कुलभूषण जाधव प्रकरण : भारताला कमकुवत करण्यासाठी ना"पाक" चाल

By admin | Published: May 13, 2017 11:23 AM2017-05-13T11:23:54+5:302017-05-13T11:23:54+5:30

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचे आदेश दिले. मात्र, न्यायालयात भारताची बाजू कमकुवत करण्यासाठी पाकिस्तानकडून आठमुडी भूमिका घेण्यात येत आहे.

Kulbhushan Jadhav Case: No "Pak" trick to weaken India | कुलभूषण जाधव प्रकरण : भारताला कमकुवत करण्यासाठी ना"पाक" चाल

कुलभूषण जाधव प्रकरण : भारताला कमकुवत करण्यासाठी ना"पाक" चाल

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 13 - भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात भारतानं  आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचे आदेश दिले. मात्र, न्यायालयात भारताची बाजू कमकुवत करण्यासाठी पाकिस्तानकडून आठमुडी भूमिका घेण्यात येत आहे. 
 
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश अमान्य असल्याचे पाकिस्तानचे अॅटॉर्नी जनरल यांनी म्हटले आहे.  कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा ठपका ठेवत पाकिस्ताननं त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधित असलेले हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्याय सीमेबाहेर असेल, असे पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना फाशी देण्याच्या 12 दिवसांपूर्वी न्यायालयाला सूचित करण्यात आले होते. 
(कुलभूषण जाधव प्रकरणी शरीफ यांची लष्करप्रमुखांशी चर्चा)
दरम्यान, कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा व्हिएन्ना करारच्या विरोधात असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाला सांगितले आहे. कुलभूषण जाधव यांना ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी भारताने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीचे थेट प्रक्षेपण होणार आहे. संयुक्त राष्ट्राकडून अधिकृतपणे याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
 
 
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्या-या आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) भारतानं दाखल केलेल्या याचिकेवर 15 मे (सोमवारी) रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी ही माहिती दिली आहे.
 
‘आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणे विचारपूर्वक होते’ 
कुलभूषण जाधवप्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात (इंटरनॅशनल कोर्ट आॅफ जस्टीस-आयसीजे) मागितलेली दाद हा ‘विचारपूर्वक घेतलेला निर्णय’ होता. कारण भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात बेकायदेशीरपणे डांबून ठेवले गेले आहे व त्यांच्या जीविताला धोकाही आहे, असे परराष्ट्र मंत्रालयानं सांगितले. 
भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाधवप्रकरणी दाद का मागितली, असे वार्ताहरांनी विचारले असता मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले म्हणाले की, ‘भारताने जाधव यांची भेट घेण्यासाठी 16  वेळा केलेली विनंती पाकिस्तानने फेटाळली. भेट नाकारणे हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन होते. जाधव यांच्या कुटुंबीयांना व्हिसा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती 27 एप्रिल रोजी पाकला करण्यात आली होती. त्यानुसार व्हिसा मान्य करण्यात आला आहे.’
 
 
पाकचा तोरा कायम; म्हणे योग्य पायरीवर उत्तर देऊ
 
जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कोणत्याही  प्रश्नाला ‘योग्य पातळीवर’ उत्तर दिले जाईल, असे पाकिस्तानच्या लष्कराने म्हटले आहे. लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘कायद्याची योग्य पद्धत अवलंबल्यानंतरच जाधव यांना लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांच्याबद्दल आयसीजेने पाकिस्तानला कोणतीही विनंती केली, तर आमचे सरकार योग्य पातळीवर त्याला प्रतिसाद देईल.’ जाधव यांच्या फाशीला आयसीजेने स्थगिती दिल्यानंतर लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतल्यानंतर लष्कराने वरील वक्तव्य केले.
 
पाकिस्तानात भारत घडवून आणत असलेल्या दहशतवादावरील लक्ष इतरत्र वळवण्यासाठी भारत जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचा वापर करीत आहे, असे संरक्षणमंत्री ख्वॉजा मुहम्मद असिफ यांनी म्हटले होते. आयसीजेचा अधिकार पाकिस्तानवर नाही. आयसीजे संबंधित पक्षांच्या संमतीनंतरच विषय हाती घेऊ शकते, असे जीओ टीव्हीने म्हटले. ‘डॉन’ने ऑनलाईनवर आयसीजेकडे भारताचा अर्ज आल्याचे वृत्त दिले; परंतु फाशीला स्थगिती मिळाल्याचा भारताचा दावा वृत्तात दिलेला नाही. 
‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’नेही आपल्या बातमीत भारताने स्थगिती मिळाल्याच्या केलेल्या दाव्याचा उल्लेख केलेला नाही. भारताने आयसीजेने जाधव यांच्या फाशीला दिलेल्या स्थगितीवर मोकळा श्वास घेतला असला तरी भूतकाळ आणि पाकिस्तानसोबतचे ताणले गेलेले संबंध जाधव यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात अडथळा ठरू शकतात. भारताने पूर्वी दोन देशांतील वादात आयसीजेच्या अधिकाराबद्दल प्रश्न विचारला होता. पाकिस्तान आयसीजेचा आदेश स्वीकारील का? तांत्रिकदृष्ट्या तो त्याने स्वीकारला पाहिजे; परंतु भूतकाळाकडे पाहिले तर तसे होण्याची शक्यता नाही. राष्ट्रकुलातील दोन देशांचा संबंध असलेल्या प्रकरणात आयसीजेला अधिकार नाही, असा युक्तिवाद भारताने पाकिस्तानविरोधात करून ते प्रकरण जिंकले होते.
 
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी आहेत. ते भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12  मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.
 

Web Title: Kulbhushan Jadhav Case: No "Pak" trick to weaken India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.