भारताची ‘अंतराळशक्ती’ अधिक सामर्थ्यशाली!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 02:08 AM2019-03-28T02:08:43+5:302019-03-28T02:09:07+5:30

क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह अचूक टिपून भारताने आता ‘अंतराळशक्ती’ अशी अधिक सामर्थ्यशाली असल्याचे सिद्ध केले आहे. ही मोहीम फत्ते करून भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे.

 India's 'astronautics' is more powerful! | भारताची ‘अंतराळशक्ती’ अधिक सामर्थ्यशाली!

भारताची ‘अंतराळशक्ती’ अधिक सामर्थ्यशाली!

Next

नवी दिल्ली : क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह अचूक टिपून भारताने आता ‘अंतराळशक्ती’ अशी अधिक सामर्थ्यशाली असल्याचे सिद्ध केले आहे. ही मोहीम फत्ते करून भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे.
शत्रूच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपासून बचाव करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा ‘डीआरडीओ’चा एक कार्यक्रम गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आक्रमक क्षेपणास्त्र वाटेतच रोखणाची क्षमता सिद्ध करण्यात आली आहे. याच ‘इन्टरसेप्टर’ क्षमतेचा उपयोग ‘मिशन शक्ती’मध्ये केला गेला.
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आखलेल्या आणि पूर्णत्वास नेलेल्या या मिशनचा मुख्य उद्देश कित्येक वर्षांच्या अथक परिश्रमाने विकसित केलेली पूर्णपणे देशी तंत्रशास्त्रीय क्षमता प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध करणे हा होता. मिशन यशस्वी झाल्याने भारत अंतराळात उपग्रहांच्या स्वरूपात असलेल्या आपल्या बहुमोल साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासही सक्षम असल्याचा इशारेवजा संदेशही यातून दिला गेला. आज उपग्रह नष्ट करण्यासाठी वापरले गेलेल्या याच तंत्रज्ञानाने भारत शत्रूने सोडलेली क्षेपणास्त्रेही लक्ष्यावर पोहोचण्यापूर्वीच रोखून नष्ट करू शकतो, हेही यामुळे अधोरेखित झाले.
भारताने आतापर्यंत १०२ प्रक्षेपणे करून विविध प्रकारचे शेकडो उपग्रह अंतराळात सोडले आहेत. शिवाय ‘चांद्रयान’ व ‘मंगळयान’ या बाह्य अवकाशातील महत्त्वाकांक्षी मोहिमाही भारत हाती घेत आहे. यासाठी अंतराळ बाह्य धोक्यांपासून निर्धोक असणे व संभाव्य धोके परिणामकारकपणे परतवून लावण्याची क्षमता असणे देशाच्या सर्वंकष संरक्षण सिद्धतेचा एक अविभाज्य भाग आहे.

नष्ट झालेल्या उपग्रहाचे काय होणार?
अशा प्रकारे उपग्रह नष्ट केल्याने अंतराळात कचरा विखरून इतर उपग्रहांना व यानांना अडथळा येऊ नये याची काळजी घेतली गेली. याच उद्देशाने पृथ्वीपासून जवळच्या कक्षेतील उपग्रह ‘लक्ष्य’ म्हणून निवडला गेला.
परिणामी, त्याचे भग्नावशेष गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीकडे येतील व वातावरणाच्या घर्षणानेच बव्हंशी नष्ट होतील.

Web Title:  India's 'astronautics' is more powerful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.