काश्मीरमधील सुंजवा लष्करी तळावर दहशतवादी हल्ला; गोळीबार थांबला, ड्रोनने दहशतवाद्यांचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 07:24 AM2018-02-10T07:24:24+5:302018-02-10T09:18:22+5:30

ड्रोनद्वारे परिसराची पाहणी सुरू

A militant attack on a military camp in Jammu and Kashmir, 3 to 4 terrorists are likely to penetrate | काश्मीरमधील सुंजवा लष्करी तळावर दहशतवादी हल्ला; गोळीबार थांबला, ड्रोनने दहशतवाद्यांचा शोध सुरु

काश्मीरमधील सुंजवा लष्करी तळावर दहशतवादी हल्ला; गोळीबार थांबला, ड्रोनने दहशतवाद्यांचा शोध सुरु

Next

श्रीनगर - काश्मीरमधील सुंजवा लष्करी तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी केला. हा लष्करी तळ जम्मू-पठाणकोट महामार्गालगत आहे. 
प्राथमिक माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पहाटे साधारण 4.55 च्या सुमारास सुंजवा लष्करी तळाच्या परिसरात प्रवेश केला. काहीवेळातच येथील टेहळणी चौकीतील भारतीय जवानांना दहशतवादी दिसले. भारतीय जवानांनी लगेचच दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू केला. त्यावेळी दहशतवाद्यांनीही भारतीय जवानांच्या दिशेने गोळीबार करून तेथून पळ काढला. दहशतवाद्यांच्या या गोळीबारात हवालदार पदावरील एक भारतीय जवान, त्याची मुलगी आणि इतर दोघे जखमी झाले आहेत. तर दहशतवाद्यांनी लष्करी तळावरच्या रहिवाशी वसाहतीमधील एका इमारतीमध्ये आसरा घेतल्याचे समजते. दहशतवाद्यांची नेमकी संख्या अजूनपर्यंत कळू शकलेली नाही. सध्या लष्करी तळाचा परिसर खाली करण्यात आला अाहे. आतमधून गोळीबाराचे आवाज ऐकायला येत आहेत. या पार्श्वभूमीवर नजीकच्या परिसरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले असल्याची माहिती जम्मूचे पोलीस महानिरीक्षक एसडी सिंग जामवाल यांनी दिली. दरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळालं आहे.  मात्र, काही वेळापूर्वी येथील गोळीबार थांबला असून सर्व दहशतवादी ठार झाल्याची शक्यता आहे. सध्या सैन्याकडून याची खातरजमा करण्यासाठी ड्रोनद्वारे संबंधित परिसराची पाहणी केली जात आहे. 

या घटनेनंतर भारतीय सैन्याकडून काश्मीरमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व लष्करी तळांवरील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा हात असल्याचे समजते.









गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. तर दहशतवाद्यांकडून लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी 5 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी पुलवामाच्या काकापुरा येथील 50व्या राष्ट्रीय रायफल्सच्या छावणीवर हल्ला केला होता. यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार आणि ग्रेनेडस् फेकण्यात आले होते. या हल्ल्यात भारतीय जवानांना कोणतीही इजा झाली नसली तरी दहशतवादी येथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

Web Title: A militant attack on a military camp in Jammu and Kashmir, 3 to 4 terrorists are likely to penetrate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.