फेसबुकवर 'अनोळखी'सोबत मैत्री करणं पडलं महागात, महिलेला 16 लाख रुपयांना गंडवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 02:23 PM2018-06-25T14:23:44+5:302018-06-25T14:57:02+5:30

सोशल मीडियाचे जसे अनेक फायदे आहेत, तितकेच त्याचे तोटेदेखील आहेत. सोशल मीडियावर नको तिथे दाखवलेला अतिउत्साह किती वाईट पद्धतीनं अंगलट येऊ शकते, याचे उदाहरण मंगळुरूतील एका घटनेमुळे समोर आले आहे. 

Mangaluru woman loses Rs 16 lakh after accepting Facebook request | फेसबुकवर 'अनोळखी'सोबत मैत्री करणं पडलं महागात, महिलेला 16 लाख रुपयांना गंडवलं

फेसबुकवर 'अनोळखी'सोबत मैत्री करणं पडलं महागात, महिलेला 16 लाख रुपयांना गंडवलं

मंगळुरू : सोशल मीडियाचे जसे अनेक फायदे आहेत, तितकेच त्याचे तोटेदेखील आहेत. सोशल मीडियावर नको तिथे दाखवलेला अतिउत्साह किती वाईट पद्धतीनं अंगलट येऊ शकते, याचे उदाहरण मंगळुरूतील एका घटनेमुळे समोर आले आहे. कर्नाटकातील मंगळुरू येथे फेसबुकवर अनोळखी व्यक्तीसोबत केलेली मैत्री एका महिलेला चांगलीच महाग पडली आहे. फेसबुकद्वारे एका परदेशी नागरिकासोबत केलेली मैत्री या महिलेला एक नाही, दोन नाही तर तब्बल 16 लाख रुपयांना महाग पडली आहे. या महिलेला परदेशी मित्रानं दिलेल्या महागड्या गिफ्टमुळे तिला चांगलाच भुर्दंड सहन करावा लागला आहे. फेसबुक फ्रेन्डने तिला हे गिफ्ट देऊन 16 लाख रुपयांचा चुना लावला आहे. म्हणजे 'तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिलं धुपाटणं' अशी परिस्थिती या महिलेची झाली आहे. 

जॅक कोलमॅन नामक व्यक्तीनं पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट 
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर मंगळुरू पोलिसांनी सायबर गुन्ह्याअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी अट्टावर येथील रहिवासी असलेल्या रेश्मानं जॅक कोलमॅन नामक व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली होती. रेश्मासाठी जॅक अनोखळी व्यक्ती असतानाही तिनं त्याचा फ्रेंड लिस्टमध्ये समावेश केला. यानंतर दोघांमध्ये नियमित बोलणी सुरू होती. मेपर्यंत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.

18 लाख रुपयांच्या गिफ्टचं आश्वासन
यादरम्यान, जॅकनं रेश्मा व तिच्या कुटुंबीयांना 18 लाख रुपयांचं गिफ्ट देण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र रेश्मानं गिफ्ट घेण्यास नकार दर्शवला. तरीही जॅक रेश्माला गिफ्ट घेण्यास वारंवार आग्रह करून त्रास देऊ लागला. यानंतर रेश्मानं त्याचं गिफ्ट स्वीकारलं. 9 मे रोजी रेश्माला दिल्लीतून कथितरित्या कस्टम ऑफिसरचा फोन आला. जॅककडून स्वीकारलेल्या गिफ्टसाठी ऑफिसरनं रेश्माला 18 लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. 

कारागृहाची धमकी देत रक्कम केली ट्रान्सफर 
कथित कस्टम अधिकाऱ्यानं सांगितले की, जॅकनं पाठवलेल्या भेटवस्तूच्या पॅकेजनं कित्येक नियमांचं उल्लंघन केले आहे. त्यामुळे जर दंड भरला नाही तर रेश्माची कारागृहात रवानगी करण्यात येईल. या धमकीमुळे रेश्माला नाईलाजास्तव दंड भरावाच लागला. 

मंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मानं एकूण 16.69 लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. यानंतर जेव्हा रेश्मानं जॅक आणि कथित कस्टम ऑफिसरला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दोघांचे फोन स्विच्ड ऑफ दाखवण्यात आले. यानंतर तिनं पोलिसांना याबाबतची माहिती दिली तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 

अनोळखी व्यक्तींसोबत मैत्री करण्यापूर्वी 'फेसबुक'कडून अलर्ट मेसेज येत असतात. तशा सूचनाही वारंवार केल्या जातात. या सूचनांकडे दुर्लक्ष न करता गांभीर्यानं पाहिले तर कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.  

Web Title: Mangaluru woman loses Rs 16 lakh after accepting Facebook request

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.