समुद्रात भारतीय नौदलाची ताकद वाढणार, २६ राफेल विमानांच्या खरेदीवर शिक्कामोर्तब; चीन-पाकिस्तानला धडकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 11:09 AM2023-07-15T11:09:51+5:302023-07-15T11:10:15+5:30

Rafale Deal For Indian Navy :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीत हा करार झाला. 

Indian govt announces selection of 26 Navy Rafale after successful trial, confirms Dassault Aviation | समुद्रात भारतीय नौदलाची ताकद वाढणार, २६ राफेल विमानांच्या खरेदीवर शिक्कामोर्तब; चीन-पाकिस्तानला धडकी!

समुद्रात भारतीय नौदलाची ताकद वाढणार, २६ राफेल विमानांच्या खरेदीवर शिक्कामोर्तब; चीन-पाकिस्तानला धडकी!

googlenewsNext

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यात मोठ्या संरक्षण करारावर शिक्कामोर्तब झाले. भारत सरकारने शनिवारी (१५ जुलै) ही घोषणा केली. या अंतर्गत भारतीय नौदलाला फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनकडून २६ नवीन अॅडव्हॉन्स राफेल लढाऊ विमाने मिळतील, जी नौदलाच्या गरजेनुसार खास तयार केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीत हा करार झाला. 

राफेलची निर्माता कंपनी दसॉल्ट एव्हिएशनने याबाबत माहिती दिली आहे. दसॉल्ट एव्हिएशनने म्हटले आहे की, "भारतीय नौदलाला नवीनतम पिढीतील लढाऊ विमानांनी सुसज्ज करण्यासाठी भारत सरकारने नौदल राफेलची निवड जाहीर केली. भारतीय नौदलाचे २६ राफेल आधीच सेवेत असलेल्या ३६ राफेलमध्ये सामील होतील." दरम्यान, भारतीय वायुसेनेसाठी फ्रान्सकडून यापूर्वीच ३६ राफेल खरेदी करण्यात आली आहेत. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी (१३ जुलै) फ्रान्सकडून २६ राफेल आणि ३ फ्रेंच-डिझाइन स्कॉर्पीन श्रेणीच्या पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

दसॉल्ट एव्हिएशनने पुढे म्हटले की, हा निर्णय भारतात आयोजित एक यशस्वी चाचणी मोहिमेनंतर घेण्यात आला आहे, ज्यामध्ये नौदलाच्या राफेलने हे सिद्ध केले आहे की, ते भारतीय नौदलाच्या ऑपरेशनल आवश्यकता पूर्ण करते आणि त्यासाठी पूर्णपणे योग्य आहे. दरम्यान, या संरक्षण करारात भारताला २२ सिंगल सीटर राफेल-एम मरीन लढाऊ विमाने मिळणार आहेत. ही लढाऊ विमाने स्वदेशी बनावटीच्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू नौकेवर तैनात केली जातील. याचबरोबर ४ ट्रेनर राफेल मरीन विमाने उपलब्ध होणार आहेत. राफेल-एम ही फ्रान्सच्या राफेल लढाऊ विमानांची नौदल आवृत्ती आहे. या संरक्षण करारानंतर भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात लक्षणीय वाढ होणार आहे.

इंडो-पॅसिफिकमध्ये भारताची ताकद वाढणार!
भारतीय नौदलाला बऱ्याच काळापासून आधुनिक पिढीच्या लढाऊ विमानांची गरज भासत होती. इंडो-पॅसिफिकमध्ये चीनच्या हालचाली पाहता हा खरेदीचा प्रस्ताव लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी नौदलाची अपेक्षा होती. चीन हिंदी महासागरात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा परिस्थितीत भारतीय नौदलाने समुद्रात आपली ताकद वाढवून मजबूत राहण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन या लढाऊ विमानांची खरेदी करण्यात आली आहे.

Web Title: Indian govt announces selection of 26 Navy Rafale after successful trial, confirms Dassault Aviation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.