आईच्या संघर्षाची कथा, राज्यसेवा आयोगाची परीक्षा देऊन 'माय-लेक' बनल्या अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 11:10 AM2019-03-09T11:10:11+5:302019-03-09T11:15:39+5:30

'केल्यानं होत आहे रे, आधी केलेची पाहिजे', या ओवी नेहमीच आपल्या कानावर पडतात किंवा आपण वाचत असतो.

Meet the mom-daughter duo who cracked TNPSC together and got govt job | आईच्या संघर्षाची कथा, राज्यसेवा आयोगाची परीक्षा देऊन 'माय-लेक' बनल्या अधिकारी

आईच्या संघर्षाची कथा, राज्यसेवा आयोगाची परीक्षा देऊन 'माय-लेक' बनल्या अधिकारी

Next

मदुराई - तामिळनाडूतील शांती मोझी यांनी उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी गेल्या 4 वर्षांपूर्वी त्यांनी मुलगी थेनीमोझीसह अभ्यास आणि परीक्षेच्या तयारीलाही सुरुवात केली. विशेष म्हणजे चार वर्षानंतर चक्क आई अन् मुलगी दोघेही राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा पास झाल्या आहेत. त्यामुळे आता, 47 वर्षीय आई शांतीलक्ष्मी आणि मुलगी थेनीमोझी या दोघीही जिद्दीच्या जोरावर सरकारी अधिकारी बनल्या आहेत. 

'केल्यानं होत आहे रे, आधी केलेची पाहिजे', या ओवी नेहमीच आपल्या कानावर पडतात किंवा आपण वाचत असतो. मात्र, या ओवी सत्यात उतरवल्याची प्रचिती तामिळनाडूत पाहायला मिळाली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने आपण आज तामिळनाडूतील आई अन् मुलीच्या सामर्थ्याशाली संघर्षमय प्रवासाची प्रेरणादायी कथा वाचणार आहोत. 

तामिळनाडूतील एका लहानशा गावात राहणाऱ्या आई अन् मुलीने जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. तर, मुलींना दुय्यम वागणूक देणाऱ्यांना चांगलीच चपराक दिली आहे. लग्न झाल्यानंतरही स्त्री कुठेही कमी पडत नाही, हेच शांतीलक्ष्मी मोझी यांनी दाखवून दिले. शांतीमोझी या केवळ 15 वर्षांच्या होत्या, ज्यावेळी त्यांचे लग्न झाले होते. आपल्या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी अन् शेतकरी पतीला हातभार लावण्यासाठी त्यांनी आपल्या दहावीच्या शिक्षणाकडेही दुर्लक्ष केलं. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्याचं त्यांच स्वप्न हे केवळ मनातच घर करुन राहिलं. 

मला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती, मात्र परिस्थितीमुळे मला लग्नाच्या बंधनात अडकावं लागलं. पण, तरीही माझी शिक्षणाची गोडी आणि इच्छा कमी झाली नव्हती. त्यामुळे लग्नानंतरही मी घरकाम सांभाळून शिक्षण सुरूच ठेवलं. मात्र, शिक्षण घेण्याची गती कमी झाली होती. म्हणूनच लग्नानंतर सहा वर्षांनी मी बारावीची परीक्षा पास केली. त्यातच, टायपिंगचेही कोर्स पूर्ण केले. त्यानंतर, काही काळ शिक्षणात खंड पडल्यानंतर मी पुन्हा बी.ए. (तमिळ) च्या पदवीसाठी प्रवेश घेतला. त्यानुसार 2010 मध्ये मी बी.ए. परीक्षा पास झाले. मात्र, त्यानंतर 4 वर्षांनी पतीचे निधन झाल्यामुळे मोठा आघात माझ्या मनावर आणि कुटुंबावर बसला होता. तरी, तीन मुलींची आई असतानाही मी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. आता, मी आणि माझ्या मुलीने मदुराई काम्राज विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. 

शांतीमोझी आता सरकारी अधिकारी बनल्या आहेत. पण, केवळ एकाच प्रयत्नात त्यांना हे यश प्राप्त झाले नाही. मुलगी थेनीसोबत 2012 पासून त्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होत्या. त्यानुसार, तिसऱ्या प्रयत्नापूर्वीच त्यांनी तामिळनाडू राज्यसेवा आयोगाची परीक्षा पास करत आदर्श निर्माण केला आहे. तत्पूर्वी त्यांना अनेकांनी टोमणे मारले, तसेच आता तुम्हाला हे जमत नसतं, तुमच्यासाठी या जागा नाहीत, असेही सांगण्यात आले. मात्र, 2018 मध्ये मुलगी थेनीने (28 वर्षे) पदवीचे शिक्षण घेत असतानाच, टीएनपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली होती. तिने थेनी येथील थिनाई पेयरची पथराई कोचिंग क्लासेसमधील मोफत शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. त्यावेळी, लक्ष्मीशांती यांनीही आपल्या मुलीसोबत या क्लासेसला जाण्यास सुरुवात केली. 

दररोज दुपारी 12 ते 3 या कालावधीत माझी आई टीएनपीएससीच्या क्लासेसला जात असत. त्यासाठी, माझी बहिणही आईला मदत करत होती, असे मुलगी थेनी यांनी सांगितले. तर, ज्यादिवशी आईची क्लासला सुट्टी पडेल, त्यादिवशी मी आईचा घरीच अभ्यास घेत होते. तसेच रात्री जेवताना, सकाळी चहा पितानाही मी आईसोबत परीक्षा आणि अभ्यासासंदर्भात चर्चा करत, आईची उजळणीही घेत, असे थेनीमोझीने सांगितले. 

लक्ष्मी मोझी यांनी नेहमीच आपल्या तिन्ही मुलींना शिक्षणासाठी प्रेरीत केलं. शिक्षणाविरुद्ध एकही शब्द त्या ऐकून घेत नसत. माझे आई-वडिल माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळेच, मी तीन मुलींचा सांभाळ करुन इथपर्यंत मजल मारू शकले, असे लक्ष्मी मोझी सांगतात. मला तमिळ भाषा खूप आवडते, माझे तमिळ भाषेवर भरपूर प्रेम असून मला पुढे एम.फील आणि पीएचडी करायची असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, सोमवारी शांती लक्ष्मी यांनी आपल्या नव्या नोकरीला सुरुवात केली आहे. तामिळनाडू आरोग्य विभागात त्या रुजू झाल्या असून लवकरच थेनी जिल्ह्यातील विरापन्डी येथे कार्यरत होणार आहेत. तर, मुलगी थेनीमोझी या तामिळनाडूतील हिंदू रिलिजन अँड चॅरिटेबल धर्मार्थ ट्रस्ट विभागातील पोस्टींगची वाट पाहात आहेत. देशातील महिलांचा सन्मान वाढवणारी अन् महिलांना प्रेरणा देणारी ही रियल स्टोरी महिला दिनी अनेकांशी शेअर करावी अशीच आहे

Web Title: Meet the mom-daughter duo who cracked TNPSC together and got govt job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.