ साली जुने सर्व विक्रम मोडीत काढून सत्तेत परतेल.
अविश्वास प्रस्ताव : हा प्रस्ताव म्हणजे विरोधकांचीच शक्तिपरीक्षा आहे. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभच ठरतो. भाजप-रालोआ २०२४ साली जुने सर्व विक्रम मोडीत काढून भव्य विजयासह सत्तेत परतेल हे तुम्ही ठरवूनच टाकले आहे. 
गरिबी अन् तरुण : विरोधकांना त्यांचे पक्ष देशापेक्षा मोठे वाटतात. त्यांना देशातील गरिबांच्या भुकेची चिंता नाही तर सत्तेची भूक डोक्यावर स्वार आहे. त्यांना देशातील तरुणांपेक्षा आपल्या राजकीय भविष्याची चिंता आहे, असे मोदी म्हणाले.

Web Title: Modi government wins trust; The India Alliance was not even present at the polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.