आयएमए घोटाळ्यातील आरोपी मन्सूर खान भारतातून पळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 05:49 AM2019-06-15T05:49:35+5:302019-06-15T05:50:05+5:30

२३ हजार लोकांची १५०० कोटी रुपयांची केली फसवणूक

Mansoor Khan escaped from India in IMA scam | आयएमए घोटाळ्यातील आरोपी मन्सूर खान भारतातून पळाला

आयएमए घोटाळ्यातील आरोपी मन्सूर खान भारतातून पळाला

Next

बंगळुरू : २३ हजारांपेक्षा जास्त लोकांना फसविणारा ‘इस्लामिक बँकर’ आणि ‘आय मॉनेटरी अ‍ॅडव्हायजरी’ (आयएमए) समूहाचा संस्थापक मोहंमद मन्सूर खान हा ८ जूनच्या रात्री भारत सोडून पळून गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घोटाळ्यातील आकडा १,५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

बंगळुरू पोलिसांनी खानविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली पण त्याआधीच त्याने देशातून पलायन केले आहे. खानविरुद्ध शनिवारी पहिली तक्रार दाखल झाली. त्यानंतर २४ तासांत खानच्या आवाजातील एक कथित आॅडिओ क्लिप व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल झाली. ‘आपण आत्महत्या करण्याच्या स्थितीत आहोत,’ असे तो त्यात म्हणत आहे. या क्लिपमुळÞे या घोटाळ्याला वाचा फुटली. हजारो गुंतवणूकदार तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे धावले. पण तोपर्यंत खान दूरवर निघून गेला होता.

पोलिसांनी सांगितले की, खान एकटाच विमानाने दुबईला गेला आहे. कुटुंबियांना त्याने आधीच देशाबाहेर पाठविले असण्याची शक्यता आहे. आयएमएच्या सातपैकी निजामुद्दीन अजीमुद्दीन या संचालकास अटक केली आहे. खानविरुद्ध त्याचे व्यावसायिक भागीदार मोहंमद खालीद अहमद यांनी फसवणुकीची केल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीमुळेही गुंतवणूकदारांत घबराट पसरली.

व्याज नव्हे, परतावा
इस्लाममध्ये व्याज घेणे निषिद्ध असल्यामुळे अनेक धार्मिक मुस्लिम बँकांमध्येही पैसे ठेवत नाहीत. याचा फायदा खान याने घेतला. तो आपल्या योजनेत पैसे गुंतविणाऱ्यांना ‘भागीदार’, तर व्याजाला परतावा संबोधित असे. गुंतवणुकीवर तो ७ ते ८ टक्के परतावा देत असे. खान चालवीत असलेल्या पोंझी योजनांचा परतावा येणे मार्चपासून बंद झाले होते.

एका गुंतवणूकदाराचा धक्क्याने मृत्यू
आयएमए समूहात ८ लाख गुंतविणाºया ५४ वर्षीय अब्दुल पाशा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पाशा यांच्या मुलीचे जुलैमध्ये लग्न होणार होते. पैसे बुडल्याने लग्न कसे होणार, याचा त्यांना जबर धक्का बसला.

Web Title: Mansoor Khan escaped from India in IMA scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.