उत्तर प्रदेशात तब्बल १०० आमदार भाजपा सोडण्याच्या तयारीत, पक्ष सोडणाऱ्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 06:46 PM2022-01-13T18:46:04+5:302022-01-13T18:47:37+5:30

Uttar Pradesh Assembly Election 2022 : स्वामीप्रसाद मौर्य यांचे समर्थक आमदार मुकेश वर्मा हेही भाजपामधून बाहेर पडले असून, पक्ष सोडताना त्यांनी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढवणारा दावा केला आहे. भाजपाचे १०० आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत, असा दावा मुकेश वर्मा यांनी केला आहे.

As many as 100 MLAs in Uttar Pradesh are preparing to leave the BJP | उत्तर प्रदेशात तब्बल १०० आमदार भाजपा सोडण्याच्या तयारीत, पक्ष सोडणाऱ्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

उत्तर प्रदेशात तब्बल १०० आमदार भाजपा सोडण्याच्या तयारीत, पक्ष सोडणाऱ्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Next

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेल्यापासून विविध पक्षांतील इनकमिंग आऊटगोईंगला उधाण आले आहे. त्यातच राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपामधून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग होत आहे. स्वामी प्रसाद मौर्य, दारासिंह चौहान आणि धर्मसिंह सैनी या मंत्र्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर आता काही आमदारांनीही भाजपाला रामराम ठोकला असून, त्यातील एका आमदाराने पक्ष सोडताना केलेल्या दाव्यामुळे भाजपामध्ये खळबळ उडाली आहे.

स्वामीप्रसाद मौर्य यांचे समर्थक आमदार मुकेश वर्मा हेही भाजपामधून बाहेर पडले असून, पक्ष सोडताना त्यांनी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढवणारा दावा केला आहे. भाजपाचे १०० आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत, असा दावा मुकेश वर्मा यांनी केला आहे. तसेच मुकेश वर्मा यांनी त्यांच्या राजीनामापत्रामध्ये योगी आदित्यनाथ आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांची घोषणा होताच भाजपला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मंगळवारी जबर धक्का बसला. योगी सरकारमधील बलाढ्य मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पदासोबत भाजपाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर, युपीतील आणखी एका मंत्र्याने राजीनामा दिला असून आता सलग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या मंत्र्याने राजीनामा दिल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशचे पर्यावरणमंत्री दारासिंह चौहान यांनी गुरुवारी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला. राज्यातील दलित, वंचित आणि मागासवर्ग, शेतकरी आणि बेरोजगारी संदर्भातील सरकारने उपेक्षा केली आहे. तसेच, मागास आणि ओबीसी प्रवर्गाकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं दिसून आलेय. त्यामुळे, मी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देतोय, असे दारासिंह यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले होते. आता, युपीचे आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. धर्मसिंह सैनी यांनीही राजीनामा दिला आहे. ज्या अपक्षेनं दलित, मागास, शेतकरी, बेरोजगार युवक आणि लहान-सहान व्यापारी व छोटे उद्योजक यांनी राज्यात एकत्रितपणे भाजपचे सरकार बनिण्याचं काम केलं. मात्र, या सर्वांची आणि त्यांच्या लोकप्रतिनीधींची सातत्याने उपेक्षा होत आहे, त्यामुळेच मी मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं सैनी यांनी म्हटलं आहे. 

Web Title: As many as 100 MLAs in Uttar Pradesh are preparing to leave the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.