कोकण रेल्वेला केंद्रीय रेल्वेच्या अखत्यारित घ्यावे- खा. सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 07:36 PM2019-07-11T19:36:57+5:302019-07-11T19:37:12+5:30

कोकण रेल्वे हे कोकणातील लोकांचे स्वप्न आहे, असे म्हणत खा. सुनील तटकरे यांनी आज संसदेत कोकण रेल्वेसंबंधित मुद्द्यांवर आवाज उठवला.

Konkan Railway should be taken under the Central Railway | कोकण रेल्वेला केंद्रीय रेल्वेच्या अखत्यारित घ्यावे- खा. सुनील तटकरे

कोकण रेल्वेला केंद्रीय रेल्वेच्या अखत्यारित घ्यावे- खा. सुनील तटकरे

Next

नवी दिल्ली- कोकण रेल्वे हे कोकणातील लोकांचे स्वप्न आहे, असे म्हणत खा. सुनील तटकरे यांनी आज संसदेत कोकण रेल्वेसंबंधित मुद्द्यांवर आवाज उठवला. कोकण रेल्वे ५४ ट्रेन्सच्या माध्यमातून जवळपास ३४ लाख प्रवाशांना सेवा पुरवते. तरी केंद्रीय रेल्वेकडून कोकण रेल्वेसाठी पुरेसा निधी पुरवला जात नाही. त्यामुळे कोकण, गोवा आणि किनारी कर्नाटक भागातील लोक सुविधांपासून वंचित रहात आहेत.

या अर्थसंकल्पात केवळ १७.६४ कोटींचे बजेट कोकण रेल्वेसाठी सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प म्हणून मंजूर करण्यात आले आहे. कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, फूट ओव्हर ब्रीज, फलाटांची उंची वाढवणे तसेच इतर सोयीसुविधांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे. त्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचा अतिरिक्त जवळपास रु. १५० कोटींचा बोजा कोकण रेल्वेवर पडत आहे. म्हणूनच अतिरिक्त निधीची आवश्यकता कोकण रेल्वेला भासत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एकतर कोकण रेल्वेला केंद्रीय रेल्वेच्या अखत्यारित घ्यावे किंवा अधिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी खणखणीत मागणी त्यांनी सभागृहात केली.

रोहा आणि आपटा स्थानकांदरम्यानची जमीन कोकण रेल्वेसाठी संपादित करण्यात आली होती. पण तेथील प्रकल्पग्रस्तांना अद्याप भरपाई मिळत नाही. विद्युतीकरणाचे काम माझ्या कोलाडपासून वीरपर्यंत करण्यात आले, मात्र हे डबलिंगचे काम रत्नागिरीपर्यंत व्हावे, अशी मी माननीय मंत्र्यांना विनंती केली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली. वीरपासून महाड या मोठ्या औद्योगिकीकरण झालेल्या क्षेत्रापर्यंत नवी डीपीआर टाकून नवी रेल्वे सुरू करावी, अशी मागणीही केली. पेण, माणगाव, खेड आणि चिपळूण या स्थानकांवर जनशताब्दी, मंगला एक्सप्रेस, वेरावले एक्सप्रेस, नागरकोईल-गांधीधाम,आपटा-निजामुद्दीन, मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा, अशीही मागणी आज सभागृहात केली. थळ येथे आरसीएफचा प्रकल्प आहे. पेण ते थळ हे अंतर २७ किमी. आहे. राज्य सरकारला विनंती करून एमएमआरडीएकडून निधी उपलब्ध करून घ्यावा व केंद्र सरकारने मागे घोषणा केल्याप्रमाणे पेण ते अलिबाग डीपीआर करावा, अशी मागणी तटकरे यांनी पुढे ठेवली.

पनवेल ते कर्जत लोकल गाड्या जात नाहीत, त्यासाठी मंत्र्यांनी लक्ष घालून नवे रेल्वे स्टेशन तेथे आणावे. कर्जत ते खोपोली एकच ट्रॅक आहे, त्याठिकाणी डबल ट्रॅक करावा. कल्याण ते कर्जत दोनच ट्रॅक्स असल्याने मोठी कोंडी होत आहे, याठिकाणी तीन ट्रॅक करावेत, अशी मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली. पेण तालुक्यात खारपाडा, गडप, महाड अशा काही नव्या रेल्वे स्थानकांची आवश्यकता आहे. मागील काळात चिपळूण ते कराड रेल्वे प्रकल्प करून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडण्याचा विचार सरकारतर्फे झाला होता, त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूदही करण्यात आली होती. त्याचा कमीतकमी डीपीआर तरी करावा. तसेच रोहा स्थानक कोकण रेल्वेच्या अखत्यारित द्यावे, अशीही मागणी तटकरे यांनी आज लोकसभेत केली.

Web Title: Konkan Railway should be taken under the Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.