Manik Saha : त्रिपुराच्‍या मुख्‍यमंत्रीपदी पुन्‍हा माणिक साहा, 8 मार्चला होणार शपथविधी सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 08:06 PM2023-03-06T20:06:46+5:302023-03-06T20:08:23+5:30

Manik Saha : त्रिपुरातील सत्ताधारी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची मुख्यमंत्री निवडीसाठी सोमवारी बैठक झाली.

Manik Saha gets second term as Tripura Chief Minister | Manik Saha : त्रिपुराच्‍या मुख्‍यमंत्रीपदी पुन्‍हा माणिक साहा, 8 मार्चला होणार शपथविधी सोहळा

Manik Saha : त्रिपुराच्‍या मुख्‍यमंत्रीपदी पुन्‍हा माणिक साहा, 8 मार्चला होणार शपथविधी सोहळा

googlenewsNext

माणिक साहा पुन्हा त्रिपुराचे मुख्यमंत्री होणार आहेत. सोमवारी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत माणिक साहा यांची नेतेपदी निवड करण्यात आली. लवकरच ते राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 8 मार्चला शपथविधी सोहळा होणार आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत. 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 32 जागा जिंकल्या होत्या. त्रिपुरामध्ये विधानसभेच्या जागांची संख्या 60 आहे.

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 31 जागांची आवश्यकता आहे. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. त्याचा मित्रपक्ष असलेल्या इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराला एक जागा मिळाली. 42 जागा लढवणाऱ्या टिपरा मोथा पक्षाने 13 जागांवर विजय मिळवल्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. माकपाला 11 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत.

त्रिपुरातील सत्ताधारी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची मुख्यमंत्री निवडीसाठी सोमवारी बैठक झाली. बुधवारी नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आमदारांच्या या बैठकीत माणिक साहा यांची पुन्हा विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. आगरतळा येथे झालेल्या या बैठकीत नवनिर्वाचित आमदारांव्यतिरिक्त भाजपचे ईशान्य समन्वयक संबित पात्रा, माणिक साहा, भाजप अध्यक्ष राजीव भट्टाचार्जी आणि केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मेघालय आणि नागालँड आणि बुधवारी त्रिपुराच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, मेघालयच्या नवीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा मंगळवारी सकाळी 11 वाजता शिलाँगमध्ये, तर नागालँडचा कोहिमा येथे दुपारी 1.45 वाजता होणार आहे.

तत्पूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी त्रिपुराला भेट दिली आणि सरकार स्थापनेवर चर्चा करण्यासाठी माणिक साहा, भौमिक आणि इतर भाजप नेत्यांची बैठक घेतली. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी दिल्लीला भेट दिली. यावेळी अमित शाह आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली आणि त्रिपुरा-नागालँडमध्ये सरकार स्थापनेबाबत चर्चा केली.
 

Web Title: Manik Saha gets second term as Tripura Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.