भारताचा चीनमध्ये विजय; ब्रिक्स परिषदेमध्ये पाकिस्तानला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 04:04 IST2017-09-05T04:03:12+5:302017-09-05T04:04:02+5:30
दहशतवाद पसरविणा-या पाकिस्तानातील अतिरेकी संघटना ‘लष्कर -ए-तोयबा’, जैश-ए-मोहम्मद’ यांचे नाव ब्रिक्स देशांच्या घोषणापत्रात प्रथमच समाविष्ट करण्यात आला असून, भारताचा हा विजय मानला जात आहे.

भारताचा चीनमध्ये विजय; ब्रिक्स परिषदेमध्ये पाकिस्तानला दणका
शियामेन (चीन) : दहशतवाद पसरविणा-या पाकिस्तानातील अतिरेकी संघटना ‘लष्कर -ए-तोयबा’, जैश-ए-मोहम्मद’ यांचे नाव ब्रिक्स देशांच्या घोषणापत्रात प्रथमच समाविष्ट करण्यात आला असून, भारताचा हा विजय मानला जात आहे.
अतिरेकी कारवाया घडवून आणणारे, कट कारस्थान करणारे आणि सहकार्य करणाºयांना जबाबदार ठरविले पाहिजे, असा सूर या संमेलनातून उमटला. या दोन संघटनांसह अन्य अतिरेकी संघटनांवर कारवाईची मागणी ब्रिक्स देशांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन, ब्राझिलचे राष्ट्रपती माइकल टेमर आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जैकब जुमा यांनी या अतिरेकी कारवायांचा कठोर शब्दांत निषेध केला. सर्वांनी मिळून या समस्येविरुद्ध लढले पाहिजे, यावर भर दिला.
मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उचलून धरला. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांसह तालिबान, इसिस आणि अल कायदा यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करण्याची मागणी ब्रिक्स देशांनी केली. हक्कानी नेटवर्क, तसेच शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यावर अंकुश आणला जावा, अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करणे, अतिरेक्यांकडून इंटरनेट, सोशल मीडियाच्या होणाºया वापरावर प्रतिबंध आणणे, यांचाही घोषणापत्रात समावेश आहे. पाकमधील दहशतवादाचा मुद्दा ब्रिक्सच्या परिषदेत उपस्थित करू नये, असे चीनने पंतप्रधान मोदी यांना परिषदेपूर्वी सुचविल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या पार्श्वभूमीवर दहशतवादविरोधाचा हा संकल्प महत्त्वाचा आहे. (वृत्तसंस्था)
उत्तर कोरियाचा निषेध -
उत्तर कोरियाने केलेल्या अणू चाचण्यांचा भारतासह ब्रिक्समध्ये निषेध करण्यात आला. या मुद्द्यावर शांततेने आणि मुत्सद्देगिरीने तोडगा काढला जावा, असे मतही व्यक्त करण्यात आले. उत्तर कोरियाने रविवारी आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. उत्तर कोरिया नव्या क्षेपणास्त्र चाचणीच्या तयारीत आहे, असा दावा सोमवारी दक्षिण कोरियाने केला आहे.