दुय्यम दर्जाच्या दारुगोळ्यामुळे अपघात वाढले, लष्कराने संरक्षण मंत्रालयाकडे व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 09:27 AM2019-05-14T09:27:53+5:302019-05-14T09:31:20+5:30

दुय्यम दर्जाचा दारुगोळा आणि युद्ध सामुग्रीमुळे वाढत असलेल्या अपघातांबाबत लष्कराने चिंता व्यक्त केली आहे.

Indian army rice concern about defective ammunition | दुय्यम दर्जाच्या दारुगोळ्यामुळे अपघात वाढले, लष्कराने संरक्षण मंत्रालयाकडे व्यक्त केली चिंता

दुय्यम दर्जाच्या दारुगोळ्यामुळे अपघात वाढले, लष्कराने संरक्षण मंत्रालयाकडे व्यक्त केली चिंता

googlenewsNext

नवी दिल्ली - दुय्यम दर्जाचा दारुगोळा आणि युद्ध सामुग्रीमुळे वाढत असलेल्या अपघातांबाबत लष्कराने चिंता व्यक्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा दारुगोळा सरकारी मालकीच्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डकडून लष्कराकडील रणगाडे, तोफा एअर डिफेन्स गन आणि अन्य युद्धसामुग्रीसाठी पुरवण्यात येतो. दरम्यान, दुय्यम दर्जाच्या दारुगोळ्यामुळे होत असलेल्या अपघातांमुळे चिंतीत असलेल्या लष्कराने याबाबत संरक्षण मंत्रालयाशी संवाद साधला आहे. अशा दारुगोळ्यामुळे अपघात होऊन जवानांना प्राणास मुकत आहेत किंवा जायबंदी होत आहेत. तसेच युद्धसामुग्रीचेही नुकसान होत आहे, असे लष्कराकडून सांगण्यात आले. 

 यासंदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ नवभारत टाइम्सने प्रकाशित केले आहे. या वृत्तात असलेल्या उल्लेखानुसार सरकारी अधिपत्याखालील दारुगोळा कारखान्यांकडून पुरवण्यात येत असलेल्या दारुगोळ्यामुळे वाढत असलेल्या दुर्घटनांमुळे लष्कराचा या सामुग्रीवर असलेला विश्वास कमी झाला आहे. दारुगोळा कारखान्यांकडून दारुगोळ्याच्या दर्जाबाबत अपेक्षित काळजी घेतली जात नसल्याने लष्कराने संरक्षण उत्पादन सचिव अजय कुमार यांच्याकडे गंभीर चिंता व्यक्त केली आहे. 

 वर्षाकाठी 19 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या ऑर्डनन्स फॅक्ट्री बोर्डाकडे दारुगोळा बनवणारे एकूण 41 कारखाने आहेत. हे कारखाने 12 लाख जवान सेवेत असलेल्या भारतीय लष्कराला दारुगोळ्याचा पुरवठा करणारे मुख्य स्रोत आहेत. या ऑर्डनन्स फॅक्टरीमधून उप्तादित दारुगोळ्याच्या दर्जात होत असलेल्या घसरणीचा देशाच्या युद्धक्षमतेवर परिणाम होतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान लष्कराकडून याबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर संरक्षण उत्पादन सचिव कुमार यांनी लष्कराला त्यांच्या विविध समस्या आपल्यासमोर मांडण्यास सांगितले आहे. 


 संरक्षण उत्पादन सचिवांना सादर केलेल्या 15 पानांच्या कागदपत्रांमध्ये लष्कराने अत्यंत गंभीर असे प्रश्न मांडले आहेत. 105 एमएमची इंडियन फिल्ड गन, 105 एमएम लाइट फिल्ड गन, 130 एमएम लाइट फिल्ड गन, 130 एमएम 1 मीडियम गन, 40 एमएम एल-70 एअर डिफेन्स गन,  टी-72, टी-90 आणि अर्जुन टँकच्या तोफांबाबत नियमित अपघात घडत आहेत. याशिवाय 155 एमएमच्या बोफोर्स तोफांबाबतही खराब दारुगोळ्याचे प्रकार घडले आहेत, असे लष्कराने संरक्षण उत्पादन सचिवांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार ऑर्डनन्स फॅक्ट्री बोर्डाने ही समस्या सोडवण्यासाठी म्हणावे तेवढे गांभीर्य दाखवलेले नाही. त्यामुळे लष्कराने लांबपल्ल्याच्या दारुगोळ्याची फायरिंग थांबवली आहे.  

Web Title: Indian army rice concern about defective ammunition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.