कन्हैया कुमार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; सीपीआयकडून बेगुसरायमधून उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 12:19 PM2019-03-24T12:19:01+5:302019-03-24T14:06:24+5:30

महाआघाडीसोबतची चर्चा फिस्कटल्यानं सीपीआयच्या तिकीटावर निवडणूक लढवणार

Kanhaiya Kumar to be CPI candidate in Begusarai for lok sabha election 2019 | कन्हैया कुमार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; सीपीआयकडून बेगुसरायमधून उमेदवारी

कन्हैया कुमार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; सीपीआयकडून बेगुसरायमधून उमेदवारी

Next

पाटणा: विद्यार्थी नेता म्हणून प्रकाशात आलेले कन्हैया कुमार बिहारच्या बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये महाआघाडी करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मात्र महाआघाडीनं तिकीट न दिल्यानं कन्हैया कुमार बेगुसराय मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे. पक्षाचे बिहार राज्याचे सचिव सत्यनारायण सिंह यांनी याबद्दलची माहिती दिली. 

कन्हैया कुमार बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्यानं या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणारे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, मोदी लाटेतही स्वत:चा ठसा उमटवणारे राष्ट्रीय जनता दलाचे तन्वीर हसन यांच्याशी कन्हैया कुमार यांना दोन हात करावे लागणार आहेत. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील निवडणुकांमध्ये यशस्वी राजकारण करत तरुणांमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या कन्हैया कुमार यांना इतर डाव्या पक्षांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. 




कन्हैया कुमार यांना राष्ट्रीय जनता दलाकडून तिकीट मिळेल, अशी अपेक्षा सीपीआयला होती. मात्र राजदनं कन्हैया कुमार यांना उमेदवारी न दिल्यानं सीपीआयनं त्यांना आपल्या तिकीटावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांपूर्वी बेगुसराय मतदारसंघ सीपीआयचा बालेकिल्ला मानला जायचा. अनेक निवडणुकांमध्ये सीपीआच्या उमेदवारानं बेगुसरायमधून यश संपादन केलं आहे. मात्र नव्वदच्या दशकानंतर डाव्यांचा हा बालेकिल्ला ढासळला. हा मतदारसंघ राखण्यासाठी डाव्यांना राजदची गरज भासू लागली. त्यामुळे राजदचा समावेश असलेल्या महाआघाडीकडून कन्हैया कुमार यांना उमेदवारी मिळेल, अशी आशा सीपीआयला होती. मात्र त्यांना राजदनं तिकीट दिलं नाही. 

Web Title: Kanhaiya Kumar to be CPI candidate in Begusarai for lok sabha election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.