मुस्लिमांनी मतदान करु नये अशी भाजपची इच्छा, तृणमूल काॅंग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 12:07 PM2019-03-11T12:07:56+5:302019-03-11T12:11:34+5:30

अल्पसंख्याकांनी मतदान करू नये अशीच भाजपची इच्छा असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला. लखनऊ येथील इस्लाम अभ्यासक मौलाना खालिद रशीद यांनीही निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकीच्या तारखांवर नाराजी व्यक्त केली.

Lok Sabha Election 2019 - TMC leader raised question on election dates | मुस्लिमांनी मतदान करु नये अशी भाजपची इच्छा, तृणमूल काॅंग्रेसचा आरोप

मुस्लिमांनी मतदान करु नये अशी भाजपची इच्छा, तृणमूल काॅंग्रेसचा आरोप

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून संपूर्ण देशात निवडणुकीचे वारं वाहू लागलंय. देशात सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.  मात्र अल्पसंख्याकाच्या रमजान महिन्यात मतदानाची तारीख येणार असल्याने यावर प्रश्न उपस्थित राहू लागलेत. 

रमजानचा रोजा सुरु होणाऱ्या असल्याने मतदान टक्केवारीवर याचा परिणाम होऊ शकतो. ६ मे, १२ मे आणि १९ मे रोजी होणाऱ्या मतदानावर याचा परिणाम होईल. याचा फटका सर्वाधित उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि दिल्लीच्या काही भागात पडू शकतो. ५४३ लोकसभा जागांपैकी १६९ जागांवरील मतदान प्रक्रियेत याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होईल असा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम यांनी केला आहे. 

फिरहाद हकीम म्हणाले की, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. आम्ही त्याचा सन्मान राखतो, निवडणूक आयोगाविरोधात आम्ही काही भाष्य करू शकत नाही. मात्र निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना रमजान महिन्याचा विचार केंद्रीय निवडणूक आयोगाने करणं गरजेचे होते. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मुस्लिमांची संख्या लक्ष्यणीय आहे. रमजानचा रोजा ठेऊन मुस्लिम मतदारांना मतदान करणे शक्य होणार नाही. अल्पसंख्याकांनी मतदान करू नये अशीच भाजपची इच्छा असल्याचा आरोप त्यांनी केला. 
लखनऊ येथील इस्लाम अभ्यासक मौलाना खालिद रशीद यांनीही निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकीच्या तारखांवर नाराजी व्यक्त केली. मुस्लिम समुदायाच्या भावना लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने रमजान महिन्यात होणाऱ्या मतदान तारखा बदलण्याची मागणी केली. 




रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. पहिला टप्पा 11 एप्रिल रोजी होणार असून दुसरा टप्पा 18 एप्रिल, तिसरा टप्पा 23 एप्रिल, चौथा टप्पा 29 एप्रिल, पाचवा टप्पा 6 मे, सहावा टप्पा 12 मे तर शेवटचा टप्प्यात 19 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. 23 मे 2019 रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालांची घोषणा केली जाईल. यानंतर देशात कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल. 

 

Web Title: Lok Sabha Election 2019 - TMC leader raised question on election dates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.