ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - महाराष्ट्र सदनात लातूरच्या भाजपा खासदाराला अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथील कँटीनचे प्रशासन वादात सापडले आहे. टेबल बूक असल्याचे सांगत भाजपाच्या लातूरच्या खासदाराला काऊंटरवरील मॅनेजरने तब्बल अर्धा तास बसू दिले नाही.
भाजपाचे लातूरचे खासदार सुनील गायकवाड हे सोमवारी महाराष्ट्र सदनमध्ये गेले होते. खासदार व आमदारांसाठीच्या कक्षामध्ये तेव्हा कोणाची तरी पार्टी सुरु होती. त्यामुळे खा. सुनिल गायकवाड हे सामान्य कक्षात गेले तेथे काऊंटर मॅनेजरने त्यांना कुठेतरी बसा असे सांगितले. त्यावर त्यांनी मी खासदार असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर खा. गायकवाड हे एका टेबलाकडे गेले तेव्हा एक वेटर तेथे आला व हा टेबल बुक असल्याचे त्याने सांगितले. गायकवाड यांना वेटरने तेथे बसू दिले नाही. अर्धा तास त्या टेबलाकडे कोणीही आले नाही. तोपर्यंत खा. गायकवाड हे उभेच होते.
या सर्व प्रकारावर खा. गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कँटीन प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी अभिप्राय पुस्तिकेत केली आहे. लोकप्रतिनिधीला कँटीन प्रशासनाने दिलेल्या अपमानास्पद वागणूकीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आणखी वाचा -  

या आधीही झाला होता वाद?
2014 मध्ये रमजानच्या महिन्यात महाराष्ट्र सदनात एका मुस्लीम कर्मचा-याला बळजबरीने चपाती खायला लाऊन त्याचा रोजा मोडल्याचे प्रकरण झाले होते. महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांना मिळणारी वागणूक, राहण्याची व खाण्यापिण्याची निकृष्ट दर्जाची सोय यामुळे संतापलेल्या शिवसेना खासदारांनी सदनातील कर्मचा-याला बळजबरीने चपाती भरवली होती. मात्र तो कर्मचारी मुसलमान होता व तेव्हा त्याचा रमजानचा उपवास सुरू असल्याने या प्रकरणी मोठा गदारोळ माजला होता. भाजप-शिवसेनेचे नवनियुक्त खासदार निवडून आल्यापासून नवीन महाराष्ट्र सदनात वास्तव्य करत होते. मात्र त्यांना तेथे चांगल्या सोयी-सुविधा दिल्या जात नव्हत्या. या गैरसोयींवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे खासदार महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांना वारंवार भेटण्याचा पयत्न करीत होते. मात्र, निवासी आयुक्तांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. एकदा मलिक यांनी त्यांना भेटण्याची वेळ दिली मात्र ते भेटलेच नाहीत. यामुळे त्यांच्यावरील राग कँटीनच्या मॅनेजरवर निघाला. जेवण नीट नसल्यामुळे सेनेचे खासदार राजन विचारे यांनी मॅनेजरला बोलावले आणि पोळी खावून दाखविण्यास सांगितले. त्याने पोळी खाल्ली नाही म्हणून विचारे यांनी स्वतः मॅनेजरच्या तोंडाला पोळी लावली. मात्र तो मुस्लीम असून त्याने रोजा ठेवला आहे याची माहिती त्यांना नव्हती. रोजाचा उपवास मोडल्या प्रकरणावरून प्रचंड गदारोळ माजला. विरोधकांनी या मुद्यावरून संसदेचे कामकाजही बंद पाडले होते.