कल्याण मतदारसंघ : मनसे उतरल्यास लढत चुरशीची

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 05:38 AM2019-02-06T05:38:20+5:302019-02-06T05:38:35+5:30

पुनर्रचनेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कल्याण हा नवा मतदारसंघ तयार झाला.

Kalyan Constituency: If the MNS goes down, the fight will be tough | कल्याण मतदारसंघ : मनसे उतरल्यास लढत चुरशीची

कल्याण मतदारसंघ : मनसे उतरल्यास लढत चुरशीची

Next

- प्रशांत माने

पुनर्रचनेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कल्याण हा नवा मतदारसंघ तयार झाला. तेथील पहिल्या निवडणुकीत दिवंगत माजी खासदार प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले. शिवसेनेतील वागणुकीला कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरल्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पराभवाची धूळ चारली.
सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार हा हा मतदारसंघ त्या पक्षाने मनसेला दिला, तर सध्या शिवसेनेसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक कमालीची चुरशीची होऊ शकते. शिवसेना-भाजपा युती होईल, हे गृहीत धरून भाजपाने तेथे उमेदवार ठरवलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार नाही. राष्ट्रवादीतर्फे आनंद परांजपे लढण्यास तयार दिसत नाहीत. त्या पक्षाकडेही दुसरा उमेदवार नाही. त्यामुळे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले राजू पाटील यांना आघाडीच्या पाठिंब्याचे उमेदवार म्हणून पुढे केले जाऊ शकते.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र मते, त्याला मनसेची जोड आणि भाजपा, शिवसेनेतील नाराजांची मोट बांधत शिवसेनेविरूद्ध लढण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेत डावलले जाणारे ‘आगरी कार्ड’ खेळवण्याचे विरोधकांचे प्रयत्न आहेत. येथील कल्याण पूर्व भागात दीर्घकाळानंतरही नागरी सुविधा मिळत नसल्याने शिवसेनेविषयी नाराजी आहे. २७ गावे वगळण्यावरील शिवसेनेच्या भूमिकेमुळे नाराजीचा फटका कल्याण ग्रामीणमध्ये बसण्याची भीती आहे. डोंबिवलीत संघाची नाराजी हा कळीचा मुद्दा आहे.
मुंब्रा-कळव्यात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेने ठाणे महापालिकेत जुळवून घेतले. काही आंदोलने मिळून केली. पण तेथे राष्ट्रवादीतील नेतेच परस्परांना आव्हान देऊ लागल्याने व नवे मुस्लीम नेतृत्व उभे राहत असल्याने तेथेही शिवसेनेला पूर्वीसारखी एकहाती मदत न मिळता बरेच प्रयत्न करावे लागतील. उल्हासनगरमध्ये शिवसेनेला साथ न देणाऱ्या सिंधी मतदारांत भाजपाने चांगलेच पाय रोवले आहेत.
या साºयाचा विचार करूनच गेली दोन वर्षे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलासाठी सातत्याने फिल्डिंग लावली. पक्षातील वेगवेगळे गट सांभाळून घेतले. भाजपाशीही जुळवून घेतले. मुख्यमंत्र्यांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांचा वापर करत अनेक प्रकल्पांच्या घोषणा केल्या. त्याचा व आजवर केलेल्या कामाचा श्रीकांत शिंदे यांना फायदा होईल, हे नक्की. आता राज ठाकरे यांच्याशी संबंधांचा वापर करीत मनसेच्या लढतीची
तीव्रता कमी करण्यात शिंदे यांना यश आले, तर मात्र वेगळे चित्र दिसू
शकते.

सध्याची परिस्थिती

अंबरनाथमध्ये शिवसेनेतील वेगवेगळे गट अस्वस्थ आहेत. रक्तरंजित संघर्ष आणि व्हिडिओ क्लिपने त्याचे प्रत्यंतर दिले आहे. तशीच खदखद कल्याण ग्रामीण मतदारसंघात आहे.

डोंबिवलीत भाजपाच्या नाराजांनी हात आखडता घेतला आणि ब्राह्मण- दाक्षिणात्य, बंगाली मतदारांनी वेगळी भूमिका घेतली, तर तेही उमेदवारांसमोर आव्हान असेल.

मराठा समाजाला कुणबी ठरवून आरक्षण दिल्याने मराठा आणि मराठेतर नेते-कार्यकर्ते यांच्यातील सुप्त संघर्ष या निवडणुकीत थेट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा समावेश झाल्यास मागास-मुस्लिमांच्या मतांवर परिणाम होईल. कल्याणमधील आंबेडकर-ओवेसींच्या सभेने त्याची चुणूक दाखवली आहे.

Web Title: Kalyan Constituency: If the MNS goes down, the fight will be tough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.